हॉट सीट / आपण दोघे भाऊ-भाऊ, मिळून आमदार होऊ; धाकट्या देशमुख व निलंगेकरांनाही व्हायचे आमदार

दोन मतदारसंघांतून एकाच घरातील दोन भाऊ निवडणुकीच्या मैदानात उतरले तर मतदारांची काय प्रतिक्रिया येईल याची चाचपणी करताहेत दोन्ही घरांतील मोठे भाऊ

Sep 23,2019 04:53:08 PM IST

लातूर - लातूर जिल्ह्यातील देशमुख आणि निलंगेकर या दोन्ही दिग्गज घराण्यातील ज्येष्ठ पुत्र आमदार आणि मंत्री झाले असतानाच आता त्यांच्या धाकट्या भावांना आपणही आमदार व्हावे असे वाटत आहे. आपल्या धाकट्या भावांना थांबवणे शक्य नाही हे थोरल्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनीही ‘पक्ष काय निर्णय घेतो ते बघूया’ असा पवित्रा घेतला आहे.


दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातल्या बाभळगावपासून आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि ते विविध जबाबदाऱ्या पेलत राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहाेचले. विलासरावांच्या लातूर या विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ साली लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे दोन मतदारसंघ तयार झाले. पहिल्यांदा विलासरावांनी शहरमधून अमित देशमुखांना उमेदवारी मिळवून दिली आणि त्यांचा राजकारणात प्रवेश घडवून आणला. तर लातूर ग्रामीणमध्ये त्यांनी आपले पाठीराखे असलेल्या वैजनाथ शिंदे या साध्या कार्यकर्त्याला रिंगणात उतरवले आणि निवडून आणले. पुढे तीनच वर्षांत २०१२ साली विलासरावांचे निधन झाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटच्या तीन महिन्यांत अमित देशमुखांना राज्यमंत्रिपद दिले. २०१४ सालच्या निवडणुकीतही अमित देशमुख दुसऱ्यांदा आमदार झाले. या काळात त्यांचे धाकले बंधू धीरज हेही राजकारणात सक्रिय झाले. प्रारंभी युवक काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. २०१४ सालीच त्यांनी लातूर ग्रामीण मधून तिकिटासाठी जोर लावला होता. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे नाव आघाडीवर होते. एका पदाधिकाऱ्याने तर त्यांनी अर्ज दाखल केल्याची घोषणाही केली. परंतु ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले आणि ग्रामीणमधून त्र्यंबक भिसेंना उमेदवारी जाहीर झाली. या वेळी मात्र त्यांनी आपली दावेदारी पक्की केली असून काहीही झाले तरी संधी सोडायची नाही, असा इरादा बाळगून ते कामाला लागले आहेत. ‘मलाही आमदार व्हायचंय’ या नाट्याचा दुसरा अंक लातूर जिल्ह्यातील दुसरे दिग्गज घराणे असलेल्या निलंगेकरांच्या घरातही रंगते आहे. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात २००४ साली भाजपकडून निवडणूक जिंकलेले त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर २००९ साली पराभूत झाले. मात्र २०१४ साली त्यांनी काका अशोक पाटील यांचा पराभव करीत जोरदार एन्ट्री केली. भाजपची सत्ता आल्यामुळे काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर का होईना ते थेट कॅबिनेट मंत्री झाले. लातूरचे पालकमंत्रिपदही मिळाले. त्यांनी भाजपला जिल्ह्यात अच्छे दिन आणले. संभाजी निलंगेकरांचा व्याप वाढल्यामुळे जिल्ह्यातील व मतदारसंघातील स्थानिक विषय हाताळण्याची जबाबदारी लहान बंधू अरविंद पाटील यांच्यावर आली. त्यांनी ती यशस्वीरीत्या पेललीही. त्यामुळे त्यांच्याही मनात आमदार होण्याची इच्छा जागृत झाली. निलंगा शेजारच्या औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे तेथून निवडून येणे शक्य असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे.

X