आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉर्पोरेट विश्वातील यशासाठी धोनी झाला सक्रिय: एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीत कार्यरत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होण्याच्या दृष्टीने महेंद्रसिंग धोनीने हालचाल करण्यास सुरुवात केली असून ‘इंडिया सिमेंट’ कंपनीचा ‘व्हाइस प्रेसिडेंट, मार्केटिंग’ या हुद्द्याला न्याय देण्यासाठी तो सध्या जोरात तयारी करतोय. इंडिया सिमेंट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत धोनी कंपनीचा विस्तार आणि त्यासाठीच्या योजना यावर बोलणार आहे. त्याशिवाय कॉर्पोरेट विश्वात पाऊल टाकताना आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी भारतीय खेळाडूने केली आहे.  


इंडिया सिमेंटचा व्हाइस प्रेसिडेंट, मार्केटिंग म्हणून त्याने कंपनीच्या विविध योजनांचा अभ्यास केला आहे. कंपनीच्या विस्तारासंबंधी बोलताना तो म्हणतो, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी मागणीचा पुरवठा करण्याचे शंभर टक्के लक्ष्य आम्ही पूर्ण करणार आहोत. कंपनीच्या संचालक मंडळासमोर कल्पना मांडताना धोनीने एक गोष्ट स्पष्ट केली. ती म्हणजे, भारतीय क्रिकेट संघासोबतच्या बऱ्याच जबाबदाऱ्यांमधून मी आता मुक्त झालो आहे. त्यामुळे इंडिया सिमेंटच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पेलण्यासाठी यापुढे मी पुरेसा वेळ देऊ शकतो, असे आश्वासन त्याने संचालक मंडळाला दिल्याचे कळते.  


इंडिया सिमेंटचे एम.डी. व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी यासंदर्भात सांगितले, ‘धोनी आमची मोठी संपत्ती आहे. बंसवारा (राजस्थान) व शंकर नगर (तामिळनाडू) येथील इंडिया सिमेंटच्या फॅक्टरीजना धोनीने भेटी दिल्या आहेत. तेथील कामकाज जवळून पाहिले आहे. त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.’  सिमेंट उद्योग वगळता अन्य उद्योग क्षेत्रातही धोनी पाऊल टाकणार आहे. त्या दृष्टीने त्याच्यासाठी काम करणारी व त्याचे मार्केटिंग करणारी अरका व अन्य काही कंपन्या सध्या अनेक उद्योग समूहांच्या संपर्कात आहेत. क्रिकेट खेळाच्या अॅपपासून क्रिकेट साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंत आणि गुंतवणूक क्षेत्रातील कंपन्या धोनीसाठी उत्सुक असल्याचे कळते. क्रिकेट किट गुंडाळून ठेवून धोनी सध्या कॉर्पोरेट विश्वात झेप घेण्याच्या तयारीत आहे. तेथे त्याला सक्रिय व्हायचे आहे.

 

क्रिकेट संघाच्या अनेक जबाबदाऱ्यातून मुक्त
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाच्या अनेक जबाबदाऱ्यातून स्वत:ला मुक्त केले आहे. त्यामुळे तो आता भविष्यात आपल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जास्तीत जास्त लक्ष्य देवू शकतो. विशेष म्हणजे कंपनीच्या  बैठकीमध्ये त्याने आपल्या संचालक मंडळाला तसे आश्वासन देखील दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...