श्रद्धा, स्पर्धा आणि / श्रद्धा, स्पर्धा आणि सूडभावना

diya marathi

May 30,2011 08:21:54 PM IST

महेंद्रसिंग धोनी आणि जयललिता यांच्यात फारसे साम्य नाही. दोघांचीही ज्योतिषी आणि गुरू यांच्यावर नितांत श्रद्धा आहे हे खरे, पण ते ज्योतिषी आणि गुरूही वेगवेगळे आहेत. पण या घडीला धोनी आणि जयललिता दोघेही 'चेन्नई चॅम्पियन्स' झाले आहेत. जयललितांचा सनसनाटी विजय काही दिवसांपूर्वीचाच. धोनीला त्यामुळे असे वाटू शकेल की अण्णाद्रमुकचा विजय हा एक शुभशकु न होता. जयललितांचा सामना फक्त करुणानिधी कुटुंबीयांच्या विरोधात नव्हता, तर ज्या द्रमुकने जयललितांचा अखंडपणे द्वेष केला, त्या संपूर्ण द्रमुकच्या विरोधात होता. जयललितांना स्वत:चे तसे कुटुंब नाही. एमजीआर गेल्यानंतर 'समांतर' संसारही नाही. त्या तशा एकट्याच. पण त्यांची जिद्द, तडफ आणि सूडभावना मात्र इतकी तीव्र की त्यांच्या एखाद्या फणका:यानेच प्रतिस्पर्धी भस्मसात व्हावा. करुणानिधींचे कुटुंब लौकिक अर्थाने भस्मसात झालेले नसले तरी त्यांची अवस्था इतकी केविलवाणी झाली आहे की त्यापेक्षा भस्मसात झालेले बरे असेच त्यांना वाटत असेल. धोनी जिद्दीने खेळला तरी त्यात सूडभावना नसते. पण 'रॉयल चॅलेंजर्स'च्या विजय मल्यांना मात्र सामन्याच्या अखेरीस भस्मसात व्हावे असे वाटले असणार. खुद्द विजय मल्याही कमालीचे श्रद्धाळू आहेत. त्यांची सर्व संपत्ती ही मुख्यत: दारू बनवण्याच्या व विकण्याच्या धंद्यातून येते. त्यामुळे अनेकांना वाटेल की ते पाप-पुण्याच्या पलीकडे गेले असावेत. परंतु तसे नाही. कदाचित आपण लोकांना नशाधीन करण्याचे जे पाप करतो त्याचे क्षालन करण्यासाठी ते बाबा-गुरू आणि पूजा-नवस यांच्या अधीन गेले असावेत. विजय मल्यांचे जे जिवलग मित्र आहेत त्यांच्यात सर्वात जवळचे प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार. पटेल किती श्रद्धाळू आहेत हे माहीत नाही, पण शरद पवार पूर्ण अश्रद्ध, अगदी नास्तिकच आहेत. असे असूनही ते मल्यांच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक. शरद पवारांना आयसीसी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या सर्वोच्च पदी पोचवण्यासाठी सर्व प्रकारची मदत मल्यांनी केली होती. आता पवार ते अध्यक्षपद तसेच अबाधित ठेवून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही दिलीप वेंगसरकर आणि विलासराव देशमुख यांच्या विरोधात उतरले आहेत. मल्यांचा पाठिंबा अर्थातच पवारांना, जरी श्रद्धेच्या बाबतीत त्यांना विलासराव जवळचे वाटू शकले असते. मुद्दा हा की श्रद्धा, स्पर्धा आणि सूडभावना या एकमेकांशी पूर्ण विसंगत असलेल्या गोष्टीही एकत्र नांदू शकतात. म्हणजे असे की, मल्यांचे मित्र असल्यामुळे बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्सचा पराभव जरी पवारांना आवडला नसला तरी जयललितांच्या द्रमुकच्या विरोधातील विजयामुळे मात्र ते खुश झाले असणार. पवार आणि जयललितांचे राजकीय संबंध खूपच जवळचे आहेत. गंमत म्हणजे काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीत पवार हे करुणानिधींबरोबर असले तरी जयललितांबरोबर त्यांचे समांतर संबंध टिकून होते. धोनी बिचारा आयपीएलमधील जुगारी खरेदी- विक्रीच्या समांतर संबंधात अडकलेला नसला तरी त्याला त्या सामन्यांमधील सट्ट्याचे भान असणारच. कदाचित त्यामुळेही त्यांना विजय मल्यांच्या रॉयल चॅलेंजर्सचा 'चॅलेंज' जड जाईल असे वाटले असावे. परंतु धोनीच्या 'चेन्नई चॅम्पियन्स'नी मल्यांच्या संपत्ती-सत्तेला आणि त्यांच्या ज्योतिषी-गुरूंनाही ५८ धावांचा धोबीपछाड दिला. क्रिकेटमध्ये धोबीपछाड नसतो, पण आता तो कुस्तीच्या लाल मातीतून क्रिकेटच्या मैदानावर येऊ शकेल. शरद पवारांनी कुस्तीमधील अनेक डावपेच क्रिकेटमध्ये आणले आहेतच. पवारांनी जगमोहन दालमियांनाच नव्हे, तर अगदी त्यांचे जवळचे स्नेही, सुवर्ण सहकारी बँकेचे ज्ञानेश्वर आगाशे यांनाही फक्त धोबीपछाडच नव्हे, तर देशोधडीलाच लावले होते. देशात पवार हे एकमेव राजकारणी असे आहेत की जे एकाच वेळेस महाराष्ट्र कुस्ती फेडरेशनचे आणि देशातील क्रिकेट संघांचे अध्वर्यू आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणातील डावपेचांमध्येही धोबीपछाडच नव्हे, तर गुगली, यॉर्कर असे सर्व प्रकार रूढ केले आहेत. किंबहुना त्यामुळेच दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला शरद पवारांशी कसे 'डील' करायचे ते कळत नसावे. काही महिन्यांपूर्वी आयपीएल सामन्यांच्या आर्थिक उलाढालींमध्ये पवारांचे नाम बदनाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु पवार त्या सापळ्यात अडकले नाहीत, पण त्यांचे एकेकाळचे सहकारी ललित मोदी मात्र देशोधडीला लागले. मोदी जर देशात परत आले तर त्यांना अटकच होईल. त्यामुळे त्यांनीही देशोधडीला लागणेच पसंत केले असावे. 'जुगारी' ही प्रवृत्ती आहे, व्यक्ती नव्हे. मोदींनी त्या देशोधडीच्या अवस्थेत इंग्लंडमध्ये 'समांतर' आयपीएल सुरू करण्याचे प्रयत्न आरंभले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून पवारांचा मोदींना पाठिंबा, किमान आशीर्वाद असू शकतो. जसे यूपीएत असूनही त्यांचा जयललितांना सुप्त पाठिंबा आहे. ते स्वत: एक स्वयंभू 'चॅम्पियन' आहेत. त्यामुळे त्यांना धोनीप्रमाणे झारखंडमधून येऊन तामिळ भाषा येत नसताना चेन्नई चॅम्पियन होता आले, तसे पराक्रम करण्याची गरज नाही. 'किंगफिशर' या नावाने ओळखला जाणारा पक्षी वरती उडतानाही खाली पाण्यात विहंग करणाऱ्या माशावर कशी नजर ठेवतो आणि निमिषार्धात खाली त्या वाहत्या पाण्यात घेऊन तो मासा नेमका चोचीत पकडतो हे आपल्याला माहीत आहे. विजय मल्यांनी त्यांच्या बिअर ब्रॅण्डचे नाव 'किंगफिशर' ठेवले तेव्हा इतका सखोल विचार केला होता की नाही हे माहीत नाही, पण शरद पवारांनी मात्र मल्यांशी घनिष्ठ दोस्ती केली. जयललिता आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाहीत. द्राविडियन राजकारणाच्या पलीकडे त्यांचे (सूडाचे!) राजकारण जात नाही . त्यामुळे त्या चेन्नई चॅम्पियन झाल्या यात त्या समाधानी आहेत. महेंद्रसिंग धोनीला प्राप्त होणारे समाधान तर त्याहूनही मर्यादित आहे. 'किंगफिशर' मल्यांना आपण पायचीत केले यात धोनी खुश आहे. म्हणूनच आम्ही म्हटले की जयललिता व धोनी यांच्यात फारसे साम्य नाही. त्याचप्रमाणे श्रद्धा, स्पर्धा आणि सूडभावना या जरी राजकारणात व खेळांमध्ये प्रगट होत असल्या तरी त्यांच्या आविष्कारात कितीतरी वैविध्य असते. ते दोघेही 'चेन्नई चॅम्पियन्स' पण किती भिन्न आविष्कृती!!

X
COMMENT