आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule | My Mother Used To Sell Liquor, Drinkers Used To Give Money For Snacks, By Buying Books From Them I Kept Reading And Became A Collector.

आई दारू विकत होती, पिणारे स्नॅक्सच्या मोबदल्यात पैसे देत, त्या पैशातून पुस्तके खरेदी करून शिकत राहिलो, कलेक्टर झालो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईसोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड - Divya Marathi
आईसोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड
  • कलेक्टरने दिव्य मराठीच्या वाचकांसाठी लिहिली आपल्या संघर्षाची कहाणी

डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार (महाराष्ट्र)
 
‘मी गर्भात होतो तेव्हाच वडील गेले. मला पित्याचा फोटो पाहण्याचेही भाग्य लाभले नाही. कारण, पैसा नव्हता. एक वेळचे खाणेही कसेबसे मिळवणे कठीण होते. उसाच्या कुडापासून तयार केलेल्या एका छोट्या झोपडीत आमचे १० जणांचे कुटुंब राहत होते. मी गर्भात होतो तेव्हा लोक आईला गर्भपात करून घे, असा सल्ला देत होते. एक मुलगा, दुसरी मुलगी असताना आता तिसऱ्या अपत्याची गरज काय, त्याला काय खाऊ घालशील? पण, आईने ऐकले नाही. माझा जन्म झाला.मी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजाचा आहे. लहानपणापासूनच अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, बेरोजगारी आणि व्यसनांचा शाप होता. आई कमलाबहन मजुरी करत होती. १० रुपये मिळत. यातून गरजा कशा भागणार? म्हणून आईने देशी दारू विकायला सुरुवात केली. मी तेव्हा २-३ वर्षांचा होतो. भूक लागल्यावर रडू लागलो की दारू पिण्यासाठी आलेल्या लोकांना अडचण होत असे. मला गप्प बसवण्यासाठी ते दोन-तीन थेंब दारू माझ्या तोंडात टाकत. दुधाऐवजी आजीही मला दोन चमचे दारू देत असे. मग मी भुकेला असलो तरी झोपत असे. काही दिवसांनी मला याची सवयच लागली. सर्दी-पडसे झाले की औषधाऐवजी दारूच मिळे. मी चौथीत असताना घरासमोर ओट्यावर अभ्यास करत असे. मात्र, दारू पिणारे लोक काही ना काही कामे सांगत. स्नॅक्सच्या माेबदल्यात पैसे देत. त्यातूनच पुस्तके खरेदी केली. १०वीत ९५% मिळवले. १२वीत ९०% मिळाले. २००६ मध्ये मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली तेव्हा मुंबईच्या सेठ जीएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. २०११ मध्ये मी कॉलेजचा बेस्ट स्टुडंट होतो. त्याच वर्षी मी यूपीएससीचा अर्ज भरला. कलेक्टर झालो. मात्र, आईला याबद्दल काही माहीत नव्हते. गावकरी, अधिकारी, नेते अभिनंदन करू लागले तेव्हा आईला कळले की राजू (लाडाचे नाव) कलेक्टरची परीक्षा पास झाला आहे. ती तेव्हा अत्यानंदाने फक्त रडत होती...
- शब्दांकन : नीलेश पाटील

लोक म्हणत, हा मुलगा आईसारखीच दारू विकेल...


‘एक दिवस दारू पिण्यासाठी घरी आलेला माणूस म्हणाला, शिकून काय करशील? तुझ्या आईला सांग, मुलगाही दारूच विकेल. भिल्लाचा मुलगा भिल्लच राहील.’ मी ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हाच आईने संकल्प केला की मुलाला डॉक्टर-कलेक्टरच करीन. मात्र, तिला माहीत नव्हते की यूपीएससी काय असते. मात्र, आज मी जो काही आहे ते केवळ आईने दाखवलेल्या विश्वासामुळेच आहे.