आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्याच्या आरटीओला साडेचार लाखांची लाच घेताना अटक; चेकपोस्टवर नेमणुकीसाठी निरीक्षकाकडून मागितली लाच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सीमा तपासणी नाक्यावर नेमणुकीसाठी आरटीओ कार्यालयात निरीक्षकाकडून साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) परवेज तडवी यास बुधवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत तडवीला लाच प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली.

 
नियमानुसार चक्राकार पद्धतीने सीमा तपासणी नाक्यावर नेमणूक दिली जाते; परंतु त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखाँ तडवी (वय ५७) यांनी २ जुलैला साडेचार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत आरटीओ कार्यालयात निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार नाशिकच्या विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने देवपुरातील दत्त मंदिर परिसरातील दत्त कॉलनी येथे तडवी यांच्या निवासस्थानी सापळा लावला. ठरल्यप्रमाणे साडेचार लाखांची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न करताना पथकाने तडवीला रंगेहाथ पकडले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. त्यानंतर तडवीला देवपूर पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

धुळे, नाशकात घरझडती :

धुळे येथील दत्त कॉलनीत तडवी याने भाडेतत्त्वावर घर घेतले आहे. या कारवाईनंतर धुळे व नाशिकच्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली. तसेच नाशिक, मुंबई व जळगाव येथे असलेल्या तडवीच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्यासाठी स्थानिक पथकाची मदत घेण्यात आली. धुळ्यातील घरझडतीत काही आढळले नाही, असे पथकाने सांगितले. 

 

७५ दिवसांनी पुन्हा कारवाईचा फास :

आरटीओ तडवीबद्दल अनेक तक्रारी होत्या. साईनाथ एजन्सी या संस्थेमार्फत रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी साहित्य पुरवण्यात आले होते. त्यांचे एक लाख ८० हजार रुपयांचे बिल जमा करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी तडवीने केली होती. या तक्रारीवरून ८ मे २०१९ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.