स्पोर्ट्स / फेब्रुवारी महिन्यात खाे-खाेची पहिली लीग; मैदानावर ‘वजीर’चा धावण्याचा नवा प्रयाेग ठरणार सर्वांसाठीच अधिक निर्णायक

सहा संघांचा असेल सहभाग, खो-खो लीगची संपली प्रतीक्षा, नवीन खो-खोचा होईल उदय 

Sep 20,2019 10:17:00 AM IST

अमोल पाटील

धुळे - खो-खो लीगची गेल्या तीन ते चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा आता संपली आहे. अल्टिमेट खो-खो या नावाने ८ ते २९ फेब्रुवारीदरम्यान देशात खो-खो लीग होणार आहे. क्रिकेटनंतर सर्वात महागडी लीग म्हणून अल्टिमेट खो-खो असेल. या स्पर्धेत पाच परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. अल्टिमेट खो-खोमुळे नवीन खो-खो देशाला पाहावयास मिळणार आहे. नव्या खो-खोमध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्वाधिक योगदान असेल. या लीगमध्ये सर्वाधिक खेळाडू महाराष्ट्रातील असतील, अशी माहिती अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे सहसचिव चंद्रजित जाधव यांनी दिव्य मराठीला दिली.


चार वर्षांपासून नियाेजन; अाता फेब्रुवारीमध्ये रंगणार लीग
खो-खोची व्यावसायिक स्पर्धा घेण्यासाठी तीन ते चार वर्षांपासून नियोजन सुरू होते. त्यासाठी अखिल भारतीय खो-खो असोसिएशन,ऑलिम्पिक असोसिएशनने पुढाकार घेतला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात खो-खो लीग घेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रजित जाधव यांनी दिली. ही लीग डिसेंबर महिन्यात घेण्याचे नियोजन होते. मात्र, आशिया गेम्स आणि खेलो इंडिया गेम्समुळे ही स्पर्धा फेब्रुवारीत घेण्यात येणार आहे. क्रिकेट लीगनंतर सर्वात महागडी लीग म्हणून खो-खो लीग असेल. या लीगला अल्टिमेट खो-खो असे नाव देण्यात आले आहे.


पुणे, नागपूर, दिल्ली किंवा बंगळुरू यापैकी एका शहरात या स्पर्धा होतील. अल्टिमेट खो-खो मूळ खो-खोला मोठे ग्लॅमर निर्माण होणार आहे. अल्टिमेट खो-खो स्पर्धा सुपर लीग पध्दतीची असेल. स्पर्धेतील संघाची निवड राष्ट्रीय खुल्या गटातील स्पर्धांमधून तसेच तालकटोरा दिल्ली येथे गेल्या महिन्यात झालेल्या निवड चाचणीतील खेळाडूमधून होणार आहे. या स्पर्धेत पाच परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात २० खेळाडूंना संधी मिळेल. लवकरच अंतिम खेळाडू आणि संघाची घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुंधाशू मित्तल आणि ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष राजू मेहता करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

डाबरने घेतले प्रायोजकत्व
अल्टिमेट खो-खोचे प्रायोजकत्व डाबर ग्रुपने घेतले आहे. अल्टिमेट खो-खोमुळे भारतीय खो-खो महासंघाला आठ कोटी रुपयांची रॉयल्टी प्राप्त होणार आहे. या रॉयल्टीच्या माध्यमातून अखिल भारतीय खो-खो स्पर्धापासून तर थेट तालुकास्तरीय स्पर्धांना फायदा होणार आहे. खो-खोला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ही लीग महत्त्वाची ठरेल.


महाराष्ट्रातील सर्वाधिक खेळाडूंना संधी
प्रो कबड्डीत सर्वाधिक खेळाडू हरियाणा राज्यातील आहेत. मात्र खो-खोची पंढरी असलेल्या महाराष्ट्रातून अल्टीमेट खो-खो मध्ये सर्वाधिक खेळाडू महाराष्ट्राचे असतील. या लिग मुळे महाराष्ट्रातील खो-खो खेळाडूंना सोन्याचे दिवस येणार असल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली.

नवीन खो-खोचा होणार उदय
अल्टिमेट खो-खो लीगमुळे नवीन खो-खोचा उदय होणार आहे. खो-खोच्या नियमांमध्ये अामूलाग्र बदल होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय खो-खो महासंघाने बदल केलेल्या नियमांमध्ये नव्वद टक्के बदल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सुचवलेले आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला व देशाला नवीन खो-खो पाहावयास मिळणार आहे.


एक वजीर चालेल सर्व चाली
अल्टिमेट खो-खोमध्ये वजीरचा जन्म होणार आहे. सद्य:स्थितीत रक्षक गटातील खेळाडू धावताना निश्चित दिशेत धावतो. मात्र आता नवीन खो-खोत एक वजीर असेल, जो कोणत्याही दिशेला धावू शकेल. त्याला फाऊल नसेल, नऊ खेळाडूंमधील या वजीरची जर्सी वेगळी असेल. या वजीरचा शोध महाराष्ट्र खो-खो असोसिएशननेच लावला आहे. बांद्रा येथील मैदानात याविषयी चार महिने सराव झाला. त्यानंतर दिल्लीत प्रात्यक्षिक झाले. शिवाय नुकत्याच पुद्दुचेरीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत वजीर खेळवण्यात आला.

X