Home | Maharashtra | Mumbai | Diamond merchant murder; Former minister of housing ministers arrested

हिरे व्यापारी हत्या; गृहनिर्माण मंत्र्यांच्या सचिन पवारसह अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यला अटक

विशेष प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:49 AM IST

आर्थिक वाद हेच हत्येचे कारण असल्याचा संशय

 • Diamond merchant murder; Former minister of housing ministers arrested

  मुंबई- घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार आणि ‘साथिया साथ निभाना’ या टीव्ही मालिकेत ‘गोपी बहू’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य यांची नावे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. दरम्यान, सचिन पवार याला घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी अटक केली असून देवोलिनाची कसून चौकशी केली. दुसरीकडे आरोपी सचिन पवार याच्याशी आपला सध्या काहीही संबंध नसल्याचा खुलासा मंत्री प्रकाश मेहता यांनी केला आहे. सचिन पवार याच्यासोबत पोलिसांनी देवोलिना भट्टाचार्य या हिंदी मालिकेमधील अभिनेत्रीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुवाहाटी येथे देवोलिना हिच्या वडिलांच्या घरीच सचिन पवार वास्तव्यास असल्याची बाबही पोलिस तपासात समोर आल्याचे समजते. उदानी यांच्या हत्येचे नेमके कारण काय असावे, याबाबत पोलिस तपास करत असले तरीही आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

  २८ नोव्हेंबरपासून व्यापारी राजेश्वर उदानी होते बेपत्ता
  घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर त्यांची कार बेवारस स्थितीत सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी पनवेलच्या गाढेश्वर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील झुडपांमध्ये एक मृतदेह सापडला. हा मृतदेह उदानी यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाची सूत्रे फिरली.

  विमानतळावरच पवारला पकडले
  पवार गुवाहाटी येथे एका मैत्रिणीच्या घरी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही मैत्रीण म्हणजे अभिनेत्री देवोलिना असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. तिच्या वडिलांच्या घरी गुवाहाटीत पवार वास्तव्यास होता, असे तपासात समोर येत आहे. पवार गुवाहाटीवरून मुंबईला येत असल्याची माहिती मिळाल्यावर विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.

  सचिन पवारचा संबंध नाही : मेहता
  एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मंत्री प्रकाश मेहता म्हणाले की, सचिन पवार २००४ ते २०१० दरम्यान माझा स्वीय सहायक होता. मात्र २०१२च्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारी त्याला दिली नाही म्हणून त्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून माझा आणि त्याचा कुठल्याही प्रकारे संबंध किंवा संवाद राहिला नव्हता.

  आर्थिक वाद हेच हत्येचे कारण असल्याचा संशय
  राजेश्वर उदानी यांच्या हत्येच्या नेमक्या कारणांचा पोलिस तपास करत असले तरी आर्थिक वादावरूनच ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. सचिन पवार सध्या मंत्री प्रकाश मेहतांसोबत कार्यरत नसला तरी घाटकोपरमध्ये भाजपच्या शाखेत तो सक्रिय होता, असे सांगितले जाते. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सचिन पवार याच्याऐवजी त्याच्या पत्नीला भाजपने पक्षाची उमेदवारी दिली होती.

  रिअल इस्टेटचाही व्यवसाय :

  हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांचा हिऱ्यांचा व्यापार होता. रिअल इस्टेट व्यवसायातही ते होते. ज्या दिवशी ते बेपत्ता झाले तेव्हा ते एका तरुणीला भेटून कारने निघाले. मात्र, पूर्व एक्स्प्रेस हायवेवरून जाताना रस्त्यातच त्यांचा मोबाइल बंद पडला होता.

Trending