आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांकडून वेळच मिळेना; सेनेची नाराजी नको म्हणून वेळ देत नसल्याची चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांना भाजपनेही आपल्या खेळीने पुरते नामोहरम केल्याचे दिसून येत आहे. राणे यांचा भाजपला फायदा होईल, असे वाटल्याने त्यांना भाजपतर्फे राज्यसभेवर पाठवण्यात आले. यासाठी भाजपने शिवसेनेची नाराजीही पत्करली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाराजी नको म्हणून राणे यांना दूर ठेवत आहेत. यासाठीच त्यांच्या मराठी आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचे म्हटले जात आहे. 


याबाबत नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ४ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठी आत्मचरित्राचे प्रकाशन केले जाणार अाहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे का, असे विचारता त्यांनी अजून काही ठरले नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री १ तारखेपासून महाजनादेश यात्रेवर असल्याने ते या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहाणार नाहीत हे नक्की झाले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-काँग्रेसचे बंडखोर आमदार नारायण राणे यांनी मे महिन्यात आपल्या राजकीय जीवनप्रवासाची गाथा सांगणारे “नो होल्ड बार्स- माय इयर्स इन पॉलिटिक्स’ हे आत्मचरित्र इंग्रजीत प्रकाशित केले. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याने आत्मचरित्र चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर काही दिवसांतच मराठीत आत्मचरित्र प्रकाशित करण्यात येणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितल्याचे राणे यांनी सांगितले होते. यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाच्या आयोजनाचीही त्यांनी तयारी केली. एवढेच नव्हे तर देशभरातून ३०० च्या आसपास नामवंतांना आमंत्रित करण्याची योजनाही त्यांनी आखली. परंतु मुख्यमंत्र्यांनी वेळच दिली नाही.


काँग्रेस सोडून राणे भाजपमध्ये जाणार होते. मात्र, शिवसेनेेने विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला आणि राणे यांनी तो मान्य करून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्यांना भाजपतर्फेच राज्यसभेवर पाठवण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय प्रचार समितीतही त्यांचा समावेश झाला होता. परंतु लोकसभेला त्यांनी स्वाभिमानी पक्षातर्फे उमेदवार उभे केले. काही ठिकाणी उमेदवारांना समर्थनही दिले होते.

 

मुख्यमंत्र्यांचे नक्की नाही : नारायण राणे
लोकसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अटी मान्य करून युती केली आणि चांगले यश मिळवले. विधानसभेलाही शिवसेना-भाजप युती असून राणे यांच्यामुळे युतीत खोडा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दूर ठेवल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच सतत पाठपुरावा करूनही फडणवीस यांनी राणे यांना पुस्तक प्रकाशनासाठी वेळ न दिल्याने त्यांचे मराठी आत्मचरित्र प्रकाशित होण्यापासून दूर राहिले आहे. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु अजून त्यांचे काही नक्की झालेले नाही. तरीही ४ ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशन होईल, असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...