Magazine / “डिजिटल लोकशाही”बदलते आयाम आणि आंदोलने

कार्यात्मक लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागाचे महत्त्व असते

अक्रम ढालाईत

Sep 01,2019 12:06:00 AM IST


लोकशाही ही माहिती व माध्यमाच्या प्रक्रियेशी जोडलेली असते. लोकांची निर्णयप्रक्रिया याच माहितीतून तयार होत संवादाची परिसंस्था बनते. संवादाची माध्यमं रेडिओपासून सोशल मीडियापर्यंत आलेली आहेत. लोकशाहीदेखील त्याच्याबरोबर स्वतःची कात सोडत पुढे जाताना दिसते. २०१० नंतर लोकशाहीचे हे डिजिटल स्वरूप सर्वांनी कळत नकळत पहिले आहे. माहिती व तंत्रज्ञानकाळाची परिमाणे याच काळामध्ये दिसायला लागली. मानवी उत्क्रांतीमधील ही पहिली वेळ असेल, ज्यामध्ये एकाच काळात फायदे व परिणाम भोगता येत आहेत. राजकीय रणांगणे केवळ मतदान प्रक्रियेपुरती मर्यादित राहिली नसून "माहिती-डेटा’ ही सत्ताकेंद्री आलेली आहेत किंबहुना माहिती हीच सत्ता झाली आहे. लोकांची इत्थंभूत माहिती सोशल मीडिया आणि "By using our Services, you are agreeing to these terms’ या प्रायव्हसी आणि टर्ममधून आपण दिलेली आहे.अलगोरिथम आणि सांख्यिकीय विश्लेषणांतून पुढील प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. जगातल्या कोणत्याही व्यक्तीची ओळख, त्याची आवडनिवड, राजकीय विचार, सामाजिक स्थान, कौटुंबिक माहिती एका क्लिकद्वारे मिळू शकणारी यंत्रणा उपलब्ध आहेत. एकूणच सामाजिक माध्यमं लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठीच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. त्याची उदाहरणे ब्रेक्झिटपासून ते हाँगकाँगच्या सध्याच्या आंदोलनापर्यंत पाहता येतील.


प्रत्यार्पण विधेयकाला विरोध करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या हाँगकाँग आंदोलनाच्या पद्धतीची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय. लोकशाही हक्काच्या होणाऱ्या पायमल्लीविरोधात हे आंदोलन पेटलेले आहे. पोलिस आणि राज्य संस्था आंदोलन दडपण्यासाठी हवे ते करताना दिसत असले तरी आंदोलक मागे हटताना दिसत नाहीत. पोलिंसाकडून पाण्याच्या फवाराचा मारा होताना एक विशिष्ट प्रकारचा रंग आंदोलकांवर लेसरच्या माध्यमातून टाकला जातोय, जेणेकरून त्या आंदोलकांची ओळख पटू शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हाय डेफिनेशन कॅमेऱ्याद्वारे आंदोलकांचे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.आंदोलन फोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत असताना आंदोलकही तितक्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. हाय डेफिनेशन कॅमेऱ्यावर आंदोलकांकडून हिरव्या आणि निळ्या रंगाच्या लेसर किरणांचा मारा केला जातोय, ज्यामुळे कॅमेऱ्यातून फोटो घेता येत नाही. गेल्या काही दिवसांत अशा लेसर टॉर्चची मागणी वाढलेली दिसतेय. पोलिस लेसर टॉर्च विकणाऱ्या आणि वापर करणाऱ्यांना पकडत आहेत. अशा पद्धतीच्या कॅमेऱ्यांचा वापर करण्यासाठी हाय स्पीड इंटरनेट सेवा पोलिसांना दिली जात आहे, ज्यामधून आंदोलकांचे वर्तन, भाषा, पेहराव, चेहऱ्यावरील भाव ओळखून पुढील डावपेच आखले जातात. माहिती तंत्रज्ञान काळात अशी आंदोलने जगाच्या इतिहासात पहिल्यांदा होताना दिसत आहेत. हिंसा आणि हिंसेची भाषा बदलत असताना त्याचे प्रत्युत्तर हाँगकाँग आंदोलकांकडून तितक्याच आधुनिक पद्धतीने दिले जात आहे.


आंदोलकांची तयारी,पोशाख, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे आंदोलनाचे भविष्यातील स्वरूप कसे असू शकते याची प्रचिती येताना दिसतेय. राज्य संस्था आणि पोलिस वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलकांनी त्यावर उत्तर शोधलेले दिसते. सिम्बॉलिक किंवा चिन्हांच्या स्वरूपात बोलणे असेल, एका ठिकाणी जास्त वेळ न थांबता "बी वॉटर’ या संकल्पनेचा वापर करत गर्दी दूर करणे असेल, पोलिसांच्या अश्रुधुराच्या गोळ्यापासून वाचण्याच्या नवीन पद्धती शोधणे असेल तसेच घरगुती वस्तू वापरून पोलिसांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव केला जातोय. चेहरा ओळखला जाऊ नये म्हणून मास्क वापरला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रंग पुसला जात आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया कम्युनिकेशन सिस्टिमद्वारे आंदोलकांची ओळख शोधली जात असल्याने आंदोलकांनी फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि लोकल मोबाइल अॅप डिलीट केले आहे.
भारतातली आंदोलने या तुलनेने कुठे आहेत, याचा अभ्यास यानिमित्ताने होऊ शकेल. भारतीय आंदोलनाची सामाजिक मानसशास्त्रद्वारा दिशा समजू शकते. काही अपवाद वगळता भारतीय आंदोलने ही जाती-वर्ग-लिंगभाव-धर्माच्या चौकटीत अडकलेली दिसतात. तात्पुरती संवेदनशीलता, प्रलोभनं, सातत्याचा अभाव अशी समान गुणवैशिष्ट्ये या आंदोलनात आहेत. गेल्या दशकातील आंदोलनांचा मागोवा घेतला तर लक्षात येऊ शकेल की, आंदोलनामध्ये भाग घेणारे लोकं कोण आहेत आणि त्यांची त्यामागची मानसिकता किती तात्पुरती आहे. जनलोकपाल बिल पास करण्यासाठी झालेले आंदोलन, निर्भया आंदोलन ही काही ताजी उदाहरणे. कोणतीही पूर्वतयारी नसलेले, इंटरनेट तंत्रज्ञानाचा कळेल तितका वापर करणारे लोक,पारंपरिक घोषणा आणि व्यक्तिकेंद्रित आंदोलने फार काळ टिकू शकत नाही हे याने सिद्ध झाले.


किसान मार्च आंदोलनात शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा काढलेला लॉँगमार्च हे भारतीय आंदोलनातील विषमतेचे उत्तम उदाहरण. सुरुवातीचे २-३ दिवस माध्यमांनी दखल न घेतलेले आंदोलन काही वेळातच सोशल मीडियावर धडकले. लोक आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पाठिंबा दर्शवत होते, काही आंदोलकांच्या पायांची कातडी निघालेले फोटो स्वतःची फेसबुक प्रोफाइल आणि कव्हर फोटो म्हणून लोकांनी वापरले. व्हर्च्युअल पाठिंबा आणि भासात्मक संवेदशीलता ही आपल्या आंदोलनाच्या वैशिष्ट्यंापैकी एक वैशिष्ट्य. "मी टू' हे कामाच्या ठिकाणी महिलांसोबत होणारे अत्याचार समोर आणणारे असेच एक आंदोलन. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे समोर आले. सोशल मीडियाद्वारे महिलांकडून आरोप होत होते, ज्याला सोशल मीडियावर पाठिंबादेखील मिळत होता.ऑनलाइन आंदोलनाचा हा प्रकार.भारतामधील ही आंदोलने जरी इंटरनेट तंत्र वापरत असली तरी त्याची तीव्रता खूप कमी आहे.


कार्यात्मक लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागाचे महत्त्व असते. हाँगकाँगसारख्या आंदोलनातून डिजिटल लोकशाही आणि इंटरनेट माहिती काळात आंदोलने कशी असायला हवीत याची प्रचिती साऱ्या जगाला मिळाली आणि आंदोलनाची व्याख्याच बदलली. काळानुसार लोकशाही बदलते आणि लोकशाहीला आकार देणारी आंदोलनेही बदलायला हवीत. इंटरनेट ज्याला मानवी इतिहासात स्वातंत्र्याचे बलस्थान मानले जात होते, त्याचे निरंकुश पद्धतीने धोकादायक तंत्रात रूपांतर केले जात आहे. इंटरनेट एकूणच मानवी सभ्यतेसाठी धोकादायक ठरत आहे.


"वास्तव/सत्य समजून घायच असेल तर सत्य कोणीच तुम्हाला सांगू शकणार नाही. सांगितले तर केवळ त्याची आवर्ती सांगू शकतील.जर तुम्हाला सत्य जाणायचं आहे तर ते तुम्ही स्वतःला शोधावे लागेल. खरी सत्ता कोणत्याही घटनेच्या पलीकडे पाहण्यामध्ये असते. जोपर्यंत तुम्ही शोधात राहता, त्यांच्यासाठी तुम्ही धोकेदायक असता. हीच त्यांची भीती असते.’ आंदोलनाची गरज लोकशाहीमध्ये वास्तव शोधण्यासाठी असते.

X
COMMENT