आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः सचिन दरेकर लिखित आणि दिग्दर्शित “पार्टी” या मराठी सिनेमात काम करणारी अभिनेत्री मंजिरी पुपाला या अभिनेत्रीच्या बाबतीत 'किस'चा किस्सा सिनेमाच्या सेटवर घडला.
मंजिरीने सांगितले, "माझ्या 'पार्टी' सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. नेहमीप्रमाणे मी सेटवर पोहोचले. त्या दिवशी एक गाणं चित्रित होणार होतं म्हणून मी तयारी करून बसले. तेवढ्यात सिनेमातील कलाकार सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे आणि रोहित हळदीकर माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले की 'तू रेडी आहेस ना? भिऊ नकोस...' असं बोलू लागले. काही क्षण मला कळेचना की हे सर्व असे काय बोलताहेत. मग त्यांनीच सांगितले की, या गाण्यात तुला एक 'किसिंग' सीन द्यायचा आहे. हे ऐकूनच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा असं काही नव्हतं. म्हणून मग मी दिग्दर्शक सचिन दरेकर यांच्याकडे गेले. त्यांनीसुद्धा सांगितले की 'अचानक स्क्रिप्टमध्ये बदल करावा लागला. पण तू तुझा वेळ घे, रेडी झाली की, मला सांग'.
दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने मी खूपच हादरून गेले होते. भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते की स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. आता मला तर सेटवरच रडू कोसळलं. जरा वेळ मला रडतांना पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. मी पुन्हा संभ्रमित झाले. काही कळण्याच्या आतच दिग्दर्शक सचिन दरेकर यांनी सांगितले की, 'आज आम्ही सगळ्यांनी तुझी फिरकी घायचे ठरवले होते'. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि गाण्याचं शुटींग पार पडलं".
'पार्टी' हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. 'पार्टी' या सिनेमाद्वारे मंजिरी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील मंजिरीने निशा हे पात्र वठवले होते. या मालिकेत ती राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' या सिनेमात मंजिरीने दीपाली नावाच्या एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच पल्लवी जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'ग्रहण' मालिकेत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.