Home | Star Interview | Dilip Prabhavalkar talk about their role Gandhi

मुन्नाभाईचे बापू म्हणतात....गांधीजींच्या भूमिकेने मला माणूस म्हणून समृद्ध केले: सिनेमापलीकडे समाजमनावर दीर्घकाळ प्रभाव दिसला

दीप्ती राऊत | Update - Jan 30, 2019, 06:33 AM IST

त्या व्यक्तिरेखेने एक माणूस म्हणून मला दिलेली श्रीमंती आजही कायम आहे

 • Dilip Prabhavalkar talk about their role Gandhi


  'लगे रहो मुन्नाभाई' मधील बापू साकारून एक तप पूर्ण झाले. परंतु आजही त्या व्यक्तिरेखेने एक माणूस म्हणून मला दिलेली श्रीमंती कायम आहे. आव्हानात्मक भूमिका मी अनेक केल्या. पण गांधींची भूमिका जबाबदारीची होती. त्यासाठी खूप तयारी करावी लागली. त्याच भूमिकेने मला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला. एक नट म्हणून या मूल्यांचा माझ्यावरही परिणाम झाला. माणूस म्हणून त्या भूमिकेने मला समृद्ध केलेे. सिनेमापलीकडे समाजमनावर दीर्घकाळ प्रभावही दिसला. या सिनेमानंतर सामाजिक बदल, प्रतिस्पर्ध्याचे मतपरिवर्तन करण्यासाठी गांधीगिरी'ची एक सकारात्मक लाट आली. 'गेट वेल सून'चे साधन जन्माला घातले. खरे तर त्या सिनेमातील नायिकेच्या आजोबांच्या वृद्धाश्रमातील एका वृद्धाच्या भूमिकेसाठी मला प्रथम विचारणा झाली होती. त्यासाठीची स्क्रीन टेस्ट सुरू असताना मीच त्यातील गांधींची भूमिका करावी, असे दिग्दर्शक राजकुमार हिराणींना वाटले. माझी उंची, चेहरा गांधींसारखा नव्हता. ती भूमिका करण्यासाठी बॉलीवूडमधील बरेच बडे नट उत्सुक होते. शेवटी तब्बल साडेतीन तास मेकअप करून माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. मेकअप झाला. दिग्दर्शक म्हणाले, काही तरी करून दाखवा. मला जसे सुचले तसे मी केले. त्यांची उपडी मांडी, त्यांचे झपझप चालणे, हातवारे... दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. बापूंच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती.


  राष्ट्रपित्याची अत्यंत जबाबदारीची भूमिका मला साकारायची होती. माणूस म्हणून गांधी समजून घेताना त्यांच्या स्वभावातील प्रेम, बंधुभाव, करुणा, अहिंसा, सत्य, सहानुभूती आणि सहवेदना ही मूल्ये अभिनेता म्हणून मला जे भावले ते समजून घेऊन, रिचवून बापूंच्या भूमिकेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला. द्वेष, कडवटपणा, कारस्थान, कपट हे सारे बाजूला ठेवून त्यांनी लढे दिलेले होते. द्वेषाचा विरोध प्रखर विद्वेषाने नाही, तर प्रेमानेच होऊ शकतो, अन्यायाला उत्तर न्याय आहे, त्याप्रमाणे हिंसेचा सामना अहिंसेनेच शक्य आहे हे मूलभूत तत्त्वज्ञान त्यांनी जगाला दिले.


  वेशभूषेचे होते आव्हान...
  त्या चित्रपटासाठी गांधींची वेशभूषा हे खूप मोठे आव्हान होते. दररोज दोन-अडीच तास माझा मेकअप चाले. चेहऱ्याची कातडी ताणून सुरकुत्या तयार केल्या जात, माझा रंग बदलला जाई. कृत्रिम कान आणि कृत्रिम नाक बसवले जाई. तो मेकअप खूप त्रासदायक होता. तीच माझी कसोटी होती. शांतपणे त्या रूपात जाताना त्यांचे स्वभाववैशिष्ट्य मी आत मुरवून, चेहऱ्यावाटे, देहबोलीद्वारे भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.


  थोरांनी गौरवलेले दुर्मिळ थोरपण
  हा अभ्यास करताना मला जाणवले ते जगभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी नावाजलेले गांधी हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. आइन्स्टाइन, चार्ली चॅप्लिन, व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, दुसऱ्या महायुद्धातील मित्रराष्ट्रांचे सरसेनापती जनरल मॅकअर्थर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील थोर मंडळींनी गांधींची थोरवी मान्य केली. भूतलावर असा माणूस होणे नाही' या शब्दांत आइन्स्टाइननी त्यांचा गौरव केला. वंशवादाविरोधात लढणारे मार्टिन ल्यूथर किंग यांच्यापासून नेल्सन मंडेलांपर्यंत जगभरातील मानवतावादी नेत्यांना गांधी आणि त्यांची शिकवण प्रेरणा देणारी, स्फूर्तिदायक ठरली.

  या पुस्तकात मला गांधींमधील 'माणूस' सापडला
  या भूमिकेसाठी मी गांधींचे प्रत्यक्ष चित्रण असलेल्या फिल्म डिव्हिजनच्या फिल्म्स पाहिल्या. त्यांच्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप्स ऐकल्या. पण त्यात ते जनतेशी बोलत होते. या सिनेमात त्यांचा मुन्नाभाईशी संवाद होता. त्यासाठी त्यांना माणूस म्हणून समजून घेणे गरजेचे होते. ते काम अमेरिकन पत्रकार लुईस फिशर यांच्या alt147महात्मा गांधी - हिज लाइफ अँड टाइम्स' या पुस्तकाने केले. या पत्रकाराने गांधींसोबत राहून, फिरून हे पुस्तक लिहिले आहे. त्यात व्यक्तिपूजा नाही. त्यामुळे सर्व गुणदोषांसह माणूस म्हणून गांधी मला कळले.

Trending