आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दसामर्थ्यावर रंगवलेली धमाल ‘थट्टामस्करी’!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. रवींद्र तांबोळी हे विनोदी लेखकांच्या मालिकेत आज आघाडीवर असलेल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत. वृत्तपत्रे आणि मासिकांच्या मागणीनुसार त्यांनी विनोदी लेखन केले. निमित्ता-निमित्ताने लिहिताना वाचकांना हसवणे, आनंद देणे आणि जाता-जाता समाजातील वैगुण्यावर बोट ठेवण्याचे काम ते अतिशय हसत-खेळत करत आले आहेत. ही मिष्किली केवळ हसण्यापुरती मर्यादित नाही, त्यात निरीक्षण, अनुभव आणि वेळप्रसंगी जीवनदर्शनही अनुभवता येते. वाचल्यानंतर आपण नक्कीच म्हणाल : ‘अरे वाऽऽ, पुन्हा पुन्हा वाचायला हवे!’

 

भाषेवर प्रभुत्व असले तर एखादी साहित्य कलाकृती कशी धमाल उडवून देते याचे निखळ उदाहरण म्हणून "थट्टा मस्करी "या डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या नव्या पुस्तकाबाबत म्हणता येते. वाचकाला एकट्याला स्वतः शी हसायला लावणारा विनोद त्यांनी केवळ क्वचितच वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या वापराने अतिशय सुरेखपणे फुलवला आहे. मराठी भाषेचे सौंदर्य, लवचिकता,अर्थवैविध्य याचे समर्पक भान राखून त्यांनी मराठी विनोदात आपली थट्टा मस्करी दाखल करताना आपल्या अनोख्या शब्दशैलीने विजयी षटकार फटकावला आहे, तो ही  कै.पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे महत्वाचे मानायला हवे .


वाड्मयीन उदासीनतेचे भान त्यांना अचूक असावे, कारण स्वतः च्या लिखाणाला स्वतः ची प्रस्तावना "रुजुवात" या शिर्षकाने  देऊन त्यानी प्रारंभालाच हास्याचा फटका तडकावला आहे. तर आपली थट्टा मस्करी संपवताना "महाराष्ट्राची पहिली कविगणना "करून,कवीचे  २६ प्रकार देऊन  प्रत्येक वाचकांचे मन जिंकणारा उत्तुंग षटकार ठोकला आहे .


स्वतः वरचा विनोद, निवेदनपर विनोद, तपशीलातून विनोद ,कथात्मक मांडणीतून विनोद अशा अनोख्या आस्वादात्मक  लिखाणातून तांबोळीची लेखणी मौज,मजा,मस्ती करत एकेका समाजधुरीणांचा दंभस्फोट करत त्यांचा बुरखा उतरवत राहते. भंपक व लबाड असूनही समाजात प्रतिष्ठीतपणे वावरणाऱ्या संतमहंत,बुवा,अधिकारी, व्यावसायिक व नेत्यांचा मुखवटा उतरवताना तांबोळीची प्रतिभा कमालीची बहरलेली असून वाचणाऱ्याला खळखळवून हसवताना ती तितकेच अंतर्मुखही करायला लावते. "थोर आंबटशौकीन नारायणराव एक जीवनशोध’ व "मन्मथरावांचे अनुकरणीय आयुष्य" या दोन लेखातून ही प्रचिती घेताना हसत हसत विचारमग्न व्हायला लावणारे तपशील म्हणजे अस्सल साहित्य काय, याचे उत्तम उदाहरण आहे. कुठल्याही दर्जेदार साहित्यिकाचे समाजभान अत्यंत सजग असावे लागते तेव्हाच त्याला सामाजिक विषयावर संतुलित भाष्य करता येते. असे भाष्य जेव्हा विनोदातून केले जाते तेव्हा सामाजिक विसंगतीमागील स्थायी वृत्ती ज्ञात असण्याचा आवाका लेखकाचा असावा लागतो. तांबोळीची लेखणी असा आवाका राखून आपल्या प्रत्येक लेखातून जे मनमुराद फटकारे ओढते ते वाचून हसत खेळत अवाक व्हायला होते. भाषेवरच्या प्रभुत्वामुळे कोट्या,चमत्कृती किंवा ओढून ताणून भाष्य न करता ते सहजपणे समाजवृत्तीवर जे निवेदनपर,संवादरूपी वा तपशीलातून भाष्य करत राहतात ते वाचणे म्हणजे परिपूर्ण विनोद कसा असावा याचा वस्तुपाठ होय. याचा अनुभव घेण्यासाठी "मेकिंग ऑफ हायटेकबाबा; संत तांबुलनाथ, कहाणी एका राहून गेलेल्या लग्नाची, व्यावहारिक संतांचे व्यावहारिक विचार, जे जे हरवले आजवरी, हे कथारूपी लेख आवर्जून वाचले पाहिजेत. विनोदाला अमरत्व लाभवायचे असेल तर लिहिणाऱ्याला मानवी वृत्तीवर त्यातील विसंगती शोधून भाष्य करण्याचे कसब लागते व ती हातोटी अंगभूत असावी लागते. गंभीर चिंतनाला हसत खेळत वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य असेल तरच हे शक्य होते. तांबोळीच्या लेखणीत हे सारे गुण आटोकाट भरले असून विनोदाचा एक आगळाच  डौलदार बाज  त्यांचा स्वतःचा आहे . "गुगल ब्रह्म, गुगल विष्णू..",दे रे हरी पलंगावरी.. माझा मोबाईल व्हायब्रशनवरी "..जे मीठ खाता त्यालाच जागा ,रोख देऊनी क्वार्टर मागा... ,"अश्या सुभाषितांनी, फटक्यांनी, म्हणींनी ताजीतवानी मराठी भाषा मांडणाऱ्या तांबोळीची लेखणी "मार्गव्याकुळा, बद्धबुद्धी, दृष्टिस्फोट ,बडबड बाविशी,तेढ तेविशी "असे अनेक आगळेच शब्द भाषेला बहाल करून भन्नाट मजा आणते. विनोदी लिहिणाऱ्या साहित्यिकांमध्ये समाजमनात डोकावण्याची एक वेगळी दृष्टी असली तर वर्तमानातल्या समस्या कशा चिरंतन असतात हे दाखवून देण्याचे सामर्थ्य मिळवून देते ."तंत्रज्ञान बिघडवले जगणे, संतांचे वाहनविचार व पौराणिक उद्योगपती ते वर्तमानी मध्यमवर्गीय ",या तीन लेखातून स्वतः वर  विनोद करताना व वर्तमानातील तंत्रज्ञानाच्या विषयांच्या  उपयोगाने पालथे उद्योग करणारे घराणे म्हणून स्वतः ची जी थट्टा करत त्यांनी जी दृष्टी दाखवली आहे ती अजोड आहे. संत तांबुलनाथ, थंडा महाराज, आनंदबुवा, संत जयेश्वर अशा पात्रांची गरजेनुसार निर्मिती करून, तृतीयपुरुषी निवेदन करताना विनोद विषयाची  कसदार मांडणी करत तांबोळीनी विषयवैविध्यातही निव्वळ विनोदाचा महापूर आणला आहे. तांबोळीच्या रूपाने मराठी विनोदी साहित्याला एक चांगला लेखक मिळाला असल्याने त्यांच्या थट्टा मस्करीचा आस्वाद घेताना लेखकाचे दोष दाखवणेही औचित्याचे आहे. विस्मरणात गेलेल्या मराठी शब्दांचा त्यांनी वापर करताना यापुढे किंचित लगाम घालावा असे सुचवावे वाटते. त्यांच्या काही लेखात त्यांनी दीर्घ वाक्यांनी असा लेख सजवला आहे. हे टाळून त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांनी लेख लिहिण्याचे परिश्रम घेतले तरी चालणार आहे असे वाटते. तांबोळीचे विनोदी लिखाण हे बौद्धिक प्रकारचा विनोद या वर्गात मोजावे लागते. अनेकानेक वाचकांना रुचेल असा हा प्रकार नसल्याने यावर त्यांनीच जाणीवपूर्वक नियंत्रण आणणे औचित्याचे राहणार आहे. काहीवेळा त्यांना परिस्थितीजन्य विनोद करण्याचा अनावर होणारा मोह टाळावा लागणार आहे.


क्षीण झालेल्या वाचनसंस्कृतीच्या कालखंडात तुलनेने हे दर्जेदार पुस्तक आल्याने त्यांची ही थट्टामस्करी मात्र वाचेल त्याला अवडणारीच ठरेल असा माझा कयास आहे . रवींद्र तांबोळी यांच्या कुटुंबाशी माझा दीर्घ ऋणानुबंध असल्याने त्यांच्या चौफेर वाचनाविषयी मला  नेमकी माहिती आहे. आपल्या स्व प्रस्तावनेत त्यांनीच म्हणल्याप्रमाणे त्यांचा रूढी,परंपरांचा व संस्कृतीचा जो अभ्यास आहे त्याचा यथोचित वापर करून यापुढे आपला विनोदी नजराणा त्यांनी सजवावा ही अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही . कै.पु लं देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात एक चांगले विनोदी साहित्य वाचायला मिळणे ही एक तशी त्यांना आदरांजली म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. पद्मगंधा प्रकाशन,पुणे यांची ही नेहमीप्रमाणे छान निर्मिती असून पांडुरंग वझे यांचे मुखपृष्ठ आकर्षक व समर्पक असेच आहे. मुखपृष्ठाची रंगसंगतीही सुखावणारीच आहे .

 

प्रा .दिनकर कुलकर्णी
p.padmagandha@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८६०८१५४४४ 

 

“थट्टामस्करी’
लेखक - रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी {प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन, पुणे  {मुखपृष्ठ - पांडुरंग वझे  {पृष्ठे - १४०, किमत - रू.१८०

बातम्या आणखी आहेत...