आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 काेटींच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची चाैकशी कनिष्ठ अशा उपायुक्तांकडून कशी?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूररोडवरील सर्व्हे क्रमांक ७०५ मधील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या संपादनापोटी घाईघाईत २१ काेटी रुपये अदा करण्याचे प्रकरण पुन्हा पेटले असून याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा हात असल्याचे आराेप लक्षात घेता त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अशा उपायुक्त दर्जाचा अधिकारी कशी चाैकशी करू शकताे असा राेखठाेक सवाल आता सभागृहनेता दिनकर पाटील यांनी केला आहे. हा प्रश्न व्यवहार्य असल्याची चर्चा झाल्यानंतर तसेच नियमित नगररचना सहायक संचालक म्हणून सुरेश निकुंभे रुजू झाल्यावर नवीन सदस्य म्हणून सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

गंगापूरोडवरील आकाशवाणी केंद्रानजीक सर्व्हे क्रमांक ७०५ मधील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या संपादनापोटी उर्वरित २१ कोटींचा निधी स्थायी समितीची मान्यता न घेता प्रशासनाने अदा केल्यामुळे वाद पेटला. स्थायी समिती सभेत प्रभारी नगररचना सहायक संचालक उदय धर्माधिकारी यांनी नियमबाह्य वाटप झाल्याचा गाैप्यस्फाेट केला हाेता. त्यानंतर याप्रकरणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामार्फत स्थायी समिती सभापती हिमगाैरी आडके-आहेर यांनी चाैकशी सुरू केली. गमे यांनी हरिभाऊ फडाेळ व किशाेर पाटील यांची समिती गठित केली हाेती. याप्रकरणात प्रभारी आयुक्त म्हणून काम करणाऱ्या राधाकृष्णन बी. यांनी घाईघाईत धनादेश काढल्याची बाब चर्चेचा विषय हाेता. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाविषयी संशय व्यक्त केला हाेता. त्यांनी अग्रवाल या उपअभियंत्याला बंगल्यात बाेलावून हे प्रकरण मार्गी लावल्याचा आरोप हाेता.

 

दरम्यान, आता गमे यांची चाैकशी समिती अडचणीत अाली असून समितीबाबत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची चौकशी पालिकेचे अधिकारी कशी करू शकतात असा त्यांचा सवाल आहे. दरम्यान, प्रशासनाने कातडीबचाव करताना देयक अदा करण्याच्या प्रवासात काही अनियमितता झाली काय याची चौकशी हाेणार असल्याचा दावा केला. तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर देयक प्रवासात त्रुटी आढळल्या तरच शासनाकडे याबाबत अहवाल पाठवला जाणार आहे. मात्र, देयकाचा प्रवास हा स्वयंचलित नसल्यामुळे त्यात काेणत्या अधिकाऱ्यांचे हात लागले याचा शाेध लागणार का हा प्रश्न आहे.

 

शिवसेनेकडून एसीबीमार्फत चाैकशीची मागणी 
स्थायी समिती सभेत शिवसेनेत या प्रकरणात दाेन गट पडल्याचे चित्र आहे. प्रवीण तिदमे यांनी मात्र स्थायीतील भूमिकेवर ठाम राहत महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आणि स्थायी समिती सदस्यांचा रक्कम देण्यास विरोध असतांनाही सर्व्हे क्रमांक ७०५ या जागेच्या भूसंपादनात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.महापालिकेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी, जागा मालक आणि उत्कर्ष वाघ यांच्या भ्रमणध्वनी, दूरध्वनीवर झालेल्या कॉल्सचे रेकॉर्ड तपासावे आणि या भूसंपादनाच्या कार्यवाहीची सखोल चौकशी करावे असे पत्र दिले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...