आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत वाचाळ बरळती बरळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री उमेदवाराच्या अंंतर्वस्त्रांपासून पंतप्रधानांच्या चड्डीपर्यंत आणि देवादिकांच्या जातीपासून महिला नेत्यांच्या चारित्र्यापर्यंत... सध्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू असलेली सर्वपक्षीय वाचाळ नेत्यांची एकेक विधाने ऐकली की सभ्यता, तारतम्य, विवेक आणि लाज यांचा पूर्णपणे ऱ्हास झाल्यानंतर जे काही शिल्लक राहते ते म्हणजे भारतीय राजकीय संस्कृती, असंच म्हटले पाहिजे. प्रचाराचीच पातळी इतकी खालावली आहे की देश म्हणून आपल्या प्रगतीची, विचारांची आणि नैतिकतेची पातळी खालावल्याचे ते द्योतक आहे, याचा ज्याने त्याने आपापल्या डोक्याने विचार करण्याची ही वेळ आहे. 

 

ही राजकीय मंडळी असे का वागत असावी? हीच त्यांची प्रवृत्ती असते का? की त्यांच्याकडून अजाणतेपणी हे घडून जाते? ही त्यांचीच बुद्धी असते की त्यांना असे बोलायला आणि वागायला सांगितले जाते? राजकीय पक्षांच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्या ‘तज्ज्ञां’कडून बहुतेक वेळा वादग्रस्त विधाने करण्याचे नियोजन केले जाते.

 

‘राजकीय व्यवस्थेतील वर्तनास नियंत्रित करणारे मूलभूत समज आणि नियम तयार करणारी मनोवृत्ती, श्रद्धा आणि भावनांचा संच म्हणजे राजकीय संस्कृती’, अशी ढोबळ व्याख्या समाजशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय विश्वकोशात करण्यात आली आहे. ती समजून घेण्यास कठीण वाटत असेल तर सध्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू असलेली सर्वपक्षीय वाचाळ नेत्यांची पुढे नमूद केलेली भाषणे आणि त्यातील विधाने आठवून पाहा. 


समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी प्रतिस्पर्धी महिला उमेदवार जयाप्रदा यांचे नाव न घेता त्यांच्या अंतर्वस्त्रांविषयी विधाने केली. त्या संदर्भात जया यांनी हरकत घेतल्यानंतर आपण ही विधाने करताना कोणाचे नाव घेतलेले नाही, असा शहाजोग खुलासाही त्यांनी केला. आपण जे काही बोललो ते असभ्य होते आणि त्या संदर्भात किमान दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, या भावनेचा लवलेशही या माणसाच्या ठायी दिसलेला नाही. याच माणसाने या आधी आपल्या फोटोंना विकृत आणि अश्लील स्वरूप देऊन ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही जयाप्रदा यांनी केला आहे. त्या प्रकरणात काय कारवाई झाली, याचा कोणालाही थांगपत्ता नाही. याच पक्षाचे एक नेते एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते, जयाप्रदा यांची गाडी जेव्हा माझ्या जवळून पुढे जाते त्या वेळी मला सारखे असे वाटत असते की त्या आता गाडीतून उतरतील आणि नाचायला लागतील. अर्थात, आझम खान यांच्या तुलनेत हे विधान बरेच सभ्य म्हणायचे. त्यामुळेच कदाचित जयाप्रदा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. याच पक्षाने उमेदवारी दिलेल्या तेजबहादूर यादव या माजी सैनिकाने दारूच्या नशेत असताना ५० कोटी रुपये मिळाले तर नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची तयारी दाखवली आहे. त्याचा उमेदवारी अर्ज छाननीत टिकाला नाही ही बाब वेगळी. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेली टीका सहन झाली नाही. त्यातून त्यांनी, ‘ज्या वेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचे नियोजन करत होते त्या वेळी नरेंद्र मोदी चड्डी घालायलाही शिकले नव्हते’ असे जाहीर करून टाकले. 
तथाकथित संस्कृतिरक्षक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतेही या बाबतीत काही मागे राहिलेले नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त हनुमान कोणत्या जातीचा होता, याचेच प्रमाणपत्र जाहीरपणे बहाल केले. याच पक्षाचे नेते विनय कटियार यांनी तर थेट यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चारित्र्यावरच हल्ला केला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे राजीव गांधी यांचेच पुत्र आहेत का, याचे स्पष्टीकरण कटियार यांनी सोनियांकडे मागितले. मुंबईतले या पक्षाचे उमेदवार खासदार गोपाळ शेट्टी यांनी ऊर्मिला मातोंडकर यांच्या सुंदर दिसण्याला भाळून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, असा ‘गौप्यस्फोट’ केला. विद्यमान केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी बिहारमध्ये प्रचार करताना माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना घुंघटमध्येच राहण्याचा सल्ला दिला. हिमाचल प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंग, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई हेदेखील या बाबतीत मागे राहिलेले नाहीत. भाजपमधील ही जंत्रावळी कमी म्हणून की काय, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उघड उघड धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घालणारी विधाने आपल्या भाषणांमधून केली आहेत. यातल्या अनेक प्रकरणांत निवडणूक आयोगाने भाषण बंदीसारख्या शिक्षा दिल्या, पोलिसांनी काही प्रकरणांत गुन्हे दाखल केले, महिला आयोगानेही काहींना नोटिसा बजावल्या. पण कोणाला काहीही फरक पडलेला नाही. साधी दिलगिरी व्यक्त करण्याची उपरतीही कोणाला झालेली नाही. अर्थात, निवडणूक आयोगाचे 
निर्णयही पक्षपाती असल्याचेच अनेक बाबतीत समोर आले आहे, हेही नमूद केलेच पाहिजे.


सभ्यता, तारतम्य, विवेक आणि लाज यांचा पूर्णपणे ऱ्हास झाल्यानंतर जे काही शिल्लक राहते ते म्हणजे भारतीय राजकीय संस्कृती, असा नव्या पिढीचा समज व्हावा, अशीच ही परिस्थिती नाही का? स्त्री उमेदवाराच्या अंतर्वस्त्रांपासून पंतप्रधानांच्या चड्डीपर्यंत आणि देवादिकांच्या जातीपासून महिला नेत्यांच्या चारित्र्यापर्यंत कशाचाही वापर राजकारणासाठी करताना कोणालाही संकोच किंवा लाज वाटलेली नाही. उलट असली असभ्य आणि हीन भाषा वापरताना समोर बसलेल्या श्रोत्यांना चेकाळताना पाहून आपण मोठाच तीर मारल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यातूनही जाणवत राहिला आहे. हेच आहे का भारतीय विकासाचे ‘माॅडेल?’  ही राजकीय मंडळी असे का वागत असावी? हीच त्यांची प्रवृत्ती असते का? की त्यांच्याकडून अजाणतेपणी हे घडून जाते? ही त्यांचीच बुद्धी असते की त्यांना असे बोलायला आणि वागायला सांगितले जाते? धक्कादायक माहिती अशी आहे की, राजकीय पक्षांच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्या ‘तज्ज्ञां’कडून बहुतेक वेळा वादग्रस्त विधाने करण्याचे नियोजन केले जाते. अनेकदा उमेदवार स्वत:च्या प्रचार नियोजनासाठी असे तज्ज्ञ सल्लागार नेमतात आणि हे सल्लागार त्यांना असे काही तरी वादग्रस्त बोलण्याचा सल्ला देतात, असे या नियोजनकारांपैकीच काहींचे म्हणणे आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माध्यमांशी बोलताना त्यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. ठरवून केलेली ही वादग्रस्त विधाने सुनियोजित असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून करायच्या प्रचारातील ते एक प्रसिद्धी तंत्र आहे, असे या प्रचार व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. जर हे प्रचार व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत तर त्यांच्या उमेदवाराचा प्रभावी प्रचार करण्यासाठी त्यांना सभ्य, विवेकी उपाय सापडत नसावेत का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण ज्या ठिकाणी मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी सुपीक जमीन असते त्या ठिकाणी अशा प्रचारतंत्राचा उपयोग होतो, असा दावाही हे प्रचारतज्ज्ञ करतात. 


शाश्वत लोकशाहीसाठी काम करणाऱ्या संशोधकांच्या एका समूहाचे प्रमुख असलेले अनुप शर्मा यांच्या मते प्रचार सल्लागार असा सल्ला देतात हे अनेकदा खरे असले तरी काही नेतेच असे असतात की त्यांच्या तोंडातून ते नेहमीच विष ओकत असतात. तो त्यांच्या प्रकृतीचा भाग असतो. त्यांना तसे वागण्यासाठी ना कोणाच्या सल्ल्याची गरज भासत, ना त्यापासून परावृत्त करण्यासाठी. समोर बसलेल्या लोकांच्या टाळ्या आणि शिट्या त्यांना असली भाषा वापरण्यासाठी स्फुरण चढवीत असते. बोलण्यासाठी कोणताही अजेंडा नसेल तर काय बोलून श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवायचा, या दडपणातूनही अनेकदा अनेकांच्या तोंडून अशी विधाने निघतात, असेही अनुप शर्मा यांचे म्हणणे आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर हेच एक गडद सत्य असल्याची खात्री पटते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची भाषणे पाहिली तर त्यांच्याकडे बोलण्यासाठी अजेंडाच नाही, हे त्यांनीच सिद्ध करून दिले आहे. गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी जी काही भरघोस आश्वासने दिली होती, त्यांचे काय झाले हे सांगायचे असेल तर काय सांगणार आहेत ते? बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये असोत, दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचा मुद्दा असो की विदेशातून आणायचे काळे धन असो, मतदारांना प्रभावित करू शकेल असे मुद्दे नसतील तर धार्मिक ध्रुवीकरणासाठी करायच्या विधानांशिवाय पंतप्रधानांकडे पर्याय नाही हे त्यांनीच सिद्ध करून दिले आहे. पंतप्रधान म्हणून मोदींची ही स्थिती असेल तर कोणतेही काम करण्याची फारशी संधी नसलेल्या त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे तरी काय मुद्दे असणार आहेत? जे केंद्रीय मंत्रिमंडळाचे तेच त्यांच्या पक्षातील नेत्यांचेही आहे. देव, धर्म, मंदिर या शिवाय त्यांना तरणोपाय नाही आणि म्हणून त्यांना हनुमानाची जात काढावी लागते, विरोधी पक्षाच्या स्त्री नेतृत्वाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून नवी चर्चा सुरू करायची असते. विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही ‘चौकीदार चोर आहे’ या घोषणेचा घोषा सोडलेला नाही. खरे तर कोट्यवधी गरिबांना भुलवू शकेल अशा ‘न्याय’ योजनेचाच त्यांचा जाहीरनामा आहे. पण काँग्रेसच्या असल्या जाहीरनाम्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, याची त्यांनाही खात्री असावी. काँग्रेस नेत्यांच्या आणि विशेषत: गांधी परिवारातील नेत्यांच्या बलिदानाचा इतिहास सांगायचा तर मतदार काँग्रेसशी जोडला गेलेल्या अलीकडच्या भ्रष्टाचाराचा इतिहास आधी आठवतात, हा त्यांचा अनुभव असावा. त्यामुळेच ‘चौकीदाराला न्याय’ देण्यात त्यांची भाषणे अडकली आहेत. 


हे सारे चित्र पाहिले की, कुठे येऊन पोहोचला आहे हा देश, असा प्रश्न पडतो. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘२०२०’ मधल्या भारताचे काय स्वप्न पाहिले होते आणि प्रत्यक्षात काय चित्र तयार झाले आहे या देशातले! प्रचाराचीच पातळी इतकी खालावली आहे की देश म्हणून आपल्या प्रगतीची, विचारांची आणि नैतिकतेची पातळी खालावल्याचे ते द्योतक आहे, याचा ज्याने त्याने आपापल्या डोक्याने विचार करण्याची ही वेळ आहे. एक मात्र खरे की, मतांसाठी आणि मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रचाराची पातळी कितीही खाली नेली गेली असली तरी विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यापासून तरुण नवमतदार ढळलेला नाही, असे अनुप शर्मांसारख्या संशोधक अभ्यासकाचे म्हणणे आहे. आपल्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना हे कळायला लागेल तो सुदिन म्हणायचा. 

लेखक "दिव्य मराठी'च्या औरंगाबाद आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. 

 

दीपक पटवे
deepak.patwe@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...