आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या बोलण्याचा अर्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी औरंगाबादचा दौरा केला. कारण दिवंगत नेते मनमोहनसिंग ओबेराॅय यांच्या कुटुंबीयांचे  सांत्वन करण्याचे होते. ३१ वर्षांपूर्वी याच औरंगाबाद शहरात त्यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश घेतला होता. त्यामुळे इथल्या भागाशी त्यांचे एक वेगळे नाते आहे. ते स्वत: तसे मानतात की नाही, हा भाग वेगळा. पण या भागातील जनतेला त्यांच्याविषयी वेगळी आपुलकी वाटते. अर्थात, त्या आपुलकीचा आणि निवडणुकीत मतदान करण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो, हे लक्षात घ्यायला हवे.

 

असो. तर औरंगाबादशी असलेले पवारांचे हे नाते अप्रत्यक्षपणे आणखी दृढ करण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी या दौऱ्यात व्यक्त केला. म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांच्यासाठी आपण ही जागा मागत आहोत, असेही त्यांनी सांगून टाकले. शरद पवार जे बोलतात ते करीत नाहीत आणि जे त्यांना करायचे असते त्याविषयी ते कधीच बोलत नाहीत, अशी त्यांची ख्याती सांगितली जाते. ती खरी आहे का, हे लवकरच कळेल. पण तोपर्यंत औरंगाबादमध्ये राजकीय चर्चांना हवा मिळाली आहे, हे नक्की. 


महाआघाडीच्या अभूतपूर्व गरजेची चर्चा सगळीकडे होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणार नाही, असा विचार कोणी व्यक्तही करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या या नव्या मुद्द्याकडे पाहायला हवे. काँग्रेसने दरवेळी लोकसभेला औरंगाबादमधून उमेदवार दिला आहे आणि तो  पराभूत होत आला आहे. शरद पवार एस काँग्रेस चालवत होते त्या वेळी म्हणजे १९८४ साली त्यांच्या पक्षाचे एक उमेदवार साहेबराव डोणगावकर औरंगाबादमधून निवडून आले होते. मध्ये ११ महिन्यांची संसद बरखास्त झाली होती त्या वेळी रामकृष्ण पाटील निवडून आले होते. हा अपवाद वगळला तर सलग १९८९ पासून इथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी होतो आहे.

 

म्हणजे तेव्हापासून काँग्रेसचा उमेदवार पराभूतच होतो आहे. असे असेल तर किती वेळा तुम्ही पराभूत व्हायचे, असा प्रश्न पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला विचारणे स्वाभाविक आहे. हा प्रश्न म्हणजेच यंदा राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबादची जागा सोडायची मागणी करणे आहे. आता खुद्द पवार साहेबांनीच हा मनोदय जाहीर केलेला असल्यामुळे आमदार सतीश चव्हाण जाेरदार तयारीला लागले असतील, असे कोणालाही वाटेल. पण तसे चित्र इथे अजिबात दिसत नाही. एक टप्पा होता जोपर्यंत आमदार चव्हाण यांना निवडणूक आवाक्यात वाटत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:च यापुढे तिकीट मिळाले तरी लढणार नाही, असे जाहीर केले होते. मग अचानक पवारांनी असे कसे जाहीर केले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आधी म्हटले तसे पवारांनाही तसे करायचेच नसावे.

 

पण मित्र सांभाळून ठेवण्याची त्यांना जुनी सवय आहे. माजी खासदार रामकृष्ण पाटील हे त्यांचे जुने मित्र. रामकृष्ण पाटलांची निवडून यायची ताकद नसली तरी उमेदवार 
पाडायची ताकद किती आहे हे पवारांना चांगले माहिती आहे. त्यामुळे रामकृष्ण पाटलांच्या समाधानासाठी पवारांनी औरंगाबादची जागा मागितली असावी, असाही अंदाज आहे. काँग्रेस ही जागा सोडणार नाही. पण या मागणीमुळे किमान रामकृष्ण पाटलांचे मन सांभाळले जाईल आणि आमदार सतीश चव्हाण यांनाही आनंद मिळेल, असा पवार यांचा हा प्रयत्न असावा. यात रामकृष्ण पाटलांना आनंद कसा? तर काँग्रेसकडून निवडणूक प्रचाराला लागलेले आमदार सुभाष झांबड आणि त्यांचे पटत नाही. ही राजकीय गाठ पडली आहे थेट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून. त्यामुळे झांबड यांना ही संधी मिळू द्यायची नाही, हा विडा रामकृष्ण बाबांनी उचलला आहे. तो पण पूर्ण व्हायचा असेल तर ही जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडे गेली तरच हे शक्य आहे, हे त्यांना माहिती आहे.

 

म्हणून रामकृष्ण पाटलांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या डोक्यात या विचारांची पेरणी केली. शरद पवारांना हे कळत नाही असे नाही. पण आपल्या एका वाक्याने एक राजकीय कामाचा माणूस आणि पक्षाचा एक आमदार  असे दोघे खुश होणार असतील तर ते का करू नये, असा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारला असेल आणि निर्णय घेतला असेल. त्या निमित्ताने माध्यमांना एक दिवस बातम्या मिळाल्या हे नक्की. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापालिकेत ११६ पैकी केवळ ३ नगरसेवक आहेत, पक्षांतर्गत उभे दोन गट आहेत तिथे पवार तिकीट मागून अवलक्षण करून घेण्याइतके अपरिपक्व नक्कीच नाहीत.

 
- दीपक पटवे  

निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...