Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | dipali sayyad 2014 election news

खरे राजकारण काय असते, ते नगरकरांनी मला शिकवले - दीपाली सय्यद

दिव्य मराठी | Update - Feb 22, 2019, 11:40 AM IST

अभिनेत्री असले तरी २०१४ मध्ये माझ्यासमोर आम आदमी पार्टीने चक्क लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा प्रस्ताव दिला.

 • dipali sayyad 2014 election news

  अभिनेत्री असले तरी २०१४ मध्ये माझ्यासमोर आम आदमी पार्टीने चक्क लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला मी नकार देत होते, पण नंतर मी ठामपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मी खूप नवीन होते, पण राजकारण काय असते, ते मी नगरकरांकडूनच शिकले. आता मी शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीची प्रदेशाध्यक्ष आहे.


  मी २०१४ मध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून प्रथमच आम आदमी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. मला लोकांनीच या निवडणुकीत उतरवले होते. त्या वेळी डोक्यावर परिधान केलेली आम आदमी पक्षाची टोपी निवडणुकीपुरतीच होती. निवडणूक झाल्यानंतर मी या पक्षाचा राजीनामा दिला. पण ती निवडणूक आजही आठवणीत आहे. रात्री उशिरापर्यंत गावोगाव प्रचाराच्या निमित्ताने जाणे होत होते. सामान्य जनतेचे पाण्यासाठी होणारे हाल मी स्वत: पाहिले. या कालावधीत खूप काही शिकायला मिळाले.


  निवडणुकीच्या धामधुमीचे ते २८ दिवस :
  राजकारण काय असते, ते नगरकरांनीच शिकवले. निवडणूक कालावधीतील ते २८ दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. लोकांच्या घरापर्यंत जाण्याची संधी या निवडणुकीमुळे मिळाली. रात्री उशिरापर्यंत प्रचारही केला. निवडणुकीच्या कालावधीत अनेकांकडून निवडणुकीत माघार घ्या, असा दबाव वाढत होता. पण मी निवडणूक लढवण्यावर ठाम होते. राजकारण काय असते हे मी प्रत्यक्षात पाहिले व शिकले. लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी ती निवडणूक लढवली. या निवडणुकीतून खूप शिकायला मिळाले.


  त्या वेळी मोदी लाट होती. त्यानंतर भाजपने काम केले, पण मधल्या फळीला हानी झाल्याने त्याचा फटका भाजपला बसेल. मी अद्याप २०१९ च्या लोकसभेबाबत निर्णय घेतलेला नाही. मी पाण्याच्या किंवा लोकांच्या प्रश्नांसाठी कृती समितीची टोपी डोक्यात घातली आहे, पण ही टोपी आम आदमी पक्षाची नसून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितली.


  सध्या समाजकार्यात सक्रिय
  मी सध्या समाजकार्यात सक्रिय आहे. या माध्यमातून गुंडेगाव येथे वृद्धाश्रम व अनाथाश्रमाचे बांधकाम हाती घेतले आहे. या भागातील साकळाई उपसा सिंचन योजनेच्या कृती समितीच्या माध्यमातूनही पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठीच मी निवडणूक लढवली होती. मी जर खासदार असते तर हे प्रश्न लगेच सोडवले असते. साकळाई उपसा सिंचन योजनेचा विषय श्रेयवादाच्या राजकारणामुळे प्रलंबित आहे. हे प्रश्न सोडवायचे आहेत, पण मी आगामी निवडणूक लढवण्याचे अद्याप ठरवलेले नाही. पण मागील निवडणुकीचा अनुभव माझ्याकडे आहे.


  शब्दांकन : अनिरुद्ध देवचक्के

Trending