आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्काउंटर अवनी : ‘चकमक’ संस्कृतीची फलश्रुती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेच्या भावनांशी खेळणे आणि  कायद्याला बायपास करून जनतेला वारंवार भावनिक ‘प्लेझर’ मिळवून देणे, यातून राजकारणी आपली सत्ता बळकट करत राहतात. यामुळे एकाच वेळी सत्तेच्या ताकदीचे दर्शनही घडते, जनता धाकातही राहते आणि खुशही. ‘जनतेच्या भल्या’साठी आखलेली व्यवस्थेची ही एक सूत्रबद्ध योजना असते. समाजविघातक गुंडांचे किंवा अवनी वाघिणीचे एन्काउंटर हे त्याच योजनेतून स्फुरते...

 

"कायद्याचं राज्य' असलेल्या आणि "प्रभु श्रीरामाचं राज्य' येऊ घातलेल्या उत्तर प्रदेशातलं अलिगड. २० सप्टेंबर २०१८. मीडियाच्या साक्षीने वाँटेड आरोपींचे लाइव्ह एन्काउंटर सुरू आहे. त्यातला एक, नौशाद वय वर्षे, १७. दुसरा, मुश्तकिम वय वर्षे २२. दोघांवरही सहा खुनांचा वहीम आहे. दोन्ही बाजूंनी फायरिंग होत असल्याचा अनुभव मीडिया घेतोय. थरार शिगेला पोहोचतो. एकाक्षणी फायरिंग थांबतं. पोलिस मीडियासमोर येतात. ‘खत्म’ एवढाच शब्द उच्चारतात. याचा अर्थ, दोन आरोपींना ‘कायद्याच्या रक्षकां'नी ‘कंठस्नान’ घातलं असतं. 


‘पोलिसांनी दोन्ही आरोपींना शरण या, अशी विनवणी केली. पण आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांना नाइलाजाने गोळीबार करावा लागला, त्यात हे आरोपी ठार झाले...' आजवरच्या प्रत्येक एन्काउंटर प्रसंगीचे "सत्य' मीडियासमोर मांडलं जातं, ते सत्य ऐकून मीडिया एक्साइट होतो. कायद्याचं राज्य अवतरल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्याला कर्तव्यभावना समजून उचलून धरतो. दोन महिन्यांनी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर (१३ नोव्हेंबर २०१८ टाइम्स ऑफ इंडिया मुंबई आवृत्ती पान क्र. १) फोटोसह बातमी छापून येते. दोन महिन्यांपूर्वी अलिगडमध्ये एन्काउंटर झालेल्या आरोपींचे आई-बहीण-मुलं, मनोरुग्ण काका असे सगळे सोयरे कुठेतरी रस्त्याच्या कडेला तंबू टाकून निराधार अवस्थेत जगत आहेत, त्यांच्या मदतीला ना शासन आहे, ना समाज आहे.

 

त्यातली आरोपींची बहीण म्हणते, माझ्या भावांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या नाहीत, उलट पोलिसांनी दोघांना पहाटेच उचलून नेलं. नंतर गोळ्या घालून ठार केलं...
नेमका असाच सारा प्रकार ३ नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळनजीकचा जंगलात घडला. इथे कुणी खुनी गुंड नव्हते, पण ‘नरभक्षक’ अवनी वाघीण होती. तिने १८-२० गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्यामुळे शेतीचे नुकसान होत होते, बाया-माणसं जीव मुठीत धरून जगत होते. शासनाने या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी जमिनीपासून आकाशापर्यंत हरतऱ्हेचे प्रयत्न केले, म्हणजे विमानातून शिकारी कुत्रे आणण्यापासून रस्तामार्गे हत्ती मागवण्यापर्यंत सारे उपाय योजून पाहिले, पण ‘गुंड’ अवनी काही बधली नाही.

 

शेवटी नाइलाजास्तव शार्पशूटर अशी ख्याती असलेल्या हैदराबादी नवाबसाहेबांना पाचारण केलं गेलं. बऱ्याच "मोठ्या संघर्षा'नंतर अखेर अवनी ठार झाली. तिची दहशत संपली. सरकारी परिपत्रक निघालं. ते पुढीलप्रमाणे- "आम्ही अवनीला बेशुद्ध करण्याचा हरतऱ्हेचे प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. उलट तिनेच  हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल तिच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या, त्यात तिचा मृत्यू झाला...' म्हणजे, तिकडे अलिगडमध्ये खुनाचा आरोप असलेले गुंड होते, इथे  यवतमाळच्या जंगलात अवनी वाघीण होती. 


माणूस काय नि वन्यजीव काय, चकमकीचा पॅटर्न एकच. त्यात व्यवस्था काडीचाही फरक करत नाहीत. पण, तरीही सत्तासमर्थकांना आणि मीडियातल्या सत्तेची ऊब अनुभवणाऱ्या तज्ज्ञांना यात जराही काळंबेरं दिसत नाही. उलट  गुंडांचे आणि अवनीचे एन्काउंटर योग्यच आहे. गुंड हे समाजातली आणि अवनी ही जंगलातली घाण आहे, ती साफ करणं आवश्यक आहे, असा चढा सूर ते लावतात.

 

‘अवनी जशी नरभक्षक होती, तसेच तिचे बछडेदेखील नरभक्षक झाल्याची शक्यता आहे.’ हा सत्ताधारी व्यवस्थेचा बछड्यांच्या एन्काउंटरची मान्यता मिळवणारा सिद्धांत योग्य असल्याचा निर्वाळाही ते देतात. शहरात राहून कसले प्राणिप्रेमाचे उमाळे काढताय? हिंमत असेल तर वाघांची दहशत असलेल्या गावात राहून पाहा, तिथे शेतात राबून पाहा, असे खुले आव्हान ते देतात. काही तर इतके विखारी होतात की, वनमंत्र्यांना हटवण्याची संतप्त प्रतिक्रिया देणाऱ्या वन्यप्रेमी केंद्रीय मंत्री मनेका गांधींनाच नरभक्षक वाघाच्या पिंजऱ्यात सोडलं पाहिजे, अशी बेताल भाषा करतात.

 

समाजाचे स्वास्थ्य बिघडवणारे गुंड काय नि मनुष्यवस्तीत दहशत निर्माण करणारे अवनी वाघिणीसारखे वन्यप्राणी काय, त्यांना जेरबंद करणे हा व्यवस्थेचा उद्देश असतो? टू बी व्हेरी ऑनेस्ट, उ.प्रदेशातल्या त्या गुंडाच्या संदर्भातही तसा तो नव्हता आणि अवनी वाघिणीच्या बाबतीतही तो जाणवत नव्हता. खरंतर जी व्यवस्था किंवा जी यंत्रणा माणसांचा किंवा वन्यप्राण्यांचा एन्काउंटर करू शकते, ती व्यवस्था ठरवलं तर त्या माणसांना किंवा वन्य प्राण्यांना जेरबंदही करू शकते. म्हणूनच प्रश्न, अवनीला जेरबंद करणे हाच वन्य खात्याचा अंतिम उद्देश होता का हा आहे? पण आताच्या सत्ताकाळात लॉजिक आणि रिझनिंगची अपेक्षा ठेवून विचारलेल्या प्रश्नांना जराही स्थान नाही. ते तसं नसल्यामुळे सत्तासमर्थकही तसा तर्काला धरून विचार करत नाहीत.

 

न पेक्षा ‘गुंड आहे ना, त्याला संपवलंच पाहिजे, नरभक्षक वन्यप्राणी आहे ना त्याला ठार केलंच पाहिजे, असा कायदा, नीतिमत्ता, मूल्यं यांना खुंटीवर टाकणारा विचार आता  प्रबळ आहे. त्यामुळे उ. प्रदेशातल्या एन्काउंटर झालेल्या गुंडांच्या मागे राहिलेल्या आया-बहिणींना कोणी वाली नाही, अवनीच्या पश्चात निराधार झालेल्या तिच्या बछड्यांचीही कुणी फिकीर करण्याचं कारण नाही. मुळात, एन्काउंटर केले की, असे काय साधते? तर, जनतेच्या मनात एकाच वेळी धाक आणि भय निर्माण करता येते, गुंडांना यथायोग्य धडा शिकवल्याचे दिल्याचे पुण्य सत्ताधाऱ्यांच्या पदरी जमा होते !


यूपीतल्या गुंडांचा आणि अवनीचा एन्काउंटर नसता केला, त्यांना आणि तिला नुसतेच जेरबंद केले असते तर जनतेच्या मनातली भीती पूर्णपणे जाणार नाही, आपल्या सर्वशक्तिमान  रुपाचं दर्शन घडणार नाही, मुख्य म्हणजे, जनतेच्या मनातल्या प्रतिशोधाच्या भावनेला न्याय देता येणार नाही, याचा सत्ताधारी कधीही विसर पडू देत नाहीत. तसं तर सूडभावना माणसात निसर्गत: असते, मात्र त्यावर मात करण्यासाठी तो समाज आणि समाजात राहणारा माणूस विवेकी, बुद्धिनिष्ठ असावा लागतो.

 

परंतु, देवा धर्मांच्या नावाने त्या समाजात उठताबसता कंठशोष होतो, जिथे तथाकथित संत-महंत स्टेजवरून सरकारला खुलेआम आदेश देतात, तिथल्या समाजाकडून विवेकनिष्ठ वर्तनाची अपेक्षा सहसा ठेवता येत नाही. अवनी वाघिणीच्या बाबतीत किंवा वन्यप्राणी मानव यांच्यातल्या संबंधांबद्दल बोलायचे झाल्यास, माणूस आणि निसर्गातला संपर्क-संवाद वेगाने कमीकमी होत चालला आहे, निसर्ग आणि वन्य प्राण्यांच्या वर्तनाबद्दलचे पिढीजात ज्ञान खुंटत चालले आहे. वन्यप्राण्यांशी संघर्ष टाळून सौहार्द निर्माण करण्यासाठी आवश्यक शहाणीव लोप पावत चालली आहे. अशा वेळी माणसांच्या जगातल्या असो वा जंगलातल्या, अशा दोन्हीकडच्या "गुंडा'चा एनकाउंटर हा सोपा उपाय व्यवस्थेला गवसला आहे. 


त्यामुळे सुबुद्धांना हे मान्य असायला हरकत नसावी, की स्वसंरक्षणार्थ एक्स्ट्रा ज्युडिशियल म्हणजेच कायद्याला वळसा घालून वा ओलांडून, प्रसंगी कायद्याच्या कचाट्यात न येण्याची सर्वतोपरी का‌ळजी घेऊन एन्काउंटरसारख्या घटना घडवून आणण्यात सत्ताधारी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत चांगलेच पारंगत असतात. इथे काँग्रेस-भाजप-सपा-तृणमूल-सीपीआय या सगळ्यांचीच आयडिऑलॉजी एकसमान असते. तद्वत अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद न करता थेट ठार करताना विद्यमान सरकारनेही योग्य ती काळजी घेतली असणार हे उघड आहे.

 

त्यामुळे दोन-चार प्राणीप्रेमी संघटनांनी निषेध मोर्चे काढणं किंवा प्राणितज्ज्ञांच्या देखरेखीखाली अवनीला बेशुद्ध करून पकडण्याची सारी तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, नेमक्या एका क्षणी प्राणितज्ज्ञांच्या अनुपस्थितीची संधी साधून शार्पशूटर नवाबच्या असगर अली नामक पुत्राने अवनीला ठार केल्याचे कुणीतरी उघड करणं, हे सारं पोकळ आक्रंदन ठरणार आहे. त्या पोकळपणात भर घालण्यास सत्तेचे सहानुभूतिदार समर्थ आहेत. ते आपल्या बोलण्यातून, लिखाणातून विद्यमान सत्ताधाऱ्यांना सवाल न करता तत्कालिन काँग्रेस सरकारचा नालायकपणा उघड करत राहणार आहेत. सोयीनुसार सेवाग्राम आश्रमात निघालेला साप मारण्याची परवानगी देणारे म. गांधी पुढे आणत राहणार आहेत, आणि सोयीनुसार गांधींना झाकतही राहणार आहेत.


सीसीटीव्हीच्या नजरेसमोर इथे रोज हजारो-लाखो माणसं मरतात. त्यातले काही चकमकीमध्ये मारले जातात. इतकंच कशाला जगाच्या डोळ्यांदेखत सौदी अरेबियाच्या इस्तंबूल दुतावासात खाशोगी नावाच्या सौदी पत्रकाराच्या शरीराची खांडोळी करून अॅसिडमध्ये ती वितळवली जाते. तरीही जग या सगळ्यांसाठी एक सेकंदही थांबत नाही. अवनी ही तर बोलून चालून एक जंगली जनावर होती, तिच्या ठार होण्याने हे जग  थांबणार नाही. उलट विकासाची एक वीट रचली गेली म्हणून आनंदच साजरा करेल...

 

दीपंकर 

बातम्या आणखी आहेत...