क्रांतीचा शिक्षण रंग! / क्रांतीचा शिक्षण रंग!

दीप्‍ती राऊत

Sep 02,2018 07:03:00 AM IST
सालाबादप्रमाणे यंदाही शिक्षक दिन उत्साहात साजरा होईल. गुणवंत शिक्षकांना पुरस्कार दिले जातील, प्रयोगशील शिक्षकांचेे सन्मान केले जातील. शिक्षकांच्या योगदानावर भाषणं होतील, शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा होतील. हे सारं महत्त्वाचंच, परंतु देशाची राजकीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही पंचतारांकित शहरांपासून हजार-बाराशे किलोमीटर अंतरावरच्या एका दुर्गम नक्षलग्रस्त तालुक्यात अंगणवाडीतील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या एका असामान्य अंगणवाडी सेविकेची मात्र अभावानेच दखल घेतली जाईल...


पनिशमेंट पोस्टिंगसाठी कुप्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्हा. विकासाच्या प्रक्रियेत अडथळा ठरलेल्या नक्षलवादी कारवायांचे आव्हान असलेला... डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे, डॉ. अभय आणि राणी बंग यांची कर्मभूमी बनलेला... ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ते ‘आमच्या गावात आमचे सरकार’ अशा अनोख्या प्रयोगांची जन्मभूमी ठरलेला... या जिल्ह्यातले गौराबाई आणि डोनुजी. त्यांना लेकरं सहा. डोनुजी काँग्रेसचेे स्थानिक कार्यकर्ते, तर गौराबाई अंगणवाडी सेविका. त्यामुळे घरातच समाजसेवेचे बाळकडू मुलांना मिळाले. पण इतर मुलांपेक्षा एका लेकीला मात्र त्याची मात्रा भलतीच लागू पडली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगी नक्षलवाद्यांशीही सामना करत तिनं गेल्या बावीस वर्षांपासून हा ज्ञानदानाचा वसा अविरत जपला आहे. ही कहाणी जिद्दीच्या जोरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका सपना रामटेके यांची आहे...


राज्य सरकारच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेचा सर्वात मोठा फटका बसला आहे, तो गडचिरोली जिल्ह्याला. जिल्ह्यातील १०२ शिक्षकांनी जिल्ह्याबाहेर बदल्या करून घेतल्या. आता त्या ठिकाणी नवीन शिक्षक येण्यास तयार नसल्याने २२८ पदांपैकी १०२ म्हणजे जवळजवळ निम्मी पदं रिक्त असल्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. याच गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात सपना रामटेके गेल्या बावीस वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत,. फक्त नोकरी म्हणून नव्हे, तर जनसेवेचे माध्यम म्हणून. १९७४ मध्ये जन्मलेल्या सपनाची स्वप्नं काही वेगळीच होती.


स्वभावत:च बंडखोर सपनाने चौथीनंतर शाळाच सोडली. घरची शेती बघण्याचं काम तिच्यावर पडलं. वयात येण्याच्या काळात तिचा परिचय गायत्री परिवारातील काही कार्यकर्त्यांशी झाला. त्यांच्या विचारानं भारावलेल्या सपनानं घर सोडलं आणि थेट बनारस गाठलं. गायत्री परिवारासोबत वर्ष-सहा महिने काढल्यावर सपनाच्या लक्षात आलं, आपल्याला अभिप्रेत असलेली समाजसेवा आणि परिवाराची समाजसेवा यात खूप फरक आहे. परतण्याच्या बेतात असलेल्या सपनाला दिल्ली रेल्वेस्टेशनवर वडिलांचे मित्र बोगामी काका भेटले, आणि भामरागडमध्ये परतण्याचा तिचा निश्चय पक्का झाला. मालू कोपा बोगामी हे भामरागडमधील काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे रखडलेली विकासाची गंगा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचवणं यासाठी आयुष्य वेचणारे. भामरागडमध्ये परतलेल्या सपनावर त्यांनी महत्त्वाची कामगिरी सोपवली, ती बिनागुंडा गावातली अंगणवाडी चालवण्याची. ते साल होतं १९९५ आणि सपनाचं वय होतं, एकवीस वर्षं! भामरागड या तालुक्याच्या गावापासून बिनागुंडाला पोहोचायचं म्हणजे तब्बल ३६ किलोमीटरची फक्त पायी वाट. घनदाट अरण्य, दोन नद्या, पाच ओढे आणि चार पहाड ओलांडून जाण्याचं दिव्य. पण शिक्षणप्रसाराचं ध्येय उराशी बाळगलेल्या सपनानंही ते आनंदानं स्वीकारलं आणि २००५ पर्यंत तब्बल १० वर्षं निभावलं.

‘खूप कठीण काळ होता तो. गावकऱ्यांनी मला एक झोपडीवजा घर बांधून दिलं होतं. तीच अंगणवाडी आणि तेच माझं घर. तेव्हा माझं मानधन होतं अडीच हजार रुपये. ते घेण्यासाठी चार-सहा महिन्यांनी ती ३२ किलोमीटरची खडतर वाट तुडवत मला भामरागडला यावं लागत असे. त्याच वेळी तेल-मिठासोबत दोनेक लिटर केरोसीन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी जंगल, पहाड तुडवट बिनागुंडा गाठायचं. पुढले दोन महिने चिमणीसाठी थेंब थेंब तेल वापरायचं. ते संपलं की चुलीतला विस्तू हाच सगळा आधार,’ सपना सांगत होत्या. गावकऱ्यांकडून घेतलेल्या वरईचा भात म्हणजे कोसरी आणि लाल मुंगळ्यांची चटणी म्हणजे, लाइंग हेच एकमेव जेवण. त्या परिस्थितीत सपना बिनागुंडातल्या आदिम आदिवासींसाठी आशेचा किरण ठरली. गावातल्या महिलांना चोळ्या घालायला शिकवू लागली. गावातल्या मुलांना शाळेची सवय लावू लागली. खरं तर अंगणवाडी चालवणं, हेच तिचं प्राथमिक काम होतं. पण तेवढ्यावरच थांबण्याचा तिचा स्वभाव नव्हता. गावातल्या एका मुलीची आई सोडून गेली, तिला सपनानं आपल्या घरात आश्रय दिला. एकाचा बाप मेला, त्याला सपनानं आपला लेक मानून स्वीकारलं. अशी घरातच सांभाळलेली तीन-चार लेकरं, अंगणवाडीत येणारी बालकं आणि बिनागुंडाचे उघडेवाघडे आदिवासी असा सपनाचा भलामोठा परिवार झाला.

‘मग लग्न कसं केलं?’, पारंपरिक चौकटीत विचार करणाऱ्या प्रत्येकाला पडणारा प्रश्न.
त्यावर स्वत:शीच हसत सपना तीही कथा सांगते.
‘माझ्या या साऱ्या लेकांसह मला स्वीकारेल अशासोबतच मी लग्न करण्याचं ठरवलं. असं कोण तयार होणार? शेवटी एकदा एक जण भेटला. बल्लारशहाच्या पेपर मिलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानं लेकरांसह मला स्वीकारण्याचं वचन दिलं म्हणून आम्ही लग्न केलं. वर्षभर आमचा संसार चांगला झाला. वर्षानंतर खटके सुरू झाले. पहिला वाद होता, माझ्या घरातल्या लेकरांवरूनच. पण लग्न करताना तीच माझी अट होती. त्यांना सोडणार नाही यावर मी ठाम होते. शेवटी तो निघून गेला.’


पती सोडून गेला, तेव्हा सपनाच्या उदरात दोन महिन्यांचं इवलंसं स्वप्न रुजलं होतं.
सात महिन्यांनी तिचा जन्म झाला.
सपनानं तिचं नाव ठेवलं - वृक्षवल्ली!
वृक्षवल्ली सपना रामटेके या नावाची ही लेक आज बारावीची परीक्षा देतेय. भामरागडच्या समूह आदिवासी शाळेत प्राथमिक शिक्षण आणि मॉडेल स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलेल्या वृक्षवल्लीचं स्वप्न आहे, स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचं!
पण सपनाची कथा इथेच संपत नाही. अंगणवाडी सेविका म्हणून काम करताना नक्षलवाद्यांचा तिनं केलेला सामना, हा खरा तिच्या धैर्याचा आणि जिद्दीचा आणखी एक भरभक्कम पुरावा आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना गावातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम तिनं सुरू केलं. कुणाला लाहेरीच्या शाळेत पाठव, कुणाला भामरागडच्या आश्रमशाळेत. त्यापैकी एक जण पोलिस दलात भरती झाला आणि नक्षलींच्या हिटलिस्टवर सपना रामटेके हे नाव आलं. तू गावात राहून गावातल्या पोरांना पोलिसांत भरती करतेस, हेे काम थांबव, त्याला पोलिसांतून परत आण किंवा गाव सोड, या धमक्या सुरू झाल्या. सपना डगमगली नाही.


एक वेळ तर त्यांनी हिच्या घरात घुसून सर्व बाडबिस्तरा बाहेर फेकूनही दिला. पण सपना बधली नाही. माझं म्हणणं तुम्हाला समजत नसेल तर मला तुमच्याशी नाही, तुमच्या वरिष्ठांशी बोलायचंय, अशी धाडसी भूमिका तिने घेतली. तेही बधले नाहीत, तेव्हा एका मध्यस्थामार्फत नक्षलींच्या वरिष्ठ नेत्याकडे एक चिठ्ठी पाठवली. त्यानं जंगलात बोलावून घेतलं, तेव्हा त्याच्यापुढे आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. शेवटी तिची बाजू सरस ठरली आणि नक्षलींचा त्रास बंद झाला.

दरम्यान, २००३ मध्ये नक्षलींनी बोगामींंची हत्या केली. सपनासाठी हा मोठा धक्काच होता. एखादीनं नोकरी सोडून पुन्हा आपल्या गावात परतायला लावणारा हा प्रसंग. पण तेव्हाही सपना डगमगली नाही. त्यानंतरही दोन-अडीच वर्षं बिनागुंडा गावातच अंगणवाडी चालवत राहिली. पुढे २००५ मध्ये तिची बदली भटपर गावात झाली. भटपर गावातला एक प्रसंगही जिवावर बेतणारा. २००७ सालातला १५ ऑगस्ट. गावातल्या शाळेसमोरच्या ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याची प्रथा. पण त्या वर्षी शिक्षक आजारी असल्यानं शाळा बंदच होती. स्वातंत्र्यदिनाची पहाट गावकऱ्यांसाठी एक धक्का घेऊनच उगवली. शाळेसमोरच्या ध्वजस्तंभावर नक्षलींनी आदल्याच रात्री काळं निशाण फडकवलं होतं. सपनानं गावकऱ्यांना घेऊन शाळेचं कुलूप फोडलं. कपाटातून तिरंगा काढला. स्तंभावरचं काळं निशाण खाली उतरवलं आणि स्वत:च्या हातानं तिरंगा फडकवला!
‘भीती नाही वाटली, ते मारून टाकतील याची?’ पुन्हा आपल्या मनातला साचेबंद प्रश्न.

पण सपनाचं त्यावर सरळ सोपं उत्तर, ‘पण माझा काही दोषच नव्हता ना, मग मी घाबरावं का?’
याच जिद्दीवर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहिलेल्या सपना रामटेके सध्या भामरागडच्या अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या काही आदिवासी मुली आसपासच्या अंगणवाड्यांमध्ये सेविका म्हणून, मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. पंचक्रोशीतल्या अनेक सेविकांसाठी सपनाताई महत्त्वाच्या मार्गदर्शक आणि प्रेरकही ठरल्या आहेत. शहराच्या टोकाला जलसंपदा खात्याच्या पडक्या क्वार्टरमध्ये त्यांनी संसार थाटला आहे.


शहराच्या शेवटच्या टोकाला त्यांचं हे घर आहे. बाहेर जलसंपदा विभागाचा विटका बोर्ड आहे. सपनाताईंनी भिंतींना निळा रंग दिलाय. भिंतीवरच्या फ्रेममधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शांतपणे सपनाताईंची ही कहाणी ऐकत होते. त्यांच्या शेजारच्या कोनाड्यातली बुद्धाच्या लहानशा मूर्तीवर त्यांची नजर स्थिरावली होती. तीन वर्षांपूर्वी सपनाताईंनी गया इथे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली आहे. ‘गायत्री परिवारात गेले तेव्हा काही कळत नव्हतं, आपला धर्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय... आता मला कळायला लागलंय. यापुढे धम्मकार्य करत राहायचं, असं मी ठरवलंय...’ हा त्यांचा आश्वासक स्वर वातावरणात ऊर्जा निर्माण करणारा आहे.


दुसऱ्या दिवशी पांढऱ्याशुभ्र सलवार-कमीजमध्ये आलेल्या सपनाताई अंगणवाडीसमोरच्या हँडपंपावर चिखलानं माखलेल्या एका छकुल्याला अंघोळ घालत होत्या. म्हणाल्या, कधीपासून सांगतोय, हा रस्ता करा...लेकरं बदाबदा चिखलात पडताहेत... जिल्हा परिषद सदस्यांना कितीदा तरी विनवणी केलीय. शेवटी, रस्ते झाले, शिक्षण आलं तरच तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास होईल... सगळ्यांना माहीत असलेलं सत्य नोकरशाहीला उमगावं यासाठी चाललेली सपनाताईंची धडपड लपत नव्हती.


आत्मशोधाची वाट चालता चालता शिक्षण प्रसाराचं ध्येय उराशी बाळगून टोकाचा संघर्ष पेलण्याची विलक्षण क्षमता असलेल्या सपना रामटेकेंमध्ये केवळ अंगणवाडी सेविका नव्हे, तर साक्षरतेची नि:शब्द नि निर्भेळ अशी क्रांती घडवून आणणारी उत्तुंग कर्तृत्वाची, परंतु काहीशी दुर्लक्षित शिक्षिका दडल्याचे वास्तव भामरागड भेटीच्या निमित्ताने सामोरे आले. शिक्षक दिन खऱ्या अर्थाने कोणाच्या सन्मानाचा, याचा अर्थही उमगला.

[email protected]

X
COMMENT