आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तृत्वाने लखलखणारी सुवर्णपारखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत दागिन्यांची खरेदी अनेकजणी करतात, पण दागिन्यांच्या मूल्यांकनासारखे जोखमीचे, कौशल्याचे आणि चाकोरीबाहेरचे काम करणाऱ्या नाशिकमधील सुनीता दौंडकर एकमेव. सोन्या-चांदीचे दागिने घडवण्याचा वडिलांचा वारसा चालवतच त्या एकमेव महिला कारागीर आणि व्हॅल्युएटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रवासाची ही आगळीवेगळी पण लखलखणारी यशोगाथा. पेशवेकाळापासून वसलेल्या नाशिकच्या सराफ बाजारात शेकडो दुकानं रांगेने वसली आहेत. अनेक सराफी व्यापाऱ्यांचा तिथे व्यवसाय आहे. परंतु एकमेव महिला व्हॅल्युएटर घडली ती एका कारागिराच्या घरात. नवव्या इयत्तेत शिकणारी दौंडकरांची सुनीता वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच वडिलांच्या हाताखाली कारागिरी शिकली. आज स्वतंत्र सराफी व्यवसाय समर्थपणे सांभाळत व्हॅल्युएटर म्हणून काम करणारी ती एकमेव महिला ‘पारखी' ठरली आहेत.  सोन्याची कारागिरी म्हणजे भट्टीवर बसणं, पाणी करणं, धातू शुद्ध करणं आणि त्यातून दागिने घडवणं हे कौशल्याचे काम. सुनीताताई ते लीलया शिकल्या. लग्नानंतरही दागिने घडवण्याच्या या कारागिरीवर त्यांनी वडिलांचं दुकान सांभाळलं आणि मुलांना वाढवलं. आज त्यांच्या मुलांची लग्ने झालीत पण त्यांनी काम थांबवलेलं नाही.   स्त्रिया दागिन्यांच्या चोखंदळ ग्राहक समजल्या जातात. मात्र दागिने घडवण्याचं क्षेत्र पुरुष कारागिरांच्याच हाती. सुनीताताईंनी यास फाटा दिला. जिल्ह्यातील एकमेव कारागीर म्हणून त्यांचे मार्केटमध्ये नाव आहे. सचोटी आणि चोख कारभारामुळे पंचक्रोशीत त्यांचे नाव घेतलं जातं. इथपर्यंतचा संघर्ष अर्थातच सोपा नव्हता. ठरवलं असतं तर दुकानाच्या व्यवसायावर त्या थांबू शकल्या असत्या. पण, वेगळी वाट निवडलेल्या त्यांच्या स्वभावास कोणत्याही वाटेवर थांबणे नामंजूर होते. व्यवसायाचा भाग म्हणून त्या बँकेच्या लिलावातही सहभागी होऊ लागल्या. लिलावात सहभागी होणाऱ्याही त्या पहिल्या महिला आहेत. नजरेनं सोन्याची पत आणि स्पर्शाने वजन ओळखण्याच्या त्यांच्या अनुभवाची कदर करून एका बँकेने त्यांची व्हॅल्युएटर म्हणून नेमणूक केली. गोल्ड लोनसाठी दागिने घेऊन येणाऱ्या ग्राहकांचे सोने तपासून त्याचे मूल्यांकन करून देणे हे मोठे जबाबदारीचे आणि तेवढेच जोखमीचे काम. कौशल्य आणि प्रामाणिकपणाच्या भांडवलावर सुनीताताईंंनी तेदेखील पार पाडले. आज बँकेच्या चार शाखांसाठी त्या व्हॅल्युएटर म्हणून काम करत अाहेत. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा व्हॅल्युएटरचा कोर्सही पूर्ण केला. त्यानंतरही त्या थांबल्या नाहीत.  सरकारी व्हॅल्युएटर म्हणून मान्यता मिळाल्यावर त्या आता आयकर विभागाच्या छाप्यांमध्येही मूल्यमापक म्हणून जबाबदारी पार पाडतात. सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत २० किलोमीटरचा प्रवास करून या बँकांमध्ये आलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन आणि दुपारनंतर दुकानातील कारागिरी आणि व्यवहार असा त्यांचा व्यस्त दिनक्रम असतो.  दिवसभरात २०-३० लाखांच्या कर्जाच्या व्यवहारासाठी त्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यमापन करून देतात. कधी ग्राहक बनावट दागिने घेऊन येतात, तर कधी कमी प्रतीच्या सोन्याचे. त्यावेळी व्हॅल्युएटर म्हणून अत्यंत नाजूक परिस्थिती हाताळण्याचेे आव्हान त्या पार पाडतात. एखाद्यावेळी शंका आली तर आपल्या मतावर ठाम राहतात. प्रदीर्घ अनुभव, सचोटी आणि ठामपणा या संचितावर या सुवर्णपारखीचा प्रवास तीस वर्षांपासून अविरत सुरू आहे. दागिने घालणारे अनेक हात आहेत, पण घडवणारे सुनीताताईंसारखे काही थोडेच. दागिन्यांसाठी हट्ट धरणारे अनेक हात असतील पण त्यांचे व्हॅल्युएटर म्हणून जोखमीच्या कामाची जबाबदारी पार पाडणारी सुनीता एखादीच. 

लेखिकेचा संपर्क : ९७६४४४३९९८

बातम्या आणखी आहेत...