Home | Magazine | Rasik | Dipti Raut write about interference of politics in religion  

धर्मसत्तेकडून राजसत्तेकडे...

दीप्ती राऊत | Update - Jan 13, 2019, 12:09 AM IST

प्रयागराज येथे भरणारा अर्धकुंभ, महाकुंभापेक्षाही भव्यदिव्य करण्याची विद्यमान सत्ताधारी वर्गाची महत्त्वाकांक्षा उघडच आहे.

 • Dipti Raut write about interference of politics in religion  

  १५ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) येथे अर्धकुंभ मेळा भरणार आहे. गंगा-यमुनेच्या संगमावर वसलेला असल्याने बहुसांस्कृतिक, बहुधर्मीय असे या कुंभचे पूर्वापार वैशिष्ट्य राहिले आहे. यंदाच्या कुंभमध्ये इतर संस्कृतींचा स्थान देण्यात आले असले तरीही हा जणू एकाच धर्माचा उत्सव असल्याच्या थाटात मुख्यत: २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका नजरेपुढे ठेवून त्याच्या मेगा इव्हेंट घडवून आणला जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या ऐतिहासिक, समकालीन संबंधांचा वेध घेणारे हे विशेष लेख...

  प्रयागराज येथे भरणारा अर्धकुंभ, महाकुंभापेक्षाही भव्यदिव्य करण्याची विद्यमान सत्ताधारी वर्गाची महत्त्वाकांक्षा उघडच आहे. मात्र, धर्मसत्ता आणि राजसत्ता या कायमच एकमेकांच्या मदतीने राहिल्याचे आखाड्यांचा इतिहास सांगतो. धर्माच्या नावाने मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या आधारे साधू-महंत आणि त्यांचे आखाडे राजसत्तेच्या किती जवळ होते आणि राजकर्त्यांनाही त्यांच्या ‘आशीर्वादा’ची कशी गरज भासते, साधू-महाराजांच्या भक्त परिवाराच्या रूपात एकगठ्ठा मतांची पेढी कशी उपलब्ध होते हेच यातून सिद्ध होत आले आहे. बदलत्या काळातही भारतातील ही धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचे साटेलोटे कायम राहिल्याचे दिसते. इतिहासकाळापासून सुरू झालेले धर्मसत्तेचे आणि राजसत्तेचे साटेलोटे आजच्या काळात भारतीय राजकारणातही गहिरे झालेले दिसते.

  धर्मसत्ता आणि राजसत्तांचे साटेलोटे :
  अवधच्या नवाबापासून भरतपूरचा जाट राजा, बनारसचा राजा, बुंदेलखंडचे राजे, मराठा राजे माधवजी सिंधिया, जयपूर, जोधपूर, जैसरमेलचे महाराज यांच्यासोबतचे साधूंचे घनिष्ठ संबंध आपल्याला इतिहासाच्या संदर्भात पाहता येतात. धार्मिक कार्याच्या बरोबरीने राज्यकारभार, व्यापार आणि लष्करी कारवायांमध्ये साधूंचा सक्रिय सहभाग असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. पेशवेंच्या दरबारातील ब्रह्मेंद्रस्वामी त्यापलीकडे जाऊन राज्यकारभाराचीच सूत्रे हलवत असल्याचे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी नमूद केले आहे. त्यासाठी त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामींच्या २३६ पत्रांचा दाखला दिला आहे. (राजवाडे लेखसंग्रह, भाग एक, ऐतिहासिक प्रस्तावना, पान १४८) ‘१७२६ च्या सप्टेंबरात पावसाळा संपल्यावर ब्रह्मेंद्रस्वामी कर्नाटकात भिक्षार्थ स्वारीस निघाला. (पान १५४)’ ‘राजापुरीकर खानाने मुलाखतीस आल्यास स्वामीस दोन गावे इनाम देण्याचे अभिवचन दिले. (पान १५६)’ ‘संभाजीच्या मनात मानाजीवर स्वारी करण्याचा विचार उत्पन्न करण्यास मुख्य कारण ब्रह्मेंद्रस्वामी होता. (पान १७४)’ ‘१७४०च्या नोव्हेंबरात ब्रह्मेंद्रस्वामींच्या शिफारशीवरून तुळाजी आंग्र्याची बेडी बाळाजी बाजीरावाने काढून टाकली. (पान १७५)’ ‘१७३८ मध्ये वसई लवकर फत्ते होईल, आपला आशीर्वाद आहे, असे स्वामी म्हणाले, मात्र तसे झाले नाही तेव्हा फिरंग्यांशी तह करून घेण्याचे बाजीरावाला ब्रह्मेंद्राने सुचविले.... पुढे वसई सर झाली नाही. स्वामींचे भाकीत खोटे ठरले. इतके झाले, तरी पेशव्यांची स्वामीवरील श्रद्धा रेसभरही कमी झाली नाही. शेवटी ५ मे १७३९ मध्ये वसई सर झाली व चिमाजीने ब्रह्मेंद्राच्या भुलोबाला नवसाच्या १२५ पुतळ्या पाठवून दिल्या. ब्रह्मेंद्रांचा आशीर्वाद तीन वर्ष खितपत पडला, तरी पेशव्यांची त्याजवरील श्रद्दा कायम राहिली, हीच ब्रह्मेंद्रस्वामीच्या वजनाची खरी गुरुकिल्ली आहे. (पान १८९-१९०)’


  ‘स्वामींनी नावाला मात्र परमहंसांची दीक्षा घेतली होती. बाकी त्यांच्या नावावर आत्म्यावर वासनांच्या गोधडीची जाड पटले बसलेली होती. दिल्ली आग्र्यापर्यंत बाजीरावाचे गुरू म्हणून कीर्ती व्हावी, सर्व मराठा मंडळात मान मिळावा, सर्वांनी आपणास भिऊन असावे, ही स्वामींच्या मनातील जबरदस्त आकांक्षा होती. ही मानसिक आकांक्षा तृप्त झाल्यावर, स्वामींचा हेतू पुष्कळ द्रवसंपादन करून अनेक गावं इनामे मिळवून शरीरसुखाची साधने वाढवावी, असा होता. बाजीरावाच्या आणि छत्रपतींच्या जोरावर, सरदारांना दहशत घालून स्वामी हजारो रुपयांची दीक्षा कमवी. नाना प्रकारची वस्त्रे व भूषणे मिळवी. कायम आणि हंगामी मिळून स्वामींची वार्षिक प्राप्ती पंचवीस हजारांच्या खाली नव्हती. यापैकी बराच भाग स्वामी अडल्यावेळी बाजीरावाला कर्जाऊ देत असे. स्वामीने कर्जाच्या फेडीसाठी तगादा केला की बाजीराव गोगलगाईप्रमाणे मऊ होत असे.’ (राजवाडे, पान १८८) इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख अर्थात लोकहितवादींनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात, ‘सयाजी महाराजांजवळ लाडबा भगत होता व त्यांचे पुत्र खंडेराव गायकवाड यांच्याजवळ फकीर जमले होते व मल्हाररावांजवळ दादा अंबीकरांसारखे अनुष्ठानी रोज अंगारा देण्यास येत, ते बहुतांनी पाहिले असेल. महादजी शिंदे यांचे गुरू बीडचे फकीर व सातारकर महाराजांचे गुरू रामदास व गणेशदेव माहुलीकर होते. पेशव्यांचे गुरू चिंचवडकर देव होते. तशी दर एक राजाजवळ ही खुळे आहेत.’ (संदर्भ - कुंभमेळा - साधूंचा की संधिसाधूंचा, उत्तम कांबळे, पान ९५)

  साधू समाज आणि राजाश्रय :
  स्वातंत्र्यपूर्व काळात साधू समाज कशा प्रकारे राजेमहाराजांच्या आश्रयाला राहिला होता, भाडोत्री लष्करी सैनिक म्हणून त्यांनी कशी सेवा देत होता, त्याच्या बदल्यात त्यांना वतनाच्या जमिनी आणि तनखा कशा मिळाल्या होत्या, त्यातूनच ते राजांना व्याजाने कर्ज देत होते, प्रसंगी राजकीय डावपेच आखण्यापासून युद्धावर जाण्यापर्यंत कसे सक्रिय होते, या साऱ्याचा तपशील इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला सहज सापडत आला आहे. खरेतर ब्रिटिश काळातही स्थानिक संस्थानांसोबत साधू आणि आखाडे यांचे परस्परावलंबी संबंध राहिले होते. गुजरात नरेश तोफांनी सलामी देत असल्याची माहिती शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती सांगतात. आता गुजरात सरकारनेही तो परिपाठ कायम ठेवल्याचे ते म्हणाले. १९४४ ला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने कुंभमेळ्याला स्थगिती दिली. साधूंचे डेरे पडले होते. आठवड्यावर कुंभ आलेला. ४ एप्रिल १९४४. अखेरीस बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कौन्सिल ऑफ स्टेटचे सदस्य राजा गोविंदलाल पित्ती, ठाकूर लालस्वयंबर सिंहजी, गंगाप्रसाद मिश्रजी, आनंद प्रकाशजी यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले. त्यांनी हिंदू महासभेच्या के. सी. नियोगींची भेट घेतली. सभागृहात याविषयी चर्चा झाली. कुंभमेळ्यावरची स्थगिती उठवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ब्रिटिश सरकारकडे केली. चर्चा झाली. सरकारनं स्थगिती उठवली आणि ९ एप्रिल १९४४ ला रेडिओवरून त्याची बातमी प्रसारित करण्यात आली. आणि कुंभमेळा झाला.

  आर्थिक - राजकीय संबंध :
  ‘साधू तो संन्यासी होते है... वौ किसी के ना होते...’ असं सांगणाऱ्या सर्वच साधू-महंतांचे, आखाड्यांचे आणि गुरूंचे राजकीय हितसंबंध आजवर स्पष्ट होत आले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील प्रत्येक आखाडा आणि साधू-महंत कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत. देशाच्या विकासासाठी कोणता राजकीय पक्ष सक्षम असल्याचे तुम्हाला वाटते? या उत्तरादाखल साधूंची सर्वाधिक पसंती भाजपला मिळत आली आहे. मागे कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह नाशिकला आले तेव्हा त्यांच्या स्वागताच्या जाहिराती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी दिल्या नव्हत्या, तर अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह चौहान यांनी दिल्या होत्या. त्यांच्या जाहिरातींवर आशीर्वादपर नावे आणि फोटो होते - श्रीमहंत नारायण गिरी, दुधेश्वर पीठाधीश, गाझियाबाद. मिनिस्टर ऑफ इंटरनॅशनल श्री पंचनाम आखाडा, वाराणसी, उत्तर प्रदेश. या जाहिराती देणारे प्रायोजक होते, नाशिकमधील दोन बांधकाम व्यावसायिक. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेश पाठवला होता - ‘कुंभ आस्था एवं श्रद्धा का पर्व है. भारतीय सांस्कृतिक जीवन को राज्य, जाती आदी बंधनों को तोड जनमानस को एक सूत्र मंे पिरोया है. राष्ट्रीय एकता की दृढीकरण मंे कुंभमेलो ने महत्त्वपूर्ण योगदान दिया है’ पंतप्रधानांनी यात हिंदू हा शब्द अत्यंत मुत्सद्दीपणे टाळला. पण दिल्लीत मोदी सरकार येण्यामागे कुंभमेळे आणि साधू समाज यांचा हातभार असल्याचे प्रत्येत साधू आवर्जून सांगत होता. त्या वेळी भेटलेले बिंदू महाराज सांगत होते, मी कधीच मतदान केले नव्हते. २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले. संपूर्ण साधू समाजाने एकत्र येऊन मतदान केले आणि भाजपला, नरेंद्र मोदींना निवडून दिले. मोदींनी कबूल केलेले, सत्तेवर आल्यावर पहिल्यांदा राममंदिर बांधू. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शपथविधी सोहळ्यात साधूमहंत आणि साध्वी यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांची आसने विशेष अतिथींच्या पहिल्या रांगांमध्ये होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या वेळीही नरेंद्र महाराज खास निमंत्रितांच्या व्यसपीठावर विराजमान होते.

  सर्वपक्षीय साधूसत्ता :
  धर्मसत्तेच्या आशीर्वादाने राजकीय सत्ता मिळवणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीयांचा समान वाटा आहे. काँग्रेसचे खासदार श्री सतपाल महाराज हे याचेच एक उदाहरण. १९९६ मध्ये काँग्रसने त्यांना रेल्वेचे राज्यमंत्रीपद दिले होते. मानव धर्म संमेलनाच्या माध्यमातून सत्पाल महाराज सर्वपक्षीय राजकीय आणि धार्मिक नेत्यांना एकत्र आणत. १९८५ मध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रेने प्रभावित होऊन राजीव गांधींनी त्यांना काँग्रेसचे सदस्य केले आणि नेताही. हरिद्वारच्या त्यांच्या आश्रमात भरणाऱ्या मानव धर्म शिबिरात सोनिया गांधी जातीने उपस्थित राहातात, हे वास्तव आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळतच्या प. पू. अण्णासाहेब मोरेंच्या स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातील सोहळ्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादीचे निम्म मंत्रिमंडळ उपस्थित असे. माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपण स्वत: केंद्राचे साधक असल्याचे व्यासपीठावरून जाहीर केले होते. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना शांतिगिरी महाराजांचा कोणताही सोहळा टाळता आलेला नाही. सुनील तटकरे यांना नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रत्येक उपक्रमास आवर्जून उपस्थिती लावावी लागते. नाशिकचे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या विजयात महानुभवी संप्रदायाचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरला होता. नाशिक कुंभमेळ्यासमयी साधुग्राममधील आखाड्यांच्या होर्डिंगवर नाशिकमधील दोन काँग्रेस नेत्यांचे फोटो होते. नेत्यांच्या महाराजांना शुभेच्छा आणि महाराजांचे नेत्यांना आशीर्वाद दर्शवणारे. वारकरी सांप्रदायाने ग्रामीण महाराष्ट्राची वैचारिक-आध्यात्मिक प्रगल्भता वाढवून वैष्णव धर्माला वैश्विक, सहिष्णुतेचे कोंदण दिले. सनातन वैदिक धर्माने मात्र सोवळ्याचे आणि कर्मकांडांचे अवडंबन करीत लोकांना धर्मापासून दूर केले. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत सध्या आध्यात्मिक गुरूंची लाट शिरली. सध्याच्या या बाबा-महाराजांच्या अजेंड्यात हिंदुत्व हाच प्रचार प्रसाराचा अजेंडा आहे. हिंदू धर्म संस्कार आणि संस्कृती याचे होत असलेले अवमूल्यन साधूंना आपल्या देशापुढील महत्त्वाची समस्या वाटते. त्यासाठी हिंदू धर्माला संरक्षण देणाऱ्या राजकीय विचारधारेचे ते जोरदार समर्थन करतात. त्यादृष्टीने आखाड्यांचे आणि मठांचे कार्यक्रमही सुरू राहतात. कुंभमेळा ही या कार्यक्रमांना चालना देण्यासाठी मोठीच पर्वणी ठरते...

  हा एका धर्माचा नव्हे, भारतीय सभ्यतांचा मेळा
  आम्ही अलाहाबादचे लोक शहराचाच उल्लेख संगम असा करतो. प्रयागराज, प्रयाग हे शब्दही मुखी येतात, पण त्यात संगम हे पिढ्यान््पिढ्या मुखी रुळलेले. हा कशाचा संगम आहे? गंगा, जमुना, सरस्वती या केवळ नद्यांचा? नव्हे, हा हिंदू-मुस्लिम संस्कृतींचा संगम आहे. प्रयाग हे त्याचे प्रतीक आहे. इथे भरणारा कुंभमेळा पारंपरिकदृष्ट्या या सभ्यतेच्या प्रतीकांचा सन्मान करणारा आहे. मात्र, यंदा २०१९ लोकसभा निवडणुकांचा माहोल असल्यामुळेच उ. प्रदेश सरकारने प्रयत्नपूर्वक यंदाच्या अर्धकुंभमेळ्याची मांडणी आणि सादरीकरण हिंदू धर्मकेंद्री ठेवले आहे, ते अर्थातच परंपरेला छेद देणारे आहे. त्या अर्थाने अलाहाबादचा कुंभमेळा हा कधीही हिंदू धर्मीयांचा म्हणून ओळखला गेला नव्हता. यापूर्वी संगमावर उर्दूमध्ये शायरी लिहिली गेली आहे. कुराणात संगमाच्या वैशिष्ट्यांचा म्हणजेच संगमाच्या संकल्पनेच्या, त्यामधील गुणांचा उल्लेख आलेला आहे. कितीतरी लेखक-कवींनी संगमाची सामािजक सौहार्दाच्या अंगाने महती गायिलेली आहे. इथे सुफी परंपरेशी नाते सांगणारे मुस्लिमधर्मीय, बुद्धिस्ट भिक्खू हेदेखील सन्मानाने सहभागी होत आले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र तंबू, आश्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. यंदाही त्यांची यथायोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यथावकाश त्यांचा सन्मानही राखला जाईल, पण ते दुर्लक्षित राहतील. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे, स्पष्टच आहे, हिंदू चेतना, धर्मसंसद यासारख्या कार्यक्रमांना प्राधान्य असणार आहे. परंतु हा एकट्या हिंदू धर्मीयांचा उत्सव नाही हेही जगाला कळणे महत्त्वाचे आहे.

  प्रा. बद्री नारायण
  (अलाहाबाद येथील जी.बी. पंत सोशल सायन्सेस इन्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. )

Trending