आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककलांच्या ‘नादा’त सापडले करिअरचे ‘सूर’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गवळण ते गोंधळ असोत, भारुडे, कीर्तने असोत की काळाच्या पडद्याआड लुप्त होणारी लोकगीते असोत, लोककलांच्या विस्तारणाऱ्या अवकाशाच्या साक्षीदार असलेल्या या तिघी. लोककला, लोकगीते आणि लोकनृत्य यांची अंगभूत आवड असलेल्या, त्यात काही तरी करण्यासाठी धडपडणाऱ्या, धडपडू पाहणाऱ्या महिलांसाठी, मुलींसाठी एका अमर्यादित अवकाशाची दारं खुली करून देतात.

 

जात्यावरच्या ओव्या, पाळणे, लग्न गीतं, सणांची गाणी आणि उत्सवांमधील नाच... एरवी चार भिंतींत दबलेल्या स्त्रियांच्या ‘आवाजा’ला मोकळं होण्याची संधी मिळाली ती लोककलांमुळे.  बदलत्या काळाप्रमाणे या कलाही बदलल्या. पण ‘लोककला मागे पडताहेत’ या पाच-दहा वर्षांपूर्वीचे नकारात्मक पालुपदही मागे पडून आता आधुनिक साज घेऊन पुन्हा तरारून बहरू लागल्यात. विशेष म्हणजे यात पुरुष कलाकारांपेक्षा महिला कलाकार, त्यातही तरुण मुली काकणभर सरसच आहेत. लोककलांच्या मूळ आवडीला त्यांनी विद्याशाखेतील अभ्यासांची जोड देत, कुठे सोशल मीडियाच्या आधाराने, तर कुठे टीव्ही मालिकांच्या माध्यमातून लोककलांच्या सादरीकरणाचे आधुनिक प्रयोग लोकप्रिय करत आहेत.

 


वयाची तिशी पूर्ण करत असताना ज्योत्स्ना गाडगीळ यांच्या नारदीय कीर्तनाचे ५०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांंना कीर्तनाची आवड वडिलांमुळे निर्माण झाली. गावातील दत्त मंदिरात कीर्तनासाठी कुणी बुवा येत नाहीत म्हणून उद्विग्न वडिलांनी कीर्तन विद्यालयात प्रवेश घेतला आणि लहानग्या ज्योत्स्नाने पाचव्या वर्षापासूनच कीर्तनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. सहाव्या इयत्तेत कीर्तन प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. शास्त्रीय संगीतात पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून लोककला विषयातच पदव्युत्तर शिक्षण घेतलं. एकपात्री प्रकारातील नारदीय कीर्तन हा प्रकार मागे पडलेला दिसतो. ज्योत्स्नाने हाच प्रकार निवडला. कीर्तनासाठी त्यांनी राज्याची सीमाही ओलांडली आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात सध्या ३०० हून अधिक महिला कीर्तनकार आहेत. त्यात तरुणींचे प्रमाण अधिक आहे. सोशल मीडियाचे आक्रमण हे लोककलांना आव्हान नाही, तर वरदान ठरल्याचं त्या म्हणतात. शुभ्रज्योत्स्ना या त्यांच्या फेसबुक पेजचा यात त्यांनी अत्यंत प्रभावी वापर करून घेतला आहे. स्वत:च्या कीर्तनाच्या कार्यक्रमांच्या तपशिलांसोबतच त्या कीर्तनविषयक यावर सातत्याने लिहीत असतात. प्रत्यक्ष कीर्तनात आवर्जून वैविध्य आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला कीर्तनकार म्हणून लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यासाठी कुटुंबामधून त्यांना पाठिंबा हवा, हे मात्र आवर्जून नोंदवतात.


दहीसरला राहणाऱ्या पूजा सावंतांचाही  अनुभव यापेक्षा वेगळा नाही. गवळण, लावणी या लोककलांची निवड केलेल्या पूजा यांना अधिक प्रसिद्धी मिळाली ती टीव्हीवरील मनोरंजनपर कार्यक्रमांमधून. त्यांना मुळात नृत्याची आवड होती. त्यात त्यांचा कल लोकनृत्यांकडेच होता. आपला टिपेचा आवाज लोकगीतांसाठी पूरक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गवळणी, लावण्यांची निवड केली. सध्या त्या ‘महाराष्ट्र गाथा’ या लोककलांच्या कार्यक्रमात सादरीकरण करतात. अन्य संगीत प्रकारांपेक्षा लोकगीते लोकांना थेट भिडतात, त्यांना सहभागी करून घेतात, त्यामुळे त्यांना लोकांचा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. अवघ्या ३ वर्षांत त्यांचेही ३०० हून अधिक कार्यक्रम झाले. आपल्या मातीतील कला जतन करणे त्यांना गरजेचे वाटते. त्यासाठी त्यांनी मुंबईतील शाहीर अमर शेख अभ्यास केंद्राच्या पलीकडे जाऊन थेट नारायणगावला जाऊन गवळणी शिकून घेतल्या. रत्नागिरीचे नमनखेळ, सावंतवाडीचे दशावतार यातून त्या गवळणींचा अभ्यास करत आहेत.  गोंधळासारख्या पुरुषकेंद्री लोककलाही सादर करू लागल्या आहेत. लोककला या स्त्री-पुरुषातील सीमारेषा पुसणाऱ्या असल्याचे त्या मानतात. लग्नसोहळ्यांत कौटुंबिक कार्यक्रमात डीजेपेक्षा लोकगीतांचे कार्यक्रम ठेवले पाहिजेत, असे त्यांना वाटते. लोककला, लोकगीते शिकण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं त्या सांगतात. 


पूजा आणि ज्योत्स्ना यांच्यासारख्याच भावना चौधरी यांनी तर लोकनृत्याच्या तालावर थेट सातासमुद्रापलीकडे झेप घेतली आहे. त्यांनीही बालपणीच्या नृत्याच्या आ‌वडीला लोककला क्षेत्रातील पदविकेची जोड दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपली लोककला पोहोचवणे हा त्यांचा ध्यास आहे. २०१४ मध्ये त्या थायलंड येथील सुरीन इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये, तर २०१६ मध्ये मलेशियातील एसआयएफएसमध्ये त्यांनी लोकनृत्य सादर केले. राष्ट्रीय फेस्टिव्हल्सच्या माध्यमातून त्रिपुरात जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्या होजागिरी नृत्य शिकल्या. राजस्थानात गेेल्या तेव्हा भवई शिकल्या. कर्नाटकातून ढोलोकुनिथा शिकल्या. लोककलांना प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु उचित कलाकारांपर्यंत त्या योजना पोहोचतच नाहीत. जीव तोडून लोककला सादर करणाऱ्या, त्याचा अभ्यास, प्रचार, प्रसार करणाऱ्या अनेक महिलांना याची माहितीही नसते. त्यामुळे ही दरी भरून काढणं गरजेचं असल्याचं त्या सांगतात. या क्षेत्रात संधीची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा संधी तयार करणं महत्त्वाचं असल्याचं त्या मानतात.
गवळण ते गोंधळ असोत, भारुडे, कीर्तने असोत की काळाच्या पडद्याआड लुप्त होणारी लोकगीते असोत, लोककलांच्या विस्तारणाऱ्या अवकाशाच्या साक्षीदार असलेल्या या तिघी. लोककला, लोकगीते आणि लोकनृत्य यांची अंगभूत आवड असलेल्या, त्यात काही तरी करण्यासाठी धडपडणाऱ्या, धडपडू पाहणाऱ्या महिलांसाठी, मुलींसाठी एका अमर्यादित अवकाशाची दारं खुली करून देतात. जिथे तुम्ही तुमच्यातील कलेचाही विकास करू शकता, स्वत:ची स्वतंत्र ओळखही निर्माण करू शकता, करिअर व उपजीविकेचाही मेळ साधू शकता असा विश्वास तिघींनाही वाटतो. अंगभूत कला, आ‌वड, लोककलांबद्दलची कळकळ, सोशल मीडियातून होणारा प्रसार, शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची जोड, लोकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे द्विगुणित होणारा उत्साह यासह या साऱ्या जणी लोककलांच्या लोकप्रिय लाटेवर स्वार झाल्या आहेत. गरज आहे ती त्यांच्यातील या पुढाकाराला, प्रयोगशीलतेला समाजाने साथ देण्याची. 

 

दीप्ती राऊत

लेखकाचा संपर्क : ९७६४४४३९९८

बातम्या आणखी आहेत...