आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियमिततेमुळे अाराेग्य विभागाच्या अाठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची थेट कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आढावा बैठका घेत तालुका व ग्रामपंचायतस्तरीय यंत्रणेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि. ११) नाशिक व त्र्यंबक तालुक्याच्या एकत्रित बैठकीत आरोग्य विभागाला फैलावर घेत कमी काम असलेल्या आरोग्यच्या अाठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. 


महिरावणीच्या दामोदर सभागृहात ही अाढावा बैठक घेण्यात आली. गरोदर माता नोंदणी, मातृत्व अनुदान वाटपासह राष्ट्रीय आरोग्य अभियानात कमी काम आढळून आले. आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही प्रगती नसल्याने जातेगाव केंद्राचे पर्यवेक्षक राजेंद्र भानुसे, एकनाथ वाडे, शिंदे येथील पर्यवेक्षिका, लहवित व राेहिले येथील पर्यवेक्षक, आंबोली येथील पर्यवेक्षिका, जलालपूर येथील आरोग्यसेविकांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शिंदे केंद्रातील कंत्राटी आरोग्यसेविकेसही सेवेतून कमी करण्याचे निर्देश दिले. 


अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी कुपोषणाचा आढावा घेतला. कुपोषित बालकांना कोंबडी वाटप, शेवगा लागवड, ग्राम बालविकास केंद्रााविषयी माहिती घेण्यात आली. नवीन कुपाेषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. डॉ. डेकाटे यांनी आरोग्य विभागाचा आढाव्यात रुबेला आजार मोहीम तसेच पोषण आहार अभियानात प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी जलयुक्त शिवार, मानव संपदा, पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना या विषयांचा सविस्तर आढावा घेत संबंधितांची झाडाझडती घेतली. घरकुल योजनेबाबत कमी प्रगती असलेल्या व अपूर्ण घरकुल असलेल्या सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्रमोद पवार, डॉ. विजय डेकाटे, प्रदीप चौधरी, राजेंद्र पाटील, दत्तात्रय मुंडे, ईशाधीन शेळकंदे, पुरुषोत्तम ठाकूर, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. गर्जे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


नाशिकचीच चर्चा व्हावी : डॉ. गिते. 
डॉ. गिते यांनी कुपोषण, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची चर्चा होत अाहे. सर्व योजनांमध्ये जिल्हा अव्वल करावयाचा असून प्रभावी काम करण्याचे निर्देश दिले. पोषण आहार, स्वच्छता याच सेवांमध्ये जिल्हा पुढे राहील. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात अाल्या. 

बातम्या आणखी आहेत...