MahaElection / MahaElection ; राज्यात वंचित बहुजन- एमआयएम आघाडीत बिघाडीची चिन्हे

आंबेडकरांच्या अपयशामुळे दोन्ही पक्षांत वाढले अंतर,  या आघाडीसाठी हे आहेत घातक मुद्दे
 

विशेष प्रतिनिधी

Aug 11,2019 09:19:12 AM IST

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रात अनपेक्षितपणे एमआयएमला खासदार मिळाला. त्यामुळे संसदेतील या पक्षाच्या खासदारांची संख्या थेट दुप्पट झाली. अनेक मतदारसंघात याच युतीने निकाल बदलवले. लोकसभा निवडणुकीत या दोघांच्या एकत्र येण्याचा हा परिणाम, तर विधानसभा निवडणुकीत काय होईल, यावर राज्यात चर्चा सुरू आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षांचेच सूत या निवडणुकीत जमणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.


राज्यातील मागासवर्गीय मतदार आणि मुस्लिम मतदार एकत्र आले तर सत्तेची गणितेच बदलून जातील, असे संख्याबळ तयार होते. त्या गणिताने प्रभावित होऊन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून एकत्र येण्याची गळ त्यांना घातली. त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले.

एमआयएम कार्यपद्धतीवर नाराज :

मुस्लीमांचे मतदान मिळाले नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकर एमआयएमवर नाराज असले तरी एमआयएमचे अनेक पदाधिकारीही बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. लोकसभेत परस्पर कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर करणे, विधानसभेसाठी औरंगाबाद शहरातील उमेदवारांच्या नावांचीही परस्पर घोषणा करणे हे प्रकार तर या पदाधिकाऱ्यांना खटकले होतेच, पण आताही वंचित आघाडी ज्या प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेते आहे आणि परस्पर उमेदवार ठरवते आहे त्यावरही एमआयएममध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस प्रमाणेच वंचित आघाडीही मुस्लीमांचा नुसताच वापर करून घेते आहे, अशी चर्चा काही पदाधिकारी करीत आहेत.


संयुक्त बैठक निष्फळ
औरंगाबाद शहरात गुरुवारी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलीलही शहरातच होते. त्या दोघांची जागावाटपा बाबत चर्चा होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, चर्चेसाठी आंबेडकरांनी त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना पाठवले. त्यांच्याकडे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ८२ मतदारसंघांची यादी सोपवली. त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे वाटत असताना आपल्याला निर्णय घेण्याचे अधिकारच नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे विश्वसनीयरित्या समजते. या पदाधिकाऱ्यांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही ही प्राथमिक चर्चा होती, असे सांगत अधिक बोलायला नकार दिला.

या आघाडीसाठी हे आहेत घातक मुद्दे
> मुस्लिम मतदार एमआयएमच्या नेत्यांचेही ऐकत नाहीत हे बाळासाहेब आंबेडकरांचे तयार झालेले मत
> वंचित आघाडी मुस्लिमांचा वापर करून घेते आहे हा एमआयएम पदाधिकाऱ्यांचा समज
> जागावाटपावरून होणारे मतभेद : अनुसूचित जातीसाठी राखीव किती मतदारसंघात कोणी उमेदवार द्यायचे यासंदर्भात मतभेद होण्याची चिन्हे

आंबेडकरांच्या अपयशामुळे दोन्ही पक्षांत वाढले अंतर
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एमआयएमला औरंगाबादमध्ये इम्तियाज यांच्या रूपाने एक खासदार मिळाला. याचा अर्थ मागासवर्गीय विशेषत: बाळासाहेब समर्थक बौद्ध मतदारांनी इम्तियाज जलील यांना प्रामाणिकपणे मतदान केले; पण मुस्लिम मतदारांनी खुद्द बाळासाहेब आंबेडकरांनाच मतदान केले नाही, असे चित्र निर्माण झाले. मुस्लिम मतदारांनी मौलाना सांगतील त्यांनाच मतदान केल्याचा ठपका ठेवत आंबेडकर यांनी एमआयएमला मुस्लिम मतदारांचे पाठबळ नाही, असे थेट मतप्रदर्शन केले. त्यामुळे मुस्लिमांचा पक्ष म्हणून एमआयएमला मदत का करायची, असा प्रश्नही आंबेडकर समर्थक विचारू लागले आहेत.

X
COMMENT