आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : जातीपातीच्या राजकारणाला फाटा, विकासामुळे पुन्हा फुलले कमळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड -  भाजपचे पाच व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशा सहा आमदारांनी आपापसात सुसंवाद ठेवून प्रचार केल्याने बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माथी विजयाचा गुलाल आला आहे. एकीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळीत सत्तास्थाने असतानाही  राष्ट्रवादीला लीड मिळवता आली नाही, तर केज मतदारसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होम पिच असतानाही इथे भाजपचाच करिष्मा चालला. या निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाला सामान्य मतदारांनी थारा न देता विकासाच्या बाजूने  कौल दिला.


बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर व बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी भाजपला मदत करत राष्ट्रवादीला धक्का दिला.  भाजपला बीडमध्ये पाच हजार आठशे मतांची लीड मिळाली. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामचे विश्वासू  राजेंद्र मस्के यांच्यासह अशोक लोढा, विजयकांत मुंडे यांना फोडून भाजपत आणल्याने भाजपचे बळ वाढले. दुसरीकडे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीला मदत केली. आमदार मेटेंसह युवक नेते संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील धांडे यांनी मेहनत करूनही राष्ट्रवादीला लीड मिळवता आली नाही. गेवराईत शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित व भाजपचे आमदार लक्ष्मण पवार हे युतीचे नेते असतानाही प्रीतम मुंडे यांना केवळ  ३४४६५ मतांची लीड मिळाली. गेवराईत भाजप कमी पडली की शिवसेना हे बुथनिहाय मतदानावरूनच समोर येईल. 


माजलगाव विधानसभेत लोकसभेच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मोहन जगताप यांना भाजपत आणून राष्ट्रवादीला धक्का दिला. येथून प्रीतम यांना १६ हजार ९०७ मतांची लीड मिळाली.   तर परळीत भाजपने  लोकसभेची जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांच्या ताब्यात नगरपालिका पंचायत समिती  अशा स्थानिक स्वराज्य संस्था असतानाही साेनवणे यांना लीड मिळाला नाही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचे होम पिच असलेल्या परळीत भाजपला १८ हजार ९८० मतांनी लीड मिळाल्याने पंकजा मुंडे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे  लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना हाेम पिच असलेल्या केज मतदार संघात राष्ट्रवादीला ९५ हजार २९६ मते मिळवला आली. या ठिकाणी  आमदार संगीता ठोंबरे, भाजप नेते रमेश आडसकर, विजयकांत मुंडे यांनी भाजपला २० हजार ९३६ मतांची लीड मिळवून दिली. विशेष म्हणजे बजरंग सोनवणे  व त्यांच्या पत्नी सारिका  हे दोघे जिल्हा परिषद सदस्य असल्याने सोनवणे यांना केज मतदार संघात लीड मिळेल, अशी शक्यता असतानाही तसे घडले नाही.   


आष्टीत थ्रिडी भाजपच्या पाठीशी राहीली :

आष्टी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस,  भीमराव धांडे व  माजी आमदार साहेबराव दरेकर या तिन्ही नेत्यांची मोट बांधल्याने या मतदार संघात भाजपला ७० हजार ३१३ मतांची रेकॉर्ड ब्रेक लीड मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची येथे सभा होऊनही मतदारांचा कौल भाजपकडेच राहिला. भाजपने या ठिकाणी दिलेले दोन आमदार, रस्त्याची कामे,  एक जि.प. अध्यक्ष,  एक सभापती अशी पदे तालुक्याला दिल्याने जातीयवादाचा मुद्दा निष्फळ ठरला. 

बातम्या आणखी आहेत...