आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी चर्चेचा खल : नूतन खासदारांनी घेतली ‘माताेश्री’वर जाऊन ठाकरेंची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शनिवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे आपल्या खासदारांसह जाणार आहेत. या बैठकीचे आमंत्रण देण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. भाजपचे निमंत्रण  उद्धव ठाकरे यांनीही स्वीकारले आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयी खासदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्याशी चर्चाही केली.

 


एनडीएची शनिवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या बैठकीला एनडीएच्या सर्व घटक पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांबरोबर शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यात मुंबईतील गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, भाजपचे मनोज कोटक, भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील, ठाण्याचे श्रीकांत शिंदे, नाशिकचे हेमंत गोडसे, पालघरचे राजेंद्र गावित यांचा समावेश होता. या वेळी एकनाथ शिंदे, प्रकाश मेहता आणि अनिल देसाईही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांचे आभार मानून मतदारसंघातील मतदानाचा अहवाल शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांनी त्यांना दिला. रश्मी ठाकरे यांनी  नवनिर्वाचित खासदारांचे औक्षणही या वेळी केले. भाजप कोकण विभाग समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

 

चंद्रकांत खैरे यांनीही घेतली उद्धव ठाकरेंची भेट
औरंगाबादमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव पत्करावा लागलेले चंद्रकांत खैरे यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळजवळ दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी खैरे यांनी आपल्या पराभवाची कारणे उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे समजते. तसेच त्यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांनी मदत न केल्याचेही उद्धव यांच्या कानावर घातल्याचे समजते.