आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे जयंतीच्या कार्यक्रमात परंपरा नसलेल्या भाजप झेंड्यांवर चर्चा! उत्साही कार्यकर्त्याने कमळासह परस्पर लावलेले होर्डिंग्जही चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त झळकणाऱ्या होर्डिंग्ज आणि फलकांवर भाजपचे चिन्ह आणि भाजप नेत्यांचे फोटो नसल्याचा गवगवा काही माध्यमांनी केल्यानंतर परळीतील काही होर्डिंग्जवर अचानक भाजपचे चिन्ह अवतरले. मात्र, पंकजा मुंडे यांना न विचारताच एका कार्यकर्त्याने हे होर्डिंग्ज चिन्हांकित केल्याचे 'दिव्य मराठी'ने घेतलेल्या माहितीत समोर आले. अर्थात, होर्डिंग्जवर चिन्ह आल्याच्याही बातम्या काही माध्यमांनी केल्या.

परळीतील गोपीनाथ गडावर गुरुवारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गोपीनाथरावांच्या जयंतीचा असल्याने आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला येत असल्याने तिथे भाजपचे झेंडे किंवा चिन्ह लावले जात नाही. मागच्या वर्षी झालेल्या कार्यक्रमातही असे काही करण्यात आले नव्हते. मात्र, यंदाच्या कार्यक्रमाला पंकजा यांच्या कथित नाराजीची पार्श्वभूमी असल्याने काही इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी झेंडे आणि कमळाचे चिन्ह नसल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसारित केल्या. त्या संदर्भात खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनीही सकाळीच स्पष्टीकरण दिले. तरीही त्या बातम्या दाखवणे सुरूच राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, भाजपचे एक कार्यकर्ते नरसिंग शिरसाट यांनी दुपारनंतर चार होर्डिंग्ज परळीतील मुख्य रस्त्यावर लावले आणि त्यात भाजपचे चिन्ह असलेले कमळाचे चित्र टाकण्यात आले. त्यामुळे हा निर्णय मुंडे परिवाराचा निर्णय आहे असे समजून त्या होर्डिंग्जच्याही बातम्या करण्यात आल्या.

डिझायनरने कमळ टाकले

सायंकाळी 'दिव्य मराठी'ने होर्डिंग्ज लावणाऱ्या शिरसाट यांना थेट प्रश्न विचारला की, हाेर्डिंगवर कमळाचे चिन्ह लावायला पंकजा किंवा खा. मुंडेंनी परवानगी दिली का? त्यावर कुणालाच विचारले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किंबहुना, आपणही कमळ टाकायला सांगितले नव्हते. नेहमीचा डिझायनर असल्याने त्याने परस्पर चिन्ह टाकले, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी समीकरणावर चर्चा

बीड जि. प. त भाजपची सत्ता आहे. २२ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्या टर्मचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा भाजपच्याच हाती जिल्हा परिषदेची सत्ता आली पाहिजे यासाठी पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे अर्थ व बांधकाम सभापती युद्धाजित पंडित यांच्यासह भाजप नेते राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, रामदास बडे यांच्याशी चर्चा करून समीकरण कसे जुळते याचा अंदाज घेतला.

स्मारकासाठी निधीच्या घोषणेची शक्यता

औरंगाबाद येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी पाच वर्षांत निधी मिळाला नसल्याने काम रखडले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याची विनंती केली. ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली असून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले. या स्मारकासाठी ३० ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्मारकाच्या निधीची घोषणा गुरुवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.

पंकजा हेलिपॅडवरून गोपीनाथगडावर

बुधवारी दुपारी साडेचार वाजता पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने परळीत आल्यानंतर गोपीनाथगडावर पोहचल्या या ठिकाणी मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन त्यांनी घेतले त्यानंतर कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान गुरुवारी गोपीनाथगडावर होणाऱ्या जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परळी ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला असून ३० अधिकारी व दीडशे पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...