आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरावरील व्रण कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृतदेहाखाली दबलेल्या अवस्थेत मी चार मिनिटांचा प्रवास केला असे सांगताना अ‍ॅड. श्रीकांत जेधे शून्यात हरवतात. नंतर पुन्हा आठवणी सांगतात. ऐकणा-यांच्या अंगावर शहारे येतात. मुंबई उपनगरी रेल्वेत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाची आंखों देखी सांगताना जेधेंना आजही गहिवरून येते. जेधे हे लोकलने पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्या डब्याचे छत स्फोटाने उडून गेले. छताचा पंखा उंच उडाला व जेधे यांच्या डोक्यात पडला. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हेअर क्रॅक आला व बॉम्बचे अवशेष त्यांच्या शरीरात जागोजागी घुसून जखमा झाल्या. त्यांच्या डाव्या बाजूला स्फोट झाल्याने डाव्या कानाचा पडदा फाटला होता. आसपास सर्वत्र स्फोटाने जखमी व मृत प्रवासी निपचीत पडले होते. त्यानंतर त्यांची शुद्ध हरपली होती. चार मिनिटांनी शुद्ध आल्यावर कळले की अंगावर चार-पाच मृतदेह होते. गाडी माटुंगा स्थानकात थांबताच हिंमत एकवटून जेधे यांनी मृतदेह बाजूला सारत फलाटाच्या विरुद्ध दिशेला उडी मारली व ते बेशुद्ध झाले.

डोळे उघडले तेव्हा ते केईएम रुग्णालयात होते. त्यांच्याशी गप्पा मारताना सात वर्षांपूर्वीची घटना आजही ताजी वाटते. अ‍ॅड. जेधे हे औरंगाबाद येथील श्रेयनगर भागात कुटुंबीयांसोबत राहतात. सुरुवातीला इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून, त्यानंतर शासनस्तरावर उच्चपदस्थ अधिकारी व आता सेवानिवृत्त झाल्यावर उच्च न्यायालयात ते वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मित्र डॉ. के. डी. गायकवाड व जावई डॉ. अशोक म्हस्के हे तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यावर पूर्ण निष्ठेने उपचार करत आहेत. परंतु हृदयावरील जखमांसोबतच शरीरावरील व्रण आजही कायम आहेत, असे ते आवर्जून सांगतात.