आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद त्वरित दूर करा : राजस्थान काँग्रेसमधील ज्येष्ठ आमदार रामनारायण मीणा यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थान सरकारच्या स्थैर्यासाठी पक्षातील अंतर्गत मतभेद त्वरित दूर करण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार राम नारायण मीणा यांनी केले आहे. मीणा यांनी अलीकडेच लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या इतर २४ उमेदवारांप्रमाणेच त्यांनाही पराभव पत्करावा लागला होता.


वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पाच वेळा आमदार राहिलेले मीणा म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व काँग्रेसमधील पेचाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी घटनात्मक तरतुदींचा गैरवापर केला जाऊ शकतो. घटनेच्या कलम ३५६ चा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सरकार अस्थिर करू शकतात. त्यामुळे पक्षातील नेत्यांनी अंतर्गत वादांवर सौहार्दाने तोडगा काढण्याची गरज आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पेच वाढवण्याएेवजी राहुल यांनी सुरू केलेली लढाई आणखी भक्कम केली पाहिजे. पक्षाच्या व्यासपीठावर मत मांडण्याची संधी दिली तर मी माझी मते स्पष्टपणे तेथे मांडेन. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २५ जागांवर काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मीणा यांनी ही मते मांडली. 
राजस्थानमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला होता. २०० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचे १०० आमदार निवडून आले होते, तर सहकारी राष्ट्रीय लोक दलाचा एक आमदार निवडून आला होता. राज्यातील १३ अपक्ष आमदारांपैकी १२ आमदारांनी तसेच बहुजन समाज पक्षाच्या ६ आमदारांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. भाजपचे ७३ आमदार आहेत.

 

देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे
ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मीणा म्हणाले की, ईव्हीएमबाबत अजूनही काही शंका आहेत. ईव्हीएम हॅक करणे शक्य आहे. सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाहीला धोका पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. त्यामुळे लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्व संघटनांनी आता एकत्र येऊन देशासमोरील आव्हानांचा भक्कम मुकाबला करण्याची गरज आहे.