Disney / एकाच वर्षात १०० काेटी डाॅलरपेक्षा जास्त उत्पन्न कमावणारे पाच चित्रपट प्रदर्शित करणारा डिस्ने ठरला जगातील पहिला स्टुडिओ

100 कोटी डॉलर्सची कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये अॅव्हेंजर अँड गेम, द लायन किंग, कॅप्टन मार्व्हल, टाॅय स्टाेरी-४, अल्लाउद्दीनचा समावेश
 

दिव्य मराठी

Aug 18,2019 04:35:16 PM IST

न्यूयॉर्क - टाॅय स्टोरी-४ चित्रपटाने जगभरातल्या बॉक्स ऑफिस वर १०० काेटी डाॅलरच्या (जवळपास ७ हजार काेटी रुपये) उत्पन्नाचा आकडा ओलांडला आहे. १०० काेटी रुपयांच्या उत्पन्नाचा आकडा ओलांडणारा या वर्षातील डिस्नेचा हा पाचवा चित्रपट आहे. हे यश मिळवणारा डिस्ने हा जगातील पहिला स्टुडियाे ठरला आहे. त्याचबराेबर टाॅय स्टाेरी-४ ने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अॅनिमेशन चित्रपटांच्या यादीत आठवे स्थान पटकावले आहे.


‘अॅव्हेंजर एंड गेम’ या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जागतिक बाॅक्स आॅफिसवर २७९ काेटी डाॅलरची (जवळपास १९ हजार काेटी रुपये) कमाई केली आहे. द लायन किंग, कॅप्टन मार्व्हल, अल्लाऊद्दिन आणि टाॅय स्टाेरी - ४ या वर्षात १०० काेटी डाॅलरपेक्षा जास्त कमाई करणारे डिस्नेचे अन्य चित्रपट आहेत. इतकेच नाही तर डिस्ने या वर्षात आणखी काही चित्रपट घेऊन येणार आहे जे १०० काेटी डाॅलरपेक्षा जास्त कमाई करू शकतात. यामध्ये मेलफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ एव्हील, फ्रोझन-२ आणि स्टार वाॅर्स: द राइज ऑफ स्काय वॉकर्स यांचा समावेश आहे. मेलफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ एव्हील आॅक्टाेबरमध्ये, फ्रोझन-२ नाेव्हेंबरमध्ये आणि स्टार वाॅर्स: द राइज ऑफ स्काय वॉकर्स डिसेंबरमध्ये प्रदर्शित हाेतील.


या आधी एक स्टुडियाेने वर्षभरात १०० काेटी डाॅलरपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम चार चित्रपटांचा हाेता. ताेही डिस्नेच्याच नावावर हाेता. वर्ष २०१६ मध्ये डिस्नेच्या राॅग वन: अ स्टार वार्स स्टोरी, फायंडिंग डोरी, कॅप्टन अमेरिका: सिव्हील वाॅर आणि जुटाेपिया यांनी १०० काेटी डाॅलरपेक्षा जास्त कमाई केली हाेती.

या वर्षात व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म डिस्ने प्लस हाेणार लाँच
डिस्ने या वर्षामध्ये डिस्ने प्लस हा व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म देखील लाँच करणार आहे. अमेरिकेत ही सेवा प्रति महिना ६.९९ डाॅलर (जवळपास ५०० रुपये) या प्रमाणे उपलब्ध हाेईल. डिस्नेकडे उपलब्ध असलेल्या विविध कंटेंटचा विचार करता त्यामुळे नेटफ्लिक्सला या क्षेत्रात तीव्र आव्हान निर्माण हाेऊ शकते. यावेळी व्हिडिओ स्ट्रिमिंगमध्ये नेटफ्लिक्स आघाडीवर आहे. त्याचबराेबर डिस्नेने ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्सचे बहुतांश अॅसेट आपल्या ताब्यात घेतले आहेत. या व्यवहारानंतर डिस्नेची स्थिती आणखी भक्कम झाली आहे.

X