Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Dispute in MP Chandrakant Khaire and Ambadas Danave for Aurangabad Constituency

खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवेंमध्ये 'मातोश्री'वरच 'तू तू मै मै', दानवेंना हवीय लोकसभेची उमेदवारी

प्रतिनिधी | Update - Mar 07, 2019, 03:04 PM IST

खैरे भडकले आणि म्हणाले, मी पाच वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी करतोय अन तुला कशी उमेदवारी मिळेल.

  • Dispute in MP Chandrakant Khaire and Ambadas Danave for Aurangabad Constituency

    औरंगाबाद- शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद वाढतच आहे. मंगळवारी मुंबईत तर थेट ‘मातोश्री’वरच तू-तू, मै-मै झाल्याचे समजते. वाद झाल्याचा दानवे यांनी इन्कार केला असला तरी बैठकीस उपस्थित अन्य सूत्रांनी मात्र हा वाद चांगलाच रंगल्याचे सांगितले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांसोबत अर्धा तास बंद दाराआड चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

    दानवे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी, असा दावा पूर्वीच केला होता. अजूनही ऐनवेळी उमेदवार बदलून मलाच उमेदवारी मिळेल, असे दानवेंना वाटते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी खैरे, दानवे हे मातोश्रीवर गेले होते. तेथे खैरेंच्या समक्ष दानवेंनी उमेदवारीची मागणी केली. तेव्हा खैरे भडकले होते. मी पाच वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी करतोय अन तुला कशी उमेदवारी मिळेल, असे ते म्हणाले. त्याला दानवेंनी आक्षेप घेतला. मी पक्षाकडे उमेदवारी मागितले आहे, निर्णय ते घेतील, तुम्ही का बोलतो, असे दानवे म्हणाले. दोघांत शाब्दिक चकमक सुरू झाल्यानंतर ठाकरे यांनी दोघांना एका खोलीत बोलावले. तिघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. बंद खोलीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु तुम्ही सर्वच माझे आहोत आणि अंबादास माझा खास आहे, असे वक्तव्य ठाकरे यांनी बाहेर आल्यानंतर केल्याचे सांगण्यात येते.

    दानवे यांना विचारणा केली असता, आमच्यात कोणताही वाद नाही, असे नेहमीचे वक्तव्य त्यांनी केले पण अंतिम आदेश पक्षाचाच असतो. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हे ठाकरेच ठरवतील, असेही आवर्जून सांगितले. त्यामुळे दानवे यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर जोरदार दावा केल्याचे स्पष्ट होते.

Trending