आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जवाटपावरून सहकार बँकेच्या सभेत तोडफोड; इमारतीच्या गच्चीवर चढून जोरदार घोषणाबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमवारी शेतकरी कर्जवाटपावरून प्रचंड गदारोळ झाला. कर्जवाटपाबाबत समाधानकारक निर्णय न झाल्याने नाराज सभासदांनी घोषणाबाजी केली. रागाच्या भरात काही सभासदांनी खुर्च्याही तोडल्या, तर बँक इमारतीच्या गच्चीवर चढून मनमानी करणाऱ्या संचालक मंडळाविरोधात तीव्र शब्दांत घोषणाबाजी केली. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ५० टक्क्यांऐवजी ४० टक्के वसुली असलेल्या ठिकाणी कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेऊन सभा मध्येच गुंडाळली. 


बँकेच्या ३५ व्या सर्वसाधारण सभेस सोमवारी सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संदीपान भुमरे, अभिजित देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा सुरू होताच गंगापूर, वैजापूर, खुलताबादेतील सभासद, संचालकांनी "शेतकरी कर्जवाटपाचे काय झाले? १२ सप्टेंबर रोजी आम्ही जेव्हा बँकेसमोर आंदोलन केले होते तेव्हा अध्यक्षांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी करणार?' अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मात्र, जमाखर्चाचा विचार करता अध्यक्ष पाटील यांना कर्जवाटपाची इच्छा असूनही निर्णय घेता न आल्याने त्यांनी यावर गप्प बसणे पसंत केले. सभेत प्रश्नांची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना बँकेत येण्यापासून रोखले जाते. प्रतिशेतकरी चार ते पाच रुपये खर्च करून पीक कर्जासाठी अर्ज स्वीकारले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने संतप्त झालेल्या सभासद शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सभा गुंडाळली. यामुळे आणखीच संतप्त होत सभासदांनी खुर्च्यांची तोडफोड केली. बँक इमारतीच्या गच्चीवर जाऊन तीव्र शब्दांत घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. हे कदापि सहन केले जाणार नसून लेखी आश्वासनाप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत कर्ज वाटप न केल्यास आम्ही बँक संचालक व अधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा संतोष जाधव आणि सुभाष भोसले यांनी दिला. विधानसभा अध्यक्ष असताना राष्ट्रगीत गायनाविना सभा गुंडाळण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 


राजकीय आंदोलनाला अर्थ नाही : 
एकूण ८५५ कोटी रुपये कर्ज थकीत होते. त्यापैकी २१२ कोटी ६५ लाख रुपये म्हणजेच केवळ २३ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित ५७८ कोटींची थकबाकी आजही कायम आहे. वाटलेले कर्ज वसूल झाले तरच पुन्हा वाटप करणे शक्य असते. ज्या सभासदांनी १५०० कोटी रुपये बँक ठेव ठेवली आहे, ती वाटायची आणि लोक कर्ज घेतात त्याची परतफेड करणार नसेल तर देणाऱ्यांची देणी परत कशी करायची? शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करणे अयोग्य आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...