Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | dispute in Vanchit Bahujan Aaghadi over Aurangabad Seat and Kolase Patils oppose

वंचित आघाडीत फूट; औरंगाबादेत कोळसे पाटलांना एमआयएमचा विरोध, कोसळसे पाटील म्हणाले..‘हे तर बच्चे आहेत’

श्रीकांत सराफ | Update - Mar 06, 2019, 07:48 PM IST

आमदार इम्तियाज जलील ‘कार्यकर्त्यांची नाराजी, तरीही ओवेसींचा आदेश मान्य करू’

 • dispute in Vanchit Bahujan Aaghadi over Aurangabad Seat and Kolase Patils oppose

  औरंगाबाद- जिल्ह्यात एमआयएमची मोठी शक्ती आहे. बी.जी. कोळसे पाटील यांच्यासारख्या अनोळखी उमेदवाराच्या मागे उभी करून ती वाया जाण्याचीच शक्यता आहे. म्हणून आगामी लोकसभा निवडणूक औरंगाबादेतून एमआयएमनेच लढवावी, असा प्रस्ताव पक्षाचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसींकडे पाठवण्यात आला आहे. दोन-तीन दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. तर कोळसे पाटील यांनी एमआयएमचा विरोध म्हणजे बच्चे कंपनीचे ओरखडे आहेत, असे सांगितले. प्रकाश आंबेडकरांनी मला बहुजन वंचित आघाडीचा नव्हे तर युतीविरोधातील सर्वपक्षीय उमेदवार, असे म्हटले होते. औरंगाबादमधून लढण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादेतील जबिंदा इस्टेटच्या मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. त्यास भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओवेसी यांनी लोकसभेची दिशा स्पष्ट केली होती. आम्ही एकत्र लढणार. एकच उमेदवार देणार. त्यासाठी तयारीला लागा, असा त्यांचा सूर होता. त्यामुळे त्यांचे बोलणे औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवाराला उद्देशूनच असावे, अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना झाली होती. येथील मतदारांची संख्या लक्षात घेता एमआयएमच्या वाट्याला मतदारसंघ येणार, असेही ठामपणे सांगितले जात होते. गेल्या किमान पाच निवडणुकात औरंगाबाद मतदारसंघातून ताकदीचा मुस्लिम उमेदवार उभा ठाकलाच नाही. आता त्याची संधी असल्याचे काहीजणांनी खासगीत ती आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे बोलूनही दाखवले होते.

  प्रत्यक्षात गेल्या महिन्यात आंबेडकरांनी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. पाटील यांचे नाव ऐकताच केवळ एमआयएमच नव्हे तर भारिप - बहुजन महासंघाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला. अर्थात आंबेडकरांनी घोषणा केल्याने भारिपच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. मात्र, एमआयएमचे कार्यकर्ते नाराज झाले. कौन है ये कोळसे पाटील, कहाँ से है. औरंगाबादशी त्यांचा काय संबंध? असा प्रश्न त्यांनी आमदार इम्तियाज यांना विचारला. तेव्हा प्रारंभी त्यांनी त्यांची समजूतही घातली. पण कोळसे पाटील यांच्या विरोधात सूर व्यापक होऊ लागला. त्यातच पाटील यांनी एकास एक लढत होणार असेल तरच लढण्यात स्वारस्य असल्याचे म्हटले. यामुळे तर संभ्रम अधिकच वाढला.

  एकूण परिस्थिती लक्षात घेता मोठी गडबड होण्याची चिन्हे इम्तियाज यांना दिसू लागली. म्हणून त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एमआयएमच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात कोळसे पाटील यांना उमेदवारी देण्यास स्पष्ट विरोध पुन्हा एकदा नोंदवण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात एमआयएमची शक्ती वाया घालवू नये, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार त्यांनी ओवेसींकडे प्रस्ताव पाठवला आहे.

  दरम्यान, कोळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला जगभरातील मुस्लिम ओळखतात. ते सारेच माझ्यासोबत आहेत. एमआयएमचा हा विरोध म्हणजे बच्चे कंपनीचे ओरखडे आहेत. त्याचे मला काही वाटत नाही. तो विरोध पुढे मावळेल. मुळात मी बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार असे आंबेडकरांनी कधीच म्हटले नव्हते. शिवसेना-भाजप वगळता सर्व पक्षांनी कोळसे पाटील यांच्या नावाला पाठिंबा द्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी त्याला अनुकूल आहे, असे म्हणतात. पण राजकारणात कोणाचा काही भरवसा नसतो. तेव्हा पुढचे पुढे पाहू सध्या माझी लढण्याची तयारी सुरू आहे.

Trending