आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजूरला मिरवणुकीत मारामारी; पोलिसांवर दगडफेक, २ जखमी; सहा जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- फटाके वाजवण्यावरुन राजूर येथे रविवारी रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीत गुरुदत्त आणि छत्रपती तरुण मित्रमंडळात तुंबळ मारामारी झाली. या घटनेने वातावरण तणावपूर्ण बनले. शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जमावातील काही तरुणांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही पोलिसांना धक्काबुक्की. या प्रकारात दोन पोलिस जखमी झाले. 


रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. नव्यानेच हजर झालेले पोलिस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर महसूल व पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हस्तक्षेप करून शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. या दोन मंडळातील वादाचा अपवाद वगळता विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.

 
गुरुदत्त आणि छत्रपती या दोन मंडळांच्या विसर्जन मिरवणुका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर आल्यावर दोन्ही मंडळांच्या कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष करत होते. फटाके वाजवण्यावरून कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर धराधरी व मारामारीत झाले. छत्रपती तरुण मित्रमंडळाच्या बँडपथकावर काही तरुणांनी दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तापले. दोन्ही मंडळांच्या मिरवणुका बंद करण्यात आल्या. घटनास्थळी मोठ्या संख्येने जमाव जमला. पोलिसांनी जमावाला शांत रहाण्याचे आवाहन केले. मात्र, जमावातील काही तरुणांनी पोलिसांवरच दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. 


या घटनेने गावातील वातावरण दूषित बनले आहे. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे १०० पेक्षा जास्त पोलिसांना पाचारण करण्यात आले. बाचाबाचीत काही पोलिसांना धक्काबुक्की होऊन दोन पोलिस जखमी झाले. सौम्य लाठीमारानंतर दोन्ही मंडळांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी गणपतीचे विसर्जन न करता गावातून धूम ठोकली. अखेर मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी आरती करुन गणपतीचे विधिवत विसर्जन केले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. अन्य ४० ते ५० आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचा एक व्हिडिओ मिळाला असून त्याचा आधार घेऊन आरोपींची धरपकड करण्यात येत आहे. धरपकडीला घाबरून अनेक महाभाग लपून बसले असून काही परगावी पळून गेले आहेत. 


राजू हरिभाऊ कानकाटे (वय ५०), नंदू हरिभाऊ कानकाटे (५५), विनायक उत्तम चोथवे (३१), पंकज हरिभाऊ कानकाटे (३०), अक्षय राजू कानकाटे (२३), श्रीकांत अशोक कानकाटे (२९) यांना अटक करण्यात आली आहे. राजू कानकाटे व नंदू कानकाटे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. हवालदार नितीन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन बेंद्रे तपास करत आहेत. 


सर्वसामान्यांना त्रास नको 
पोलिसांवरील दगडफेक निषेधार्ह आहे. यापूर्वी राजूरमध्ये असे कधी घडले नव्हते. यापुढे सर्वांनी अधिक जबाबदारीने व संयमाने वागण्याची गरज आहे. जे दोषी असतील, त्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई जरूर करावी, मात्र मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वसामान्य तरुणांना विनाकारण त्रास देऊ नये किंवा अडकवू नये. 
- विनय सावंत, महामंत्री, राष्ट्रसेवा दल. 


मध्यस्थी अयशस्वी 
सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण जागेवरच मिटवले होते. परंतु मिरवणुकीदरम्यान झालेली दगडफेक व पोलिसांवर करण्यात आलेली दगडफेक व धक्काबुक्कीत जखमी झालेले दोन पोलिस यामुळे हे प्रकरण चिघळले. त्याचा परिणाम पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येऊन घटनेत सहभागी आरोपींचा शोध सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...