आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक बिघाडामुळे ट्रूजेटचे विमान ऐनवेळी रद्द, ४७ प्रवाशांची गैरसोय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हैदराबादला जाणाऱ्या ट्रूजेटच्या विमानात सोमवारी ऐन उड्डाणाच्या वेळी अचानक तांत्रिक बिघाड आला. दोन वेळेस प्रयत्न करूनही विमानाला उड्डाण घेता आले नाही. यामुळे विमान रद्द करावे लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेकांच्या पुढील प्रवासाच्या कनेक्टिंग फ्लाइट हुकल्या तर काही प्रवाशांना महत्त्वाच्या बैठकांना मुकावे लागले. आठ प्रवाशांनी उद्याच्या प्रवासाचे तिकीट घेतले. त्यांची निवास व्यवस्था कंपनीने केली. उर्वरित प्रवाशांनी तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी अर्ज केला. 

 

हैदराबाद-औरंगाबाद हे ट्रूजेट कंपनीचे विमान रोज ४:१५ वाजता औरंगाबादला येते, तर ४:३५ वाजता परतीच्या प्रवासाला निघते. ७२ क्षमतेच्या विमानात ४७ प्रवासी बोर्डिंग आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून बसले. विमान उड्डाण घेणार तेवढ्यात पायलटला यात काही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्याने काही तपासण्या करून दोन वेळेस उड्डाणाचा प्रयत्न केला. पण बिघाड असल्याने त्याने उड्डाण टाळले. थोड्या वेळेतच याची सूचना प्रवाशांना देण्यात आली आणि प्रवासी खाली उतरले.

 

संतापाचा उद्रेक 

विमान रद्द झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. त्यांनी ट्रूजेटच्या स्टेशन मॅनेजर प्रतिमा थोटे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, ०.०१ टक्केही तांत्रिक बिघाड असेल तर विमान उड्डाण करणे धोकादायक असते, हे प्रवाशांच्या जिवावरही बेतू शकते, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी प्रवाशांना उद्याचे तिकीट किंवा तिकिटाचे पैसे परत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याप्रमाणे आठ प्रवाशांनी मंगळवारचे तिकीट घेतले. त्यांच्या निवासाची सोय कंपनीने केली. उर्वरित प्रवाशांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. ही रक्कम ५ ते ७ दिवसांत त्यांच्या खात्यात जमा होईल. ६ जणांना कंपनीच्या गाडीने हैदराबादला जाणाऱ्या खासगी बसच्या पाॅइंटवर सोडल्याचे थोटे यांनी सांगितले. 

 

मीटिंग हुकणार 
मंगळवारी सकाळी ९:३० वाजता आमच्या कंपनीची महत्त्वाची बैठक आहे. त्यासाठी आम्ही ४ जण ट्रूजेटच्या विमानाने चाललो होतो. मात्र ते रद्द झाल्याने रेल्वे किंवा बसचा पर्याय बघतोय. अन्यथा बैठकीला मुकावे लागणार आहे. - विजय इंगळे, ए.जे. मयाल, श्रीकांत उके, आर.डी. प्रशांत. 


आज हैदराबादचे तंत्रज्ञ करणार दुरुस्ती विमानासोबत कंपनीचा एक इंजिनिअर असतो. मंगळवारी सकाळी दुसरी टीम शहरात येऊन दुरुस्तीचे काम करेल. त्यानंतर हेच विमान हैदराबादला झेप घेईल, असे प्रतिमा थोटे म्हणाल्या. 

 

प्रचार थांबवून आलोय :

आठ दिवसांपासून तेलंगणात प्रचार करतोय. एक दिवसासाठी औरंगाबादेत आलो हाेतो. उद्या सकाळी महत्त्वाची सभा आहे. ती टाळणे शक्य नसल्याने आता खासगी गाडीने तेलंगण गाठावे लागणार आहे. - फेरोज खान, नगरसेवक, एमआयएम ़


उद्याचे तिकीट घेतले :

आईला सोडवायला हैदराबादेत निघाले हाेते. पण विमान रद्द झाल्याने उद्याचे तिकीट घेतले आहे. मात्र, पुढील प्लॅनिंग बिघडले आहे. - डॉ. गौरी देशपांडे 

बातम्या आणखी आहेत...