आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, जनतेत सरकारच्या विरोधात असंतोष; राधाकृष्ण विखे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र आणि राज्यातील सरकारच्या धोरणांमुळे जनतेमध्ये सरकारविषयी प्रचंड चीड आहे. त्यामुळे काँग्रेसला आता रस्त्यावर उतरण्यावाचून दुसरा पर्याय नाही, असे आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांना प्रचारासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे सांिगतले जाते, हा पैसा पक्षाकडे आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करत एकच खळबळ माजवून दिली. 


नगर शहरातील तुषार गार्डन येथे जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार नंदकुमार झावरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन मांढरे, वसंतराव कापरे, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, बाबा ओहळ, उदयसिंह पाटील, उबेद शेख, निखिल वारे, हेमंत ओगले, करण ससाणे, सचिन गुजर, राजेंद्र जाधव, संपतराव म्हस्के, डॉ. भास्कर शिरोळे, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब भदगले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


िवखे म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश, लोकशाही मूल्य पायदळी तुडवून सातत्याने होणारी संविधान बदलाची भाषा, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी महिलांसंदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढीबरोबरच मागील साडेचार वर्षात झालेल्या विश्वासघाताचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी १० सप्टेंबरला भारत बंद यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 


मागील चार वर्षांचा केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार जनतेने अनुभवला आहे. आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही, ही भूमिका जनतेची झाल्याने सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना आता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


या सरकारने मागील चार वर्षांत समाजातील सर्वच घटकांचा केलेल्या विश्वासघाताचा जाब विचारण्यासाठी हा जनसंघर्ष सुरू करण्यात आला आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेचा शनिवारी पुण्यात समारोप होणार आहे. सध्या राज्यभर वातावरण बदलत आहे. लाेकांमध्ये सरकारविषयी प्रचंड चीड आहे. राफेल विमान खरेदीत एक लाख कोटींचा घोटाळा झाला आहे. केंद्र सरकारच्या एचएल या विमान तयार करणाऱ्या कंपनीबरोबरचा करार मोडून सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीबरोबर करार करून त्यंाच्या कंपनीला फायदा मिळवून दिला. यावर पतंप्रधान काहीच बोलत नाहीत. संरक्षणमंत्री म्हणतात हा गोपनीय करार आहे. सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येणार आहे, असे विखे म्हणाले.

 
जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, ती पाळली गेली नाहीत.आरक्षणासाठी प्रत्येक समाज रस्त्यावर येत आहे. या सरकारने जनतेची टिंगलटवाळी केली आहे. पुन्हा सत्तेत यायचे असेल, तर काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणूक आली आहे, भाजप एक कोटी रुपये देणार आहे, असे म्हणतात मग हा पैसा त्यांच्याकडे आला कुठून ? असा प्रश्न शेलार यांनी करून आगामी निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. 


जनसंघर्ष यात्रेचा नगरमध्ये समारोप 
२ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला उत्तर महाराष्ट्रातील फैजपूर (जि. जळगाव) येथून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा समारोप नगरमध्ये होणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी १५ सप्टेंबरला माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे विखे यांनी सांगितले. 


आंदोलनात राष्ट्रवादी होणार सहभागी 
काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाल्यानंतर मोठी आंदोलने झाली होती. आताही दरवाढ झाली आहे. त्याविरोधात १० सप्टेंबरला भारत बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात राष्ट्रवादीही आमच्याबरोबर आंदोलनात सहभाग घेणार आहे. तालुका व गाव पातळीवरही आंदोलन झाले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...