आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जळगाव महापालिकेसह जामनेर, मुक्ताईनगर पालिकांतील पराभवाचे शल्य बाेचते अाहे. या निवडणुकांत पक्षविराेधी कारवाया करणाऱ्यांना नारळ देऊन पक्ष संघटन मजबूत करू. येत्या १५ दिवसांत तालुकानिहाय गावाेगावी 'वन बूथ टेन युथ' ही माेहीम राबवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी साेमवारी जिल्हा बैठकीत केला.
जळगावातील पक्ष कार्यालयात ही बैठक झाली. जिल्हाध्यक्षपदी अॅड. रवींद्र पाटील व कार्याध्यक्षपदी विलास पाटील यांची निवड झाल्यानंतर सत्कारासाठी ही बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकीमध्ये पक्षाचा झालेला दारुण पराभव हा पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याची खंत व्यक्त केली. पक्षात राहुन अन्य पक्षांशी सलगी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज राहण्याचाही ठराव या वेळी करण्यात आला. सुरुवातीलाच महिला सदस्या सविता बोरसे यांनी आपण १० वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहोत. महापालिकेत घरोघरी जावून प्रचार केला. या दरम्यान पक्षाच्या एकाही नेत्याकडून याबाबत मार्गदर्शन मिळाले नसल्याची खंत व्यक्त करीत या निवडणुकीत महिलांचा विचार केला गेला नाही, याबाबत जाब विचारला. भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनीही पक्ष आता शिस्तीत मागे पडला आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्येही नेतृत्व दिसून येत नाही. पक्ष कार्यालयातही शिस्त राहिली नाही, असे सांगत निवडणुकांमध्ये पक्षाला नुकसान पोहोचवणाऱ्या व्यक्तींना जाब विचारावा, असेही सांगितले. माजी आमदार दिलीप सोनवणे यांनीही पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही, केवळ पदे घेऊन चमकोगिरी करुन प्रसिद्धीत राहणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. यासाठी योग्य नियोजन करण्याचीही मागणी केली. बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष तथा अामदार डाॅ. सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह काही दिग्गज पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती हाेती.
कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी प्रास्ताविकात पक्ष संघटनेबद्दल माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, बापू परदेशी, आनंदराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. माजी अामदार दिलीप वाघ, अरुण पाटील, अ. गफ्फार मलिक, कल्पना पाटील, कल्पिता पाटील, मीनल पाटील, विजया पाटील, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, डॉ. सुषमा चौधरी, प्रतिभा शिरसाठ, सुकराम पाटील, प्रदीप भोळे, काशिनाथ इंगळे, वाल्मीक पाटील, संजय गरुड, योगेश देसले, मीनाक्षी चव्हाण, लता मोरे आदी उपस्थित होते. वाय.एस. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ललित बागुल यांनी आभार मानले.
सूक्ष्म नियाेजन करू : अॅड. रवींद्र पाटील
नूतन जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील म्हणाले की, सद्या पक्ष अडचणीत आहे. संघटना मजबुतीचे आव्हान सर्वांसमोर आहे. सोशल मीडियासह सर्व माध्यमांचा वापर करुन पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले जाईल. मागील काळात काय झाले, याची चर्चा न करता काम करणाऱ्यांना पक्षात घेऊन काम करू. यासह पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांना नारळ देऊन मोकळे करू, असा इशाराही जिल्हाध्यक्ष अॅड. पाटील यांनी दिला.
अन्यत्र सलगी ठेवणाऱ्यांना बाहेर काढा
बैठकीत प्रदेशचे पदाधिकारी किती आहेत, ज्यांना पक्षातून आमदार व्हायचे आहे ते बैठकांना येत नाहीत. उशिरा जागे होत असाल तर पराभव होईलच, असे सांगत इतर पक्षांशी सलगी ठेवणाऱ्यांना बाहेर काढा, अशी मागणी रमेश माणिक पाटील यांनी केली. तिलोत्तमा पाटील यांनी पराभवाची कारणे शोधून उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. उद्धव पाटील यांनीही मनाेगत व्यक्त केले.
प्रयत्न केला तर परिवर्तन अटळ : माजी मंत्री देवकर
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या वेळी सांगितले की, शहरात पराभव झाला असला तरी, ग्रामीण भागात पक्षसंघटन मजबूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. प्रयत्न केला तर परिवर्तन अटळ अाहे. तळमळ सर्वांना आहे, पण सुरुवात कोण करेल, हा खरा प्रश्न आहे. संघटना सक्षम करण्यासाठी नियोजन करू. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते साेडवण्याचा प्रयत्न सर्व मिळून करू, असे देवकर यांनी सांगितले.
बूथ कमिट्या नियुक्त करा : अरुण गुजराथी
माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी पराभव कसा झाला का झाला, याची कारणे अनेक आहेत, असे सांगत कार्यकर्त्यांची निष्ठा, चरित्र आता ओळखणे आवश्यक झाले आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, यामुळे सर्वच संपले असे नाही. संघटनेसाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना गुजराथी यांनी दिल्या. पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांनी, कार्यकर्त्यांना आता मेहनत घ्यावी लागणार असून प्रत्येक गावात बूथ कमिट्या नियुक्त कराव्या, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.