आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजितसिंह चुंगडे, पाेलिस कर्मचारी जस्सी यांना दुहेरी जन्मठेप, तर दोघे जण निर्दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडातील प्रमुख आरोपी रणजितसिंह चुंगडे व पोलिस कर्मचारी जस्सी उर्फ जसवंतसिंह या दोघांना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली; तर आरोपी रुपेश चंदेल व राजूसिंह मेहरे या दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. 


३ डिसेंबर २०१५ रोजी किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारात रणजितसिंग चुंगडे व पोलिस कर्मचारी जस्सी यांनी गोळ्या घालून व धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली होती. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, जसवंतसिंह व उर्फ जस्सी, रुपेश चंदेल व राजीव मेहरे यांच्याविरुद्ध कलम ३०२, १२० ब, २०१, आर्म अॅक्ट व ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी रणजितसिंह चुंगडे व जस्सी यांना दोषी ठरवत कलम १२० ब नुसार जन्मठेप, कलम ३०२ नुसार जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, दंडाची १० हजार रुपये रक्कम सरकारी तिजोरीत तर ४० हजार रुपये मृतकाच्या पत्नीला देण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे यातील आरोपी राजूसिंह मेहरे व रुपेश चंदेल यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचेही सरकारपक्षाने मान्य केल्याने कलम २०१ नुसार निर्दोष सुटका करण्यात आली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील आर.आर. देशपांडे यांनी तर आरोपींच्या वतीने अॅड. दिलदार खान, अॅड. वसीम मिर्झा, अॅड. हातेकर, व अॅड. सुभाष काटे यांनी युक्तिवाद केला. 


रणजितसिंहला वय व घरी कोण आहे असे विचारले
दुपारी ३ वाजता पुन्हा न्यायाधीश ए.एस. जाधव न्यायालयात अाले. त्यानंतर आरोपी रणजितसिंग चुंगडे याला न्यायाधीश जाधव म्हणाले की, वय किती आहे , त्यावर ६५ असल्याचे चुंगडेने सांगितले. त्यानंतर पुन्हा घरी कोण कोण आहे असे विचारले असता पत्नी, दोन मुले व दोन मुली, सुना असल्याचे चुंगडेने सांगितले. नंतर जस्सी यालासुद्धा शिक्षा सुनावण्याआधी न्यायाधीशांनी विचारले असता त्याने पत्नी व दोन मुले असल्याचे सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी दोघांनाही दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 


न्यायालयाची नाराजी
आरोपीला न्यायालयात उशिरा का पाठवले व व्हिडिओ कॉन्फरन्सींगविषयी न्यायाधीशांनी अमरावती कारागृह अधीक्षकांशी बोलणे केल्यानंतर आम्हाला पोलिसांनी बंदोबस्त उशिरा दिल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीशांनी गंभीर दखल घेतल्याचे अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अमरावती पोलिसांनी बंदोबस्त उशिरा दिल्याने न्यायालयाचे कामकाज दोन तास थांबले होते. 


आर्म अॅक्टमधून चाैघेही निर्दोष 
आर्म अॅक्ट हा गुन्हा चारही आरोपींवर होता. मात्र याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या चुकीच्या परवानगीमुळे हा गुन्हा न्यायालयात टिकू शकला नाही. त्यांनी आर्म अॅक्टच्या परवानगीला मंजुरी देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी न देता त्यावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असल्याने त्याचा फायदा चारही आरोपींना झाला व ते निर्दोष सुटले. 

 

हायकोर्टात आव्हान देणार 
या गुन्ह्यात दोन्ही साक्षीदार खोटे बोलत आहेत. त्याचा फायदा सरकार पक्षाला झाला. आम्ही या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत. तेथे आम्हाला न्याय मिळेल. 
- अॅड. दिलदारखान, आरोपीचे वकील 


आरोपी जसवंतसिंगने आधी गळ्यावर वार केला 
आरोपी जसवंतसिंह हा पोलिस दलात आहे. यानेच आरोपी रणजितसिंह चुंगडेला पूर्ण मदत केली. त्याच्या कटात सहभागी झाला. त्यानेच पहिल्यांदा किशोर खत्री यांच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. 
- अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील 


दुपारी ३.५६ वाजता सुनावली जन्मठेपेची शिक्षा 
दुपारी पावणेदोन वाजतापूर्वीच न्यायाधीश ए.एस. जाधव न्यायालयात आले. मुख्य आरोपी रणजितसिंह चुंगडे याला अमरावती येथील कारागृहातून अकोल्यापर्यंत आणण्यास विलंब झाल्याने आरोपी न्यायालयात येईपर्यंत कामकाज थांबले होते. सुरुवातीला रुपेश चंदेल व राजूसिंह मेहरे याला गुन्ह्यातील सहभागाविषयी न्यायाधीश ए.एस. जाधव यांनी अवगत करीत त्यांच्याविरुद्ध सरकार पक्ष सबळ पुरावा सादर करू शकले नाहीत. म्हणून दोन्ही आरोपींची कलम २०१ नुसार निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे सांगितले. तर मुख्य आरोपी रणजितसिंह चुंगडे व जस्सी यांची आर्म अॅक्ट या कलमातून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यानंतर पुन्हा या आरोपींंना कलम ३०२ व १२० ब नुसार दोषी ठरवण्यात आल्याने दोन्ही आरोपींना शिक्षेविषयी वेळ मागितला असता दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांना वेळ दिला. 


असा झाला विशेष्ज्ञ सरकारी वकील निकम व आरोपीचे वकील दिलदारखान यांच्यात युक्तिवाद 
>विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, आरोपी चुंगडेची पृष्ठभूमी गुन्हेगारी आहे. पोलिस उपअधीक्षक व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यावर चुंगडेने खुनी हल्ला केला होता. त्यात शिक्षा भोगत असताना तो पॅरोलवर आला व त्याने खुनी हल्ला केला. म्हणून त्याला पॅरोल व फर्लोचा शिक्षेदरम्यान फायदा मिळू नये, असा निकाल द्यावा. त्यावर आरोपीचे वकील दिलदारखान यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. शिक्षा सुनावताना आरोपीला अशा प्रकारची अट घालता येणार नाही. ते कारागृहाचे अधिकार आहेत. म्हणून न्यायालय असा निर्णय देऊ शकत नाही. त्यावर आरोपी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने तो अधिकार तुरुंगधिकाऱ्याचा आहे. त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे म्हटले. 
>वाल्याचा वाल्मिकी झाला व वाल्मिकी झाल्यानंतर त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला. आरोपीला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यानुसार आरोपीला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, आरोपी चुंगडेमध्ये सुधारण्याची संधी आहे, असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. दिलदारखान यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...