आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीसाठी मतदारांनी पावसाला धुतले! येथे जाणून घ्या जिल्हानिहाय मतदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम दिव्य मराठी

औरंगाबाद : मराठवाड्यातून ४६ आमदार निवडून देण्यासाठी पावसाची तमा न बाळगता मतदारांनी सोमवारी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मराठवाड्यात सुमारे ६६ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळनंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जे रांगेत उभे राहिले त्या सर्वांना मतदानाचा अधिकार बजावता आला. गेल्या तीन दिवसांत मराठवाड्यात सर्वत्र पाऊस झाल्याने अनेक मतदान केंद्रांत जाण्यासाठी मतदारांना चिखल तुडवावा लागला. काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने पूर ओसरेपर्यंत मतदार मतदानासाठी ताटकळले. 
 

औरंगाबाद : सिल्लोड मतदार संघात सर्वाधिक ७३% मतदान
औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत सरासरी ६५.०६ टक्के मतांची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान सिल्लोड मतदारसंघात नोंदवले गेले असून ते ७३.०१ टक्के आहे. येथे काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार, तर भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष लढत असलेले माणिकराव पालोदकर यांच्यात लढत आहे. सिल्लोड मतदारसंघात ७४.५८ टक्के मतदान झाले. कन्नडमध्ये ६७.२७, फुलंब्री ६०.७९ टक्के, औरंगाबाद मध्य मतदारसंघात ५९.५२, औरंगाबाद पश्चिममध्ये ५८.५१, औरंगाबाद पूर्वमध्ये ६०.९८, पैठण ७१.३, गंगापूर ६३.८४, वैजापूर ६०.८७ टक्के मतदान झाले. औरंगाबाद शहरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले. 
 

जालना : घनसावंगीमध्ये सर्वाधिक ६८.१०% मतदान
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत सरासरी ६७.०९ टक्के मतदान झाले. यात घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक  ६८.१० तर जालना मतदारसंघात सर्वात कमी ५४.४८ टक्के मतदानाची नोंद झाली.   जामखेड येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि जालना शहरात शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. घनसावंगी मतदारसंघातील भोगगाव येथील दोन पैकी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बंद पडल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबली होती.  घनसावंगीत काही केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेनंतरही मतदान सुरू होते. 
 

बीड  : जिल्ह्यात रात्री आठ वाजपेर्यंत मतदान प्रक्रिया   
जिल्ह्यातील परळी, केज, माजलगाव, गेवराई, आष्टी आणी बीड या सहा विधानसभा मतदार संघात  सरासरी ६८.०३ टक्के मतदान झाले. परळी तालुक्यातील सिरसाळा तर बीड तालुक्यातील चौसाळा येथे सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. बीड  शहरातून पांगरीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवलपूराला जाण्यासाठी दीडशे मतदारांना तीन कि.मी. चिखल तुडवावा लागला. केज मतदार संघात आठ ठिकाणी, आष्टी तालुक्यात प्रिंप्री व राघापूर येथे प्रत्येकी एक तर धारूर तालुक्यातील चारदरी येथे मतदान केंद्र  सकाळी ११ वाजता अणि दुपारी तीन वाजता मतदान यंत्र बंद पडले. तर माजलगाव तालुक्यातील शेलापुरी,मनुरसह अन्य तीन ठिकाणी ईव्हीएममध्ये  बिघाड झाला होता. 
 

उस्मानाबाद : मतदानाची टक्केवारी यंदा घसरली
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सरासरी ६२.२१ टक्के मतदान झाले. उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर आणि परंडा या विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. पावसामुळे सकाळी मतदान प्रक्रिया मंद गतीने सुरू होती. मात्र, सकाळी ११ नंतर प्रक्रिया गतिमान झाली. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. चार मतदारसंघांतील ५० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विशेषत: बळीराजा समाधानाने मतदानासाठी बाहेर पडला. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला.
 

परभणी : जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात लागल्या रांगा
पावसामुळे  जिल्ह्यात पहिल्या चार तासांत केवळ १६ टक्क्यांवर मतदान राहिल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.  मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या.  त्यामुळे निरुत्साही वातावरणातही जिल्ह्याचे मतदान ६७.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकले. जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण सुरुवातीपासून चांगले राहिले.   सायंकाळी पाचपर्यंत जवळपास ६६ टक्क्यांपर्यंत हे मतदान गेले. त्यामुळे चारही मतदारसंघांत जिंतूरची आघाडी कायम राहिली.
 

नांदेड : जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान, पावसाने व्यत्यय
काही घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. पावसामुळे पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग अत्यल्प होता. परंतु दुपारी ११ नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. जिल्ह्यात सरासरी ६५.४०  टक्के मतदान झाले. साेमवारी भल्या पहाटेपासूनच पावसाने ठाण मांडल्याने सकाळच्या पहिल्या दोन तासांत मतदार घराबाहेर पडले नाहीत.   जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात पहिल्या दोन तासांत केवळ ४.१४ टक्केच मतदान झाले. सकाळी १० नंतर पाऊस उघडल्याने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.   सायंकाळी उशिरापर्यंत  ९ मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदारांनी मतदान केले. 
 

हिंगाेली : दहा ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड
शहरासह जिल्हाभरात विधानसभा निवडणुकीत सोमवारी (ता.२१) सरासरी ६८.६७  टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. करवाडी (ता.कळमनुरी) येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवला आहे. दरम्यान जिल्ह्यात दहा ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ते बदलावे लागले. तर १८ व्हीव्हीपॅट मशीनही बदलाव्या लागल्या. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत विधानसभा निवडणुकीत ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  पावसाच्या भुरभुरीमुळे मतदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. 
 

लातूर : जिल्ह्यात ६१.७७ टक्के मतदान
लातूर जिल्ह्यात सोमवारी शांततेत सुमारे ६१.७७  टक्के मतदान झाले.  कोणत्याही हाणामारीच्या किंवा वादाच्या घटना घडल्या नाही.   सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे सकाळी मतदानाचा वेग कमी होता. तरीही अनेकांनी  सकाळी छत्री, रेनकोटचा वापर करीत मतदानकेंद्र गाठले.   सकाळी सात ते नऊ या दरम्यान केवळ ३.२९ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजल्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला.  सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळत होत्या.    पावसामुळे शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश  त्यातील बहुतांश केंद्रांच्या दारात  चिखल होता. 
 

सुविधांसाठी जिंतूर, पाथरीतील ९ गावांचा मतदानावर बहिष्कार

परभणी - जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी विधानसभा मतदारसंघातील नऊ गावांतील ग्रामस्थांनी मतदानाच्या प्रक्रियेवर पूर्णतः बहिष्कार टाकून खळबळ उडवली आहे. 

पाथरी विधानसभा मतदारसंघात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या आठ गावांतील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकाराची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका कायम ठेवली. या आठ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवर एकाही मताची सायंकाळी सात वाजेपर्यंत नोंद झालेली नाही.

लासीना, थडीउक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम, खरपी तांडा या गावांचा बहिष्कारात समावेश आहे. या आठ गावांमधील मतदारांनी रस्त्याच्या प्रश्नावर मतदान न करण्याची भूमिका घेतली. या गावांना जोडणाऱ्या मार्गाचा प्रश्‍न गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित आहे.  
भुसकवडी ग्रामस्थांचाही बहिष्कार यशस्वी : जिंतूर मतदारसंघात भुसकवडी या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान केंद्राकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे तेथील अधिकारी, कर्मचारी अक्षरक्षः हाताची घडी लावून बसले होते. निवडणूक अधिकारी उमाकांत पारधी यांनी ग्रामस्थांना रस्ते दुरुस्तीचे आश्‍वासन दिले. परंतु ग्रामस्थांनी बहिष्कार कायम ठेवला. 

बातम्या आणखी आहेत...