आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह : लक्ष्य एक ट्रिलियन डॉलरपर्यंतचे; महाराष्ट्रात १ कोटी अर्थदूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर - राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे महाकाय लक्ष्य राज्याच्या अर्थ विभागाने येत्या पाच वर्षांसाठी आखले आहे. हे लक्ष्य गाठण्यास हातभार लावण्यासाठी उद्योजक, व्यापारी, शेतकरी यासारख्या घटकांमधून एक कोटी अर्थदूत तयार केले जाणार आहेत. या अर्थव्यवस्थेेची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासाठी राज्यातील अर्थतज्ञ, सनदी अधिकारी आणि उद्योगपती अशा त्रिस्तरीय समित्यांकडे देण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. 

केंद्र सरकारने ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पाच वर्षांसाठी निश्चित केले आहे. त्यात राज्यांनाही जबाबदारी उचलावी लागणार असून महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे लक्ष्य खूपच आव्हानात्मक असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ५९ वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था पॉइंट ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत म्हणजेच ३१ लाख हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. आता लक्ष्य ७० लाख हजार कोटींचे आहे. लक्ष्य दुपटीपेक्षा अधिक आहे. मागील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था १० लाख हजार कोटींनी वाढली, तर राजस्थानची अर्थव्यवस्था ८ लाख हजार कोटींची आहे. यावरून मागील पाच वर्षांत आपण एक ‘राजस्थान’ निर्माण केल्याचे लक्षात येईल, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
 

ब्ल्यूप्रिंट तयार होणार
> १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासाठी अर्थ विभागाकडून त्रिस्तरीय समित्या स्थापन केल्या जातील. अर्थतज्ञ, सनदी अधिकारी व उद्योगपती अशा या ३ समित्या नियुक्त होणार असून उद्योगपतींच्या समित्यांमध्ये प्रकर्षाने उद्योगपतींच्या मुलांचा समावेश असावा, असा अर्थ विभागाचा प्रयत्न असेल.
 
> या समित्यांनी १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची ब्ल्यूप्रिंट ३ महिन्यांत सादर करायची आहे. त्यात उपाययोजना असतील. यात कौशल्य विकास, पतपुरवठा, निर्यात शक्यता, इतर राज्यांकडून होणारे प्रयत्न तसेच मध्यम आणि लघुउद्योगांच्या नव्या रचनेचा अभ्यास करणे अपेक्षित अाहे. अहवालानंतर एकत्रित धोरण ठरणार आहे.
 

उद्याेजक, व्यापारी, शेतकरी असतील अर्थदूत
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावण्यासाठी राज्यात उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांच्यासह अन्य महत्त्वाच्या घटकांमधून १ कोटी अर्थदूत तयार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. हे अर्थदूत खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेच्या वाढीचे सैनिक असतील. पाच वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्याला सर्वच स्तरांवर सरकारकडून सपोर्ट केला जाणार आहे. त्यासाठी या व्यावसायिकांच्या अडचणी दूर करणारी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास कोणत्या शेतमालाच्या निर्यातीच्या संधी कुठे कुठे आहेत, याचा जगाच्या पातळीवर आढावा घेऊन निर्यात वाढवण्याचे प्रयत्न होतील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. एक प्रकारे हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठीचे आंदोलनच असेल, असेही त्यांनी नमूद केले.