आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा : शिक्षणसम्राटांचे मदतकर्ते उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंची उस्मानाबादला बदली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत अनेक शिक्षण संस्थांना अस्थायी संलग्नता प्रदान करण्यास मदत करणारे विद्यापीठातील उपकुलसचिव (शिक्षण विभाग) विष्णू कऱ्हाळे यांची उस्मानाबाद उपपरिसरात बदली करण्यात आली आहे. 

‘दिव्य मराठी’ने विद्यापीठातील शिक्षण विभागात चाललेल्या अनागाेंदी कारभाराबाबत वेळाेवेळी वृत्त प्रकाशित केले हाेते. परिणामी अनेक विद्यार्थी संघटनांनी विष्णू कऱ्हाळे यांची बदली करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली हाेती. त्यांच्यासह इतर दोघांच्या बदलीचे आदेश प्र-कुलसचिवांनी काढले आहेत. 

विद्यापीठाच्या अॅकॅडमिक कौन्सिलकडून गोलटगाव येथील अाॅयस्टर अाैषधिनर्माणशास्त्र तसेच वास्तूशास्त्र महाविद्यालयाला अस्थाई संलग्नीकरण प्रदान करण्यात आले होते. या शिवाय औरंगाबाद शहरासह विद्यापीठ क्षेत्रात येणाऱ्या अनेक संस्थांनाही अशाच प्रकारचे अस्थाई संलग्नीकरण दिल्याने शिक्षण संस्था चालकांकडून विद्यापीठाच्या नावाखाली  मनमानी शुल्क वसूल करण्याचा सपाटा लावला होता.  ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर कुलगुरूंनी आॅयस्टर औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली. 

शिक्षण विभागाची एकाधिकारशाही
कोणत्याही संस्थेला संलग्नीकरण देण्यासाठी प्रथम त्या संस्थेची पाहणी करण्यासाठी तज्ञांची एक समिती विद्यापीठाकडून नियुक्त केली जाते. या समितीचा अहवाल उपकुलसचिवांकडे सादर झाल्यानंतर ताे संलग्नीकरणासाठी अॅकॅडमिक काैन्सिलमध्ये ठेवला जाताे. मात्र, उपकुलसचिव स्तरावरच समितीने संलग्नतेबाबत निगेटिव्ह मार्किंग असतानाही अस्थाई संलग्नीकरणासाठी पात्र अशा शेरा मारून तो प्रस्ताव अॅकॅडमिक कौन्सिलसमोर मांडला जातो. त्यामुळे अशा अस्थाई मान्यतेच्या संस्थांचे विद्यापीठांतर्गत पेव फुटले आहे. 

इतर विद्यापीठांत बदल्या का होत नाहीतॽ : महाराष्ट्रातील विद्यापीठांत राज्य सरकारच कर्मचारी अाणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असते. तेव्हा इतर खात्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठातील प्रशासन विभागात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करत असल्यामुळे त्यांचे शिक्षण संस्थाचालकांशी संबंध निर्माण होतात. त्यामुळे कामात पारदर्शकता राहत नाही. परिणामी भ्रष्टाचारही बोकाळतो. त्यामुळे राज्यातील सर्व ११ विद्यापीठांतील वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांच्या दर तीन किंवा पाच वर्षांनी बदल्या झाल्यास विद्यापीठाच्या कारभारात पारदर्शकता येईल, असा मुद्दा विद्यापीठात उच्च पद भूषवलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर उपस्थित केला.  
 

कऱ्हाळेंसोबत यांचीही बदली
प्र. कुलसचिवांनी ५ सप्टेंबर रोजी उपकुलसचिव कऱ्हाळे यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले अाहेत. कऱ्हाळेंसोबतच गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद उपपरिसरात बदलून गेलेले आय.आर. मंझा पुन्हा शिक्षण विभागात बदलून आले आहेत. तर लेखा विभागातील स्थापना पत्र विभागाचे उपकुलसचिव एम.एस. कवडे यांच्याकडे लेखा विभागासह नियोजन व सांख्यिकी विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.
 

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन सुरूच राहणार
विद्यापीठाने कऱ्हाळे यांची बदली केली हे ‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उठवलेल्या आवाजाचे यश आहे. याही पुढे आमच्या संघटनेतर्फे भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन सुरूच राहील. 
-आकाश हिवराळे, शहर जिल्हा संघटक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...