Interview / म.गांधीविषयी ट्वीट केल्यानंतर चर्चेत आलेल्या IAS अधिकारी निधी चौधरी यांची रुपेश कलंत्रींनी घेतलेली रोखठोक मुलाखत; त्यांनी अभिव्यक्ती, व्यंग आणि शरद पवार यांच्याविषयी....

मी १७ मे रोजी मी ट्विट केले आणि ३१ मे रोजी विरोध करणारे जागे झाले. असे का ? निधी यांचा सवाल

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 07,2019 03:20:09 PM IST

“शहाण्याला शब्दाचा मार’ ही म्हण जवळपास कालबाह्य होत चालली आहे. मुंबईमध्ये कार्यरत आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकरणानंतर तर आता असे म्हणावेच लागेल. महात्मा गांधी यांच्याबद्दल निधी चौधरी यांनी केलेले विधान अतिशय बोलके व महत्त्वाचे होते. परंतु भाषिक ज्ञान कमी पडल्यामुळे त्याचा अर्थ समजणे राजकारण्यांना तरी शक्य झाले नाही. ‘मग आज गांधीजींचे छायाचित्र नोटांवर तरी कशाला हवे. त्यांचे नाव देशातील सगळ्या शहरांमधील हमरस्त्यांना तरी कशाला द्यायला हवे. देश-विदेशात त्यांचे पुतळे तरी कशाला हवेत, अनेक संस्थांना दिलेले त्यांचे नावही पुसूनच टाकायला हवे.. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल..’ निधी चौधरींची ही विधाने किमान बुद्धिमत्ता असणाऱ्या कुणालाही सहज समजू शकतील. पण अनेकांना ती समजली नाहीत. भाषेतील वक्रोक्ती हा अलंकार माहीतच नसल्याने आणि तो समजून घेण्याची कुवतही नसल्याने मिडिया आणि सोशल मिडियामध्येही त्यांना ट्रोल करण्यात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने लगेच निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याचा चपळपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला. या सर्व पार्श्वभूमीवर निधी चौधरी यांच्याशी रूपेश कलंत्री यांनी केलेली चर्चा...

नेमके काय म्हणायचे होते तुम्हाला ? मांडण्यात चूक झाली की समजण्यात ?
> चूक कुठेच नाही. मांडलेले अगदी स्पष्ट आहे. व्यंग आहे, उपरोधाने मांडले आहे. पण सगळ्यांनाच कळले यात दुमत असूच शकत नाही. पण १७ मे रोजी मी ट्विट केले आणि ३१ मे रोजी विरोध करणारे जागे झाले. असे का ?

का ?
> का, ते मला सांगता येणार नाही. मला माहीतच नाही. पण मी फार व्यथित झाले. लहानपणापासून बापूंबद्दल बोलते, लिहिते. शाळेत असल्यापासून वृत्तपत्रांमध्ये वाचकांचे मत मांडत होते. कॉलेजमध्ये डिबेट केल्या. कविता लिहिल्या आणि मला गांधींविरोधी ठरवले.

मी माझ्या दुःस्वप्नातही गांधींविरोधी असू शकत नाही. तुम्ही (मीडिया) लोकांनीही थेट टीका सुरू केली.

शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने तुमच्या वक्तव्यावर आक्षेप घेतल्यामुळे त्याची अधिक दखल घेतली असावी..
मी कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आदर करते. पवार साहेब तर या राज्याचेच नव्हे, तर देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असावी. या एका प्रसंगामुळे माझा त्यांच्याविषयीचा आदर कमी होणार नाही. काल होता तितकाच आजही आहे.

लोकांना एक वेळ विरोध चालतो, पण उपरोध नाही, असे म्हणता येईल ?
> यामध्ये व्यंग आहे, पण न चालण्यासारखे काय आहे. एक ट्विट काढून इतका वाद. मी अनेक महापुरुष आणि खास करून गांधीजींविषयी सातत्याने लिहिते. २०१६ मध्ये मी लिहिले, आम्हाला म. गांधी दिल्याबद्दल धन्यवाद.

तुम्ही एक अधिकारी आहात म्हणून टार्गेट करण्यात आले काय ?
> ते माझे वैयक्तिक मत आहे, अधिकाऱ्याचे नाही. आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये आले म्हणजे माझी मौलिकता, कल्पकता, विचार ३० वर्षांसाठी बंद करून टाकली का ? सामाजिक, आर्थिक विषयावर मत मांडणे हीदेखिल माझी सेवा आहे.


मात्र सरकारी सेवेमधील लोक निवृत्तीनंतर आत्मचरित्रातच बोलतात..
> सरकारी धोरणाविरोधात बोलू नये हा नियम आहे तो मी पाळतेच. पण घटनेच्या कलम ५१ अ नुसार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. गांधींविषयी कुणी काही बोलत असेल तर मी उत्तर दिलेच पाहिजे. मी २००६ मध्ये रिझर्व्ह बँकेत होते. २०१२ पासून आयएएसमध्ये आहे. इंडियन मायथॉलॉजी, मुव्हीजवर लिहिते. कवितेतून व्यक्त होते.

वादानंतरची तुमची कविता वाचली.. मै लिखुंगी क्योंकि, ये मुल्क मेरा भी है बसेरा..मै लिखुंगी क्योंकि, स्याह रात में भी स्याही ला सकती ही सवेरा..
> माणूस जिवंत आहे तर विचार आहेत आणि विचार असतील तर ते व्यक्त झाले पाहिजेत. मी ते करते. टीका-टिप्पणी ठीक, पण मला गांधींविरोधी ठरवले जाणे हे म्हणजे विचार करण्यापलीकडचे आहे. मी एकूण १०५ पेंटिंग केल्यात. गर्भधारणेनंतरच्या रजेत मी २५ पेंटिंग महात्मा बुद्धांवर तयार केल्या. विचार करा, जी व्यक्ती अशा वेळी बुद्धांच्या पेंटिंग काढत असेल ती गांधींविरोधी कशी असू शकेल?

कॉमेडी शोमधून राजकारण वगळले जाते, उपरोध पचत नाही, व्यंगाचीही तीच स्थिती ..
> कॉमेडी शोबद्दल मला सांगता येणार नाही. पण यातला व्यंग सामान्य माणसाला कळला तर राजकारणी हे अधिक समजूतदार असतात. त्यांना कळलाच होता. गांधी हे राजकारणाचा विषय होऊच कसे शकतात ? आणि त्यांच्याबद्दल कुणी काही बोलते तर त्याला विरोध करणे हे माझे कर्तव्य आहे.


आता तर विरोधक शांत झालेत, तुम्हाला पाठिंबादेखील वाढल्याचे पोहोचले का तुमच्यापर्यंत..
> हो, त्यामुळे बरे वाटत आहे. तुषार गांधींचादेखील फोन आला होता. ते म्हणाले की ‘बेटा, तू गांधींच्या समर्थनातच लिहिले आहेस. आणि नसते तरी त्याचा विरोध गांधीवादी आता होतोय तसा करत नाहीत.’ मी बोलत राहणार, मला विश्वास आहे की, “स्याह रात में स्याही ला सकती है सवेरा.’

X
COMMENT