आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे आड, तिकडे विहीर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या एका बोगस विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या १२९ भारतीय विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने भारतीय परराष्ट्र खात्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेली कित्येक दशके भारत-अमेरिका शिक्षण संबंध उभय देशांच्या मैत्रीतील महत्त्वाचा दुवा होता आणि त्यामुळे दोन्ही देशांत विश्वासाचे वातावरण होते, ते संबंध आता तणावपूर्ण झाले आहेत. अमेरिकेच्या गृहसुरक्षा यंत्रणेने त्यांच्या देशात शिक्षणासाठी येणाऱ्या, पण तेथे अवैधरीत्या राहणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी एक सापळा रचला होता. या सापळ्यात ६०० हून अधिक परदेशी विद्यार्थी अडकले. त्यात बहुसंख्य भारतीय विद्यार्थी होते. जगभरातून दरवर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी हजारो विद्यार्थी जात असतात. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व मर्यादित प्रवेश यामुळे तेथे काही बोगस विद्यापीठे अशी उघडली आहेत की जी परदेशी विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे स्वीकारून त्यांना शिक्षणासाठी व्हिसा मिळावा म्हणून कागदपत्रांसाठी मदत करतात आणि त्यांना प्रवेश देतात. या विद्यापीठांची इमारत नसते, वर्ग नसतात, शिक्षकवृंद नसतो. त्यामुळे एकदा अमेरिकेत प्रवेश मिळाल्यास मुलांना अशा विद्यापीठात जावे लागत नाही, त्यांना क्रेडिट मिळवावे लागत नाही, त्यामुळे अभ्यासात प्रगती करण्याचा प्रश्नच येत नाही. पण याची दुसरी बाजू अशी आहे की, अमेरिकेत अधिकृतरीत्या शिक्षणासाठी जाणाऱ्यांना अनेक अडथळे पार करावे लागतात. शिकता शिकता नोकरी करणे ही तिथली गरज आहे. त्यामुळे अमेरिकेत स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तात्पुरते काम करण्याची परवानगी मिळते. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एफ-१, एम-१ व जे-१ अशा व्हिसा प्रक्रियेतून जावे लागते. विद्यार्थ्याला जेव्हा एफ-१ व्हिसा मिळतो तेव्हा त्याला अॅक्रिडेटेड प्रोग्रॅम करावा लागतो. या प्रोग्रॅमदरम्यान ६० दिवसांत विद्यार्थ्याला नोकरी मिळाल्यास तो तेथे 'वर्क व्हिसा'वर काम करू शकतो. समजा नोकरी न मिळाल्यास दोन महिन्यांत अमेरिका सोडावी लागते. हे सगळे अडथळे पार करण्यापेक्षा काही बनावट विद्यापीठे स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली अमेरिकेत प्रवेश करवून देतात. एकदा अमेरिकेत आल्यानंतर तिथे अवैधरीत्या राहणे ही त्या विद्यार्थ्याची जबाबदारी ठरते. हे रॅकेट तोडण्यासाठी अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने स्वत:च एका बनावट विद्यापीठाची जाहिरात इंटरनेटवर दिली, तिची वेबसाइट प्रसिद्ध केली. वेबसाइटवर विद्यार्थी शिकत असलेले फोटो, शिक्षकांची माहिती जाहीर केली. या जाहिरातीला भुलून अमेरिकेत राहणाऱ्या ८ जणांनी या विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्यास आपण मदत करू, असे आश्वासन दिले. त्यावर विसंबून राहून अनेक परदेशी विद्यार्थी ज्यामध्ये १३० भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे, त्यांनी या विद्यापीठात प्रवेश घेतला व अमेरिकेत पोहोचल्यावर या सर्वांना अटक झाली. 
आता हा मुद्दा राजनैतिक पातळीवरचा बनला आहे. ट्रम्प सरकारने अवैधरीत्या अमेरिकेत राहणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्याने हे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे होऊ शकते. त्यात अमेरिकेच्या गृहसुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे की, सर्व विद्यार्थ्यांना बनावट विद्यापीठांच्या माध्यमातून चालणाऱ्या रॅकेटची माहिती होती व त्यांना अमेरिकेत अवैधरीत्या प्रवेश करायचा होता म्हणून त्यांनी आमच्या जाहिरातीला प्रतिसाद दिला. या मुद्द्यावर भारतीय परराष्ट्र खात्याचा आक्षेप आहे. त्यांच्या मते भारतीय विद्यार्थ्यांना असे काही रॅकेट आहे याची तसूभरही कल्पना वा माहिती नव्हती. त्यांनी विद्यापीठाने देऊ केलेल्या माहितीवर विश्वास ठेवत अजाणतेपणातून तेथे प्रवेश घेतला. आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेतील भारतीय दूतावास सरसावला आहे. अमेरिकेच्या न्यायालयात या विद्यार्थ्यांची सबळ बाजू मांडण्यात येईलच. पण जे विद्यार्थी या रॅकेटमध्ये सापडले आहेत त्यांना अमेरिकेचा दरवाजा कायमचा बंद झाला आहे हे निश्चित. कारण या मुलांच्या पासपोर्ट, व्हिसावर डिपोर्टेड असाच शिक्का बसणार. हा शिक्का मुलांच्या करिअरवर परिणाम करणारा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्जे काढून लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क भरले अाहे, ते वाया गेलेच, पण आपल्या पाल्याला अटक झाल्याने होणारा मनस्तापही त्यांना भोगावा लागणे हे दुर्दैवी आहे. अमेरिकेतल्या कोणत्याही विद्यापीठाची पदवी घेऊन तिथे नोकरी करणे ही एक सामाजिक प्रतिष्ठा असल्याचे आपल्या समाजात मानले जाते. त्यासाठी आपल्या घामाची कमाई खर्च करण्याइतपत मानसिक तयारी पालकांची असते. बहुतांश पालकांना अमेरिकेतल्या विद्यापीठांची माहिती नसते. त्यात परदेशी शिक्षणासाठी काय करावे लागते, असे सल्ले देणाऱ्या अनेक संस्था आपल्याकडे कार्यरत आहेत, त्यावर ते अवलंबून असतात. या सर्वांनी या घटनेपासून बोध घेणे गरजेचे आहे. शिक्षणाचा बाजार केवळ भारतातच नव्हे, तर जगभर सर्वत्र आहे, तो अमेरिकेतही आहे हे समजून घेतले पाहिजे. 
 

बातम्या आणखी आहेत...