आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुफळ शिष्टाई ! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात लोकपाल नियुक्ती व शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग मिळावा म्हणून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेले उपोषण अखेर मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर आटोपले. अण्णांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे आणि अण्णाही मुख्यमंत्र्यांच्या विधानाशी सहमत असल्याचे दिसून आले. अपेक्षेप्रमाणे हे उपोषण चिघळणार नव्हते. कारण या आंदोलनाला २०११-१२ मध्ये जे ग्लॅमर प्राप्त झाले, तशी परिस्थिती या वेळी तयार केली गेली नाही. संघ परिवाराची छुपी संघटनशक्ती यामागे नव्हती. अर्थात केंद्रातले सरकार संघाचे असल्याने समाजातल्या विविध थरांतील संघसमर्थक बुद्धिवंत, विचारवंत, पत्रकार, सेलिब्रिटीज, माजी सनदी अधिकारी असा गोतावळा या वेळी जमा झाला नव्हता. त्यामुळे अण्णांचे आंदोलन राज्यपातळीवर हाताळण्याची संधी फडणवीस सरकारला मिळाली. सुरुवातीला सरकारने या आंदोलनाकडे फारसे लक्ष दिले नाही. गिरीश महाजन वगैरे मंत्र्यांकरवी चर्चा सुरू होती. दिल्लीतून दोन-एक केंद्रीय मंत्री चर्चेस आले, पण त्या चर्चा निष्फळ ठरल्या. अण्णांच्या आजपर्यंतच्या उपोषणाचा आढावा घेतला तर कोणीतरी बडा नेता आल्याशिवाय, त्याच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याशिवाय, वातावरण बरेच तापवल्यानंतर, मीडियाची ती मुख्य बातमी होईपर्यंत अण्णांनी आपले उपोषण मागे घेतलेले नाही. या वेळी तसेच घडले. पण असेही म्हणता येत नाही की, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही. यापूर्वीच्या युती सरकारने, त्यानंतरच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अण्णांचा एक नैतिक दबावगट दोन दशके वचक ठेवून आहे. 
या वेळचे उपोषण राजकीयदृष्ट्या वेगळे होते. सहा-सात वर्षांपूर्वी ज्या लोकपाल विधेयकावरून देशभर रण माजले होते, त्यातून अण्णा-केजरीवाल यांची जी भ्रष्टाचारविरोधातील चळवळ उभी राहिली, आणि ज्याच्यामुळे काँग्रेसला मोठा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता ते लोकपाल विधेयक संसदेत संमत होऊनही मोदी सरकारने प्रत्यक्षात अमलात आणले नव्हते. अण्णांनी याअगोदर लोकपाल नेमण्यासाठी मोदी सरकारला अनेक पत्रे पाठवली, पण एकाही पत्राची दखल पंतप्रधानांकडून घेतली गेली नव्हती. एवढा अवमान होऊनही अण्णांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी कडक उपोषणाचा मार्ग अनुसरला नव्हता. त्यांनी देशभर दौरे काढले नाहीत, नव्या सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी करून त्यांना सोबत घेऊन नवे आंदोलन उभे केले नव्हते. त्यांच्या या चमत्कारिक 'विरक्ती'मुळे त्यांच्या हेतूबद्दल अनेक शंका-कुशंका पसरत होत्या. महत्त्वाचे म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात संघ परिवाराच्या पाठिंब्यातून जी व्यापक व्यूहरचना अण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभी केली, तसे प्रयत्नही त्यांनी या पाच वर्षांत केले नाहीत. म्हणून पाच-सात वर्षांपूर्वी अण्णांच्या भोवती व सोबतीला जसा देशातील संत, संन्यासी, प्रामाणिक सनदी अधिकारी, तटस्थ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता होता तो या वेळी हटकूनही दिसला नाही. देशभक्तीचा वसा घेतलेली व देशव्यापी कॅम्पेन करणारी 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' ही संस्थाही दिसली नाही. 'मैं अण्णा हूं', 'मैं आम आदमी हूं' छापाच्या गांधी टोप्या घालून कोणी प्रभातफेऱ्या काढल्या आहेत, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवण्याची भाषाही ऐकायला, पाहायला, वाचायला मिळाली नाही. मीडिया विशेषत: इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी या वेळी राळेगण सिद्धीत आपले कॅमेरे, ओबी व्हॅनही पाठवलेल्या दिसल्या नाहीत. ही मंडळी एकाएकी अदृश्य झाल्याने अण्णांचे उपोषण सरकारच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली नाही. आता लोकपालबाबत येत्या १३ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर पुढे काही तरी घडेल या मुद्द्यावर सरकारने अण्णांना थोपवून धरले आहे. मात्र, १३ फेब्रुवारीला काहीच घडले नाही तर हा विषय पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. एकुणात मोदी सरकारची लोकपाल नेमण्याची जर खरोखरच इच्छा असती तर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी लोकपाल नेमला असता. तो त्यांनी नेमला नाहीच, उलट विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्याचे कारण देत हा विषय त्यांनी पाच वर्षे बासनात गुंडाळून ठेवला. अशा परिस्थितीत अण्णांना दिलेल्या आश्वासनानुसार लोकपाल नेमून मोदी स्वत:पुढे आव्हान उभे करतील हे मानणे हा शुद्ध दुधखुळेपणा आहे. लोकपाल हे पदच वादग्रस्त ठरले अाहे. त्याच्या चौकशी कक्षेत पंतप्रधान, मंत्रिमंडळ येत असल्याने नोटबंदीचा काळ व रफाल विमान खरेदी करारातील कथित घोटाळ्याची चौकशी हाेऊ जात असेल तर भाजपसाठी आत्मघात ठरेल. फडणवीस हे मुरब्बी अाणि मुत्सद्दी नेते आहेत. ते स्वत:हून पक्षाला अडचणीत आणणार नाहीत, हे लक्षात घेता अण्णांचे उपोषण कसे सुफळ संपूर्ण झाले ते समजते. 
 

बातम्या आणखी आहेत...