आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोड मोडते तेव्हा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान हे गेली ५० वर्षे राजकारणात आहेत. या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांचे राजकारण बिहारची वेस ओलांडून बाहेर गेले नाही. पक्षाला बिहारमध्ये कधी बहुमत मिळाले नाही. आजपर्यंत बिहारमध्ये राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी अनेक सत्तांतरे झाली; पण पासवान हे कधी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत दिसले नाहीत. त्यांचे राजकारण बिहारमधल्या सर्व जातींना घेऊन आहे असेही नाही. दलित, अतिमागास जाती, मुस्लिम अशा मर्यादित स्वरूपाचे आहे. एवढ्या मर्यादा असूनही पासवान राष्ट्रीय राजकारणात सर्वच आघाड्यांना हवेहवेसे असतात. १९९६ पासून २०१८ पर्यंत ते नेहमी केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. सलग दोन दशके मंत्रिपदावर राहणे हा विक्रम असावा. तर अशा पासवानांना सत्तेसाठी कोणत्याही विचारधारेचे वावडे नाही. ते डाव्याकडून उजव्याकडे, समाजवादाकडून निओलिबरलवादाकडे कुणाशीही जुळवून घेण्यास तयार असतात. आपल्याला केंद्रात एक मंत्रिपद मिळायला हवं, बिहारमध्ये हव्या असलेल्या जागा मिळायला हव्यात यावर ते ठाम असतात, आणि त्यांचे असले हट्ट पुरवलेदेखील जातात. अगदी देशातले सर्वात शक्तिमान असलेले मोदी-शहा या दुकलीलाही त्यांच्या चतुर राजकीय चालीपुढे नमावे लागले. रविवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी बिहारमध्ये एनडीएतील घटक पक्षांचे जागावाटप झाले. या जागावाटपाचा सर्वाधिक तोटा भाजपला सहन करावा लागला. २०१४ मध्ये लोकसभेच्या ज्या पाच जागा भाजपने जिंकल्या त्या सर्व जागा व राज्यसभेची एक जागा पासवान यांना विनाअट देण्याची नामुष्की मोदी-शहा दुकलीवर आली. असे डील करत पासवान हे भाजपमधल्या अनेक चाणक्यांना पुरून उरले. थोडक्यात, राजकारणात नेहमी फक्त भाजपचेच चाणक्य यशस्वी ठरतात असे नाही, तर भाजपचे चाणक्य हरतातही हे स्पष्ट झाले. पासवान यांनी ही किमया साधली त्याचे उत्तर असे की, तीन राज्यांत दणकून मार खाल्ल्याने क्षीण झालेल्या भाजपचे आताच लचके तोडता येतील हे पासवान यांनी हेरले व आपला निशाणा साधून घेतला. 

बिहारमध्ये जातींचे राजकारण नेहमीच महत्त्वाचे ठरत आले. त्यात सत्तेत भागीदारी हवी असेल तर मागास, अतिमागास, दलित कार्ड खेळावे लागते. त्यात पासवान वस्ताद आहेत. पासवान एकाबाबतीत अन्य प्रादेशिक नेत्यांपेक्षा उजवे आहेत ते म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणात हवा कोणत्या बाजूला आहे, याचा अंदाज निवडणुकांपूर्वी वर्ष-सहा महिने अगोदर येतो. त्यांनी अशी हवा ओळखण्याची कला आपल्या चिरंजीवालाही शिकवली आहे. काही दिवसांपूर्वी चिराग पासवान यांनी भाजपला नोटबंदीचा देशाला काय फायदा झाला, असा प्रश्न दोन वर्षांनी विचारला. एवढेच नव्हे तर राममंदिर हा मुद्दा भाजपचा असून तो एनडीएचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिराग यांचे हे दोन प्रश्न विचारणे भाजपला पायाशी आणण्याचे डाव होते. बिहारमध्ये नितीशकुमार सरकार भाजपच्या टेकूवर उभे आहे. दीड वर्षापूर्वी नितीश यांनी राजदशी केलेला विश्वासघात आणि मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता पाहता राज्यातला मोठ्या प्रमाणातला ओबीसी, मुस्लिम मतदार सरकारविरोधात गेला आहे. हे लक्षात आल्याने चिराग यांनी खबरदारी म्हणून आपल्या जागा सुरक्षित केल्या. दुसरी एक बाब म्हणजे राममंदिराच्या मुद्द्यावर नुकतीच हरलेली तीन राज्येही अनुकूल नसताना बिहारचा मतदार आपल्या बाजूला राहील, हा धोका पत्करण्यास भाजपही तयार नाही. हे सर्व पाहून चिराग यांनी भाजपशी जागावाटपाअगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व तेजस्वी प्रताप सिंग यांचे तोंडभरून कौतुक केले. पासवान यांचे एकूणच राष्ट्रीय चरित्र भाजपला अवगत असल्याने स्वत:चे नुकसान सोसून त्यांच्या अटी मान्य करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. 


एकूणच तीन राज्यांतील पराभवाने एनडीए खिळखिळी होईल, असे भविष्य एकाही राजकीय पंडिताने वर्तवले नव्हते, ना एक्झिट पोलमध्ये याची चर्चा दिसली. भाजपच्या प्रत्येक राज्यातल्या चाणक्यांनाही हा अंदाज आला नाही की, तीन राज्यांत आपला पराभव होऊन त्याचे परिणाम एनडीएवर होतील आणि सामान्यातले सामान्य घटक पक्ष आपल्याला ब्लॅकमेल करतील. एकंदरीत पासवान जर शिरजोर होऊ शकतात तर आम्ही का नाही, असा सवाल एनडीएत उठू लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. काल पंढरपुरात शिवसेनेने जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही; पण भविष्यात जागावाटपावरून दोघांतले संबंध ताणणार हे स्पष्ट आहे. घटक पक्षांचे राजकारण सांभाळणे, त्यांच्या दबावाला बळी पडणे निवडणुकीपूर्वीचा अपरिहार्य भाग असतो. त्याने भल्या भल्या शक्तिशाली नेत्यांची खोड मोडते हा भाग महत्त्वाचा. 

बातम्या आणखी आहेत...