आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोडासाच उजेड (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक हे आतापर्यंत सलग सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले राजकीय नेते. त्यांच्यानंतर हा विक्रम केला तो विलासराव देशमुख यांनी. पण दोघांच्या कालखंडात मोठा फरक आहे. वसंतराव ११ वर्षे दोन महिने सलग मुख्यमंत्री होते, तर विलासरावांना चार वर्षे एक महिना सलग या पदावर राहता आले होते. महिनाभरानंतर हे दुसरे स्थान विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येणार आहे. कारण आज त्यांनी आपल्या पदावर सलग चार वर्षे काम करून तिसरे स्थान मिळवले आहे.

 

शिवसेनेकडून मनोहर जोशी आणि काँग्रेसकडूनच पृथ्वीराज चव्हाण यांना चार वर्षे पूर्ण करायला दीड महिना बाकी असतानाच पद सोडावे लागले होते. अर्थात, कोण किती काळ मुख्यमंत्री राहिले, यापेक्षा त्या पदावर राहून कोणी किती प्रभावी काम केले, हे जास्त महत्त्वाचे असते. नाही तरी कोणी किती काळ मुख्यमंत्रिपदावर राहायचे, हे भारतीय लोकशाहीत आमदारांऐवजी पक्षश्रेष्ठीच ठरवतात. त्यामुळे त्या विक्रमाला तसाही काही अर्थ राहत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून प्रशासनावर राज्य करण्यापेक्षा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे हे कधीही श्रेष्ठ. तेव्हा तुलनाच करायची तर त्या परिप्रेक्ष्यातून होणे अधिक महत्त्वाचे असायला हवे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, हे निमित्त असले तरी जनतेच्या जगण्यावर झालेल्या परिणामांच्या फूटपट्टीनेच त्यांचा कार्यकाळ मोजणे आवश्यक आहे ते त्यासाठीच.


फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराकडे पाहिले तर काय दिसते? जनतेच्या जगण्यात काही सकारात्मक फरक पडला आहे का? जनता तसे मानते आहे का? राजकारण बाजूला सारून या प्रश्नांची उत्तरे शोधली तर थोडासा उजेड आणि बराचसा अंधारच दिसतो आहे. १५ वर्षे कारभार केलेल्या आघाडी सरकारविषयी प्रचंड नाराज होऊन राज्यातील जनतेने भाजपला ही सत्ता सोपवलेली होती हे खरे नाही. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झाल्यानंतर राज्यात निवडणूक झाली होती. केंद्रात सत्तेत येण्याआधी मोदींनी दाखवलेल्या स्वप्नात तेव्हा देशभरातील जनता होती. त्या स्वप्नांचीच वाढीव आवृत्ती म्हणून राज्यात भाजपला यश मिळाले होते. कोणी त्याला मोदी लाट असेही म्हणत होते. या लाटेवर स्वार होऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारनेही मोदींनी दाखवलेली स्वप्नेच राज्याच्या पातळीवर पूर्ण करावीत, अशी जनतेची अपेक्षा होती.

 

आज चार वर्षांनंतर ती स्वप्ने आणि अपेक्षांकडे वळून पाहताना काय दिसते? राज्यातल्या जनतेची दु:खे कमी झाली आहेत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या पाहता या प्रश्नाचे वेगळे उत्तर असूच शकत नाही. व्यापारी, उद्योजक आणि असंघटित कामगार यांच्याही आयुष्यात मोठा फरक पाडणारा कोणताही निर्णय चार वर्षांत झालेला आठवत नाही. सार्वजनिक आरोग्याची वैयक्तिक लाभाची योजना आधीपासूनच राज्यात कार्यरत होती. शालेय आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीतही आमूलाग्र बदल करणारा कोणताही निर्णय समोर दिसत नाही. महिला आणि दुर्बलांच्या सुरक्षेत मोठा दिलासा मिळावा अशी परिस्थिती चार वर्षांत निर्माण होऊ शकलेली नाही. यापेक्षा वेगळे असे राज्यातील जनतेला आणखी काही अपेक्षित नव्हते. पण या सर्व पातळ्यांवर निराशेशिवाय मतदारांच्या हाती काही पडलेले दिसत नाही. नाही म्हणायला, ग्रामीण पातळीवर झालेली जलयुक्त शिवार योजनेची कामे काही प्रमाणात शेतकरी आणि ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा देणारी ठरली आहेत. तेवढीच काय ती या सरकारची नोंद घ्यावी अशी कामगिरी. 


मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी वैयक्तिकरीत्या उत्तम कामगिरी केली आहे, यात वाद असण्याचे कारण नाही. गृह, नगरविकास, सामान्य प्रशासन अशी अत्यंत महत्त्वाची खाती असूनही वाद ओढवून घेण्याची चूक त्यांनी केली नाही. काँग्रेसी संस्कृतीत पोसलेली आणि घडलेली नोकरशाही प्रारंभी सहकार्य करत नसतानाही फडणवीस यांनी आपल्या पद्धतीने कामे करवून घेतली आहेत. त्यांच्याकडे असलेल्या खात्यांनीच सर्वाधिक निर्णय गेल्या चार वर्षांत घेतले आहेत ही बाब समोर आली आहे. पण नेत्याला एकट्यानेच उत्तम कामगिरी करून चालत नाही. टीमवर्क म्हणून मंत्रिमंडळाच्या कारभाराचे मूल्यमापन करायचे तर प्रमुख चार, पाच मंत्री वगळता बाकी मंत्र्यांच्या कारभाराचा अंधारच समोर येतो. त्या खात्यांच्या कारभाराला गती देण्यासाठी संबंधित मंत्र्यांना प्रोत्साहित करणे किंवा त्यांना वगळणे हे मुख्यमंत्र्यांचे काम. पण त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. विशिष्ट मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती अधिक संख्येने देऊन ठेवली असल्याने त्यापैकी अनेक खात्यांकडे संबंधित मंत्र्यांनी लक्षच दिलेले दिसत नाही. याचा आढावा घेऊन अन्य खात्यांकडेही मंत्र्यांना लक्ष द्यायला सांगणे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होते. उरलेल्या वर्षभरात ते हा तरी बॅकलाॅग भरून काढतील, अशी अपेक्षा करूया. 

बातम्या आणखी आहेत...