आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादातून एकतेचे सूत्र पेरणारा नेता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९४७ सालातील पहिले ६ महिने भारतीय इतिहासात संस्मरणीय ठरले. साम्राज्यवादी शासनाच्या साेबतच भारताचे विभाजनदेखील अंतिम टप्प्यात पाेहाेचले हाेते. वस्तुत: त्या वेळी देशाचे एक किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा विभाजन हाेईल की, असे काही हाेणार नाही याविषयीचे चित्र धूसरच हाेते. यासंदर्भात काेणतीही स्पष्टता दिसत नव्हती. महागाई गगनाला गवसणी घालत हाेती, खाद्यान्नाच्या टंचाईची तीव्रता वाढत हाेती. परंतु एकंदर अशा अस्वस्थ वातावरणातही एका बाबीचे सार्वत्रिक दर्शन घडत हाेते - ती म्हणजे भारताच्या एकतेवरून जनतेच्या मनात निर्माण झालेली चिंता. कारण तिच्यासमाेर राजकीय अाणि सामाजिक अाव्हाने ठाण मांडून उभी हाेती. 

 

या पार्श्वभूमीवर १९४७ च्या जून महिन्यात गृह खाते निर्माण करण्यात अाले. या देशातील ५५० पेक्षाही अधिक संस्थानांचे भारतासाेबत कशा स्वरूपाचे संबंध असावेत या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करणे हा या गृहखात्याचा प्रमुख उद्देश हाेता. उल्लेखनीय म्हणजे या संस्थानांचे क्षेत्र, लाेकसंख्या, अाकारमान तसेच त्यांची अार्थिक सुबत्ता याबाबत बरेच वैविध्य हाेते. त्या वेळी म. गांधी म्हणाले हाेते, ‘राज्यांतील समस्या इतक्या बिकट अाहेत की केवळ ‘अापणच’ त्या साेडवू शकता. हा ‘अापणच’चा अाशय अन्य कुणाच्या संदर्भात नसून सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी निगडित हाेता. अाज अापण सर्वजण सरदार पटेल यांची जयंती साजरी करीत अाहाेत. त्यांना भावपूर्ण अादरांजली अर्पण करीत अाहाेत. 


अापल्या विशिष्ट सरदार पटेल शैलीने त्यांनी दृढनिश्चय अाणि प्रशासकीय सजगतेच्या बळावर राज्यांना भेडसावणाऱ्या समस्या साेडवल्या. वेळ अतिशय कमी हाेता, मात्र तुलनेने जबाबदारी अधिक हाेती. परंतु सरदार पटेल अापल्या निर्धारावर अढळ हाेते. काेणत्याही परिस्थितीत देशाला मान तुकवण्याची वेळ येऊ देणार नाही या निश्चयावर ते ठाम हाेते. त्यांनी अाणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापाठाेपाठ एक करीत सर्व संस्थानांशी चर्चा, वाटाघाटी केल्या अाणि सर्वांना स्वतंत्र भारताचा अविभाज्य घटक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सरदार पटेल यांनी संपूर्ण समर्पणभाव अाणि तन्मयतेने दिवस-रात्र एक करून हे यश साध्य केले. त्यामुळेच अाधुनिक भारताचे वर्तमानातील एकिकृत मानचित्र अापण पाहू शकत अाहाेत. असे म्हटले जाते की, व्ही. पी. मेनन यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारी नाेकरीतून निवृत्त हाेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. त्या वेळी सरदार पटेल त्यांना म्हणाले, ही वेळ अाराम करण्याची किंवा निवृत्ती स्वीकारण्याची नाही, पटेल असे दृढनिश्चयी हाेते. व्ही. पी. मेनन यांना परराष्ट्र विभागाचे सचिव नियुक्त करण्यात अाले. ‘द स्टाेरी अाॅफ इंटिग्रेशन अाॅफ इंडियन स्टेट्स’ या अापल्या पुस्तकात मेनन यांनी लिहून ठेवले अाहे की, सरदार पटेल यांनी संस्थानांच्या विलीनीकरणाच्या माेहिमेत पुढाकार कसा घेतला अाणि अापल्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने संपूर्ण सहकाऱ्यांना कठाेर परिश्रमासाठी प्रेरित केले. त्यात असेही म्हटले की, सरदार पटेल यांनी नेहमीच भारतीय जनतेच्या हिताचा विचार केला, यालाच त्यांनी प्राधान्यक्रम दिला हाेता, याबाबत कधीही तडजाेड केली जाऊ शकत नाही. 


अाम्ही १५ अाॅगस्ट १९४७ राेजी नव्या भारताच्या उदयाचा उत्सव साजरा केला, परंतु राष्ट्रनिर्मितीचे काम अपूर्ण राहिले हाेते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने सरदार पटेल यांनी प्रशासकीय व्यवस्थेच्या रचनात्मक बांधणीचे काम सुरू केले. अाजही ते काम सुरू अाहे, भलेही दैनंदिन प्रशासन संचालनाचा मुद्दा असेल किंवा गरीब अाणि वंचित घटकांच्या हितरक्षणाचा मुद्दा असेल. सरदार पटेल अनुभवी प्रशासक हाेते. विशेषत: १९२० च्या दशकात अहमदाबाद नगरपालिकेतील त्यांची सेवा, त्या वेळी प्राप्त झालेला अनुभव स्वतंत्र भारताची मजबूत प्रशासकीय रचना करण्यासाठी उपयुक्त ठरला. त्यांनी अहमदाबादेत स्वच्छता अाणि सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित केली हाेती. अाज भारत जिवंत सहकार क्षेत्रासाठी अाेळखला जाताे, त्याचे श्रेय सरदार पटेल यांना जाते. ग्रामीण समुदाय, विशेषत: महिलांना सशक्त अाणि सक्षम बनवण्याची त्यांची दूरदृष्टी अमूल प्रकल्पातून पाहायला मिळते. सहकारी गृहनिर्माण संस्थेचा विचार लाेकप्रिय बनवण्यात पटेल यांचा वाटा माेठा अाहे. यातून अनेकांना सन्मान तसेच निवारा देण्याचे काम त्यांनी यथार्थपणे बजावले.
भारतातील शेतकऱ्यांप्रति त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा होती. ते शेतकरीपुत्र होते. बार्डोली सत्याग्रहात त्यांनी अग्रणी भूमिका निभावली. आपले म्हणणे मांडणारा नेता या प्रतिमेतूनच कष्टकरी वर्ग त्यांच्याकडे पाहत असे.

 

सरदार पटेल हे भारताला आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा दृष्टिकोन देणारे नेते आहेत म्हणून व्यापारी आणि उद्योगपतीही त्यांच्यासोबत नेहमीच असत. राजकीय मित्रांचाही त्यांच्यावर विश्वास असे. आचार्य कृपलानी म्हणत असत, संभ्रमात सापडलो आणि महात्मा गांधींचे मार्गदर्शन मिळाले नाही तर मी सरदार पटेलांकडेच जातो. १९४७ मध्ये राजकीय तडजोडींविषयीची चर्चा, सूचनांना उधाण आले होते. तेव्हा सरोजिनी नायडूंनी त्यांना ‘संकल्प शक्ती असलेली गतिशील व्यक्ती’ अशी उपमा दिली होती. पटेल यांचे शब्द आणि कार्यपद्धतीवर सर्वांनाच विश्वास होता. जात, धर्म, वयाच्या मर्यादा ओलांडून लोक सरदार पटेल यांचा आदर करत असत. या वर्षी सरदार यांची जयंती विशेष आहे. १३० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांमुळे आज ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे उद््घाटन होत आहे. नर्मदेच्या किनारी असलेला हा पुतळा जगातील सर्वात उंच प्रतिमांपैकी एक आहे.  यानिमित्ताने भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल, भूमिपुत्र सरदार पटेल आपल्याला सदैव मार्गदर्शन करतील, प्रेरणा देतील. पटेल यांचा हा अजस्त्र पुतळा प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो. आज मला ३१ ऑक्टोबर २०१३ या दिवशी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन केल्याचा दिवस आठवतो. विक्रमी वेळेत एवढा मोठा प्रकल्प आकारास आला. त्यामुळे तुम्ही सर्वजण ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहायला अवश्य यावे.  


 ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा मनामनांची एकता आणि आपल्या मातृभूमीच्या भौगोलिक एकतेचे प्रतीक आहे. आपापसांत विभागले गेल्याने आपण एकजुटीने विरोध करू शकलो नाही, पण आता एक होऊन जगाचा सामना करू शकतो, विकासाची तसेच यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करू शकतो, अशी प्रेरणा या प्रतिमेकडून आपल्याला सदैव मिळत राहील. सरदार पटेल यांनी वसाहतवादाचा बुरूज ढासळण्यासाठी अभूतपूर्व गतीने काम केले आणि राष्ट्रवादाच्या भावनेतून विविध प्रदेशांमध्ये एकतेचे सूत्र आखले. त्यांनी भारताचे लहान-लहान तुकडे होण्यापासून वाचवले. राष्ट्रीय आराखड्यातील सर्वात कमकुवत भागांना प्रवाहात आणले. आज आपण १३० कोटी भारतीय नव्या भारत निर्मितीसाठी खांद्याला खांदा लावून काम करत आहोत. हा भारत मजबूत, समृद्ध आणि अखंड असेल. सरदार पटेल यांच्या विचारांप्रमाणे विकासाचा लाभ भ्रष्टाचार किंवा पक्षपाताशिवाय समाजातील सर्वात कमकुवत घटकापर्यंत पोहोचेल यादृष्टीने प्रत्येक निर्णय खूप विचाराअंती घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...