आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तारपूरचा मार्ग बिकट (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील डेरा नानक साहिब या सीमेवरील शेवटच्या गावापासून ते पाकिस्तानच्या सीमेपर्यंत ‘विशेष कर्तारपूर काॅरिडाॅर’ विकसित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह ठरावा. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीचे अाैचित्य साधून शीख भाविकांना ही अागळी भेट देण्याचा विचार जितका प्रशंसनीय अाहे, तितकेच भारत-पाक मैत्रीचा अाणखी एक राजमार्ग ठरू जाणाऱ्या या काॅरिडाॅरवरील धाेका अाेळखणेदेखील महत्त्वाचे ठरते. वस्तुत: या काॅरिडाॅरसाठी पुढाकार काेण घेणार याविषयी भारत अाणि पाकिस्तान सरकार एकमेकांच्या प्रतीक्षेत हाेते. परंतु नवज्याेतसिंग सिद्धूने पाक दाैऱ्यात लष्करप्रमुख बावजा यांना ‘झप्पी’ दिली, त्यानंतर हा काॅरिडाॅर सुरू हाेणार असल्याच्या चर्चेला राजकीय हवा मिळाली.

 

पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चाैधरी यांनीदेखील कर्तारपूर सीमा खुली करण्याचे अाणि भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय दरबार साहिबला जाण्यास परवानगी देण्याचे संकेत दिले. मात्र, त्यावर धाेरणात्मक निर्णय झाला नाही. अखेर भारतानेच कर्तारपूर काॅरिडाॅरसाठी पुढाकार घेतला. नानकाना साहिब अाणि सच्चा साैदापर्यंत जाण्यास भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिलेली असताना उद्दाम पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना राेखले. इतकेच नव्हे तर त्यांना शीख भाविकांना देखील भेटू दिले नाही, ही बाब निषेधार्हच अाहे. यामुळे प्रारंभिक उत्साहावर पाणी फेरले गेले हे तितकेच खरे.

 

याशिवाय नानकाना साहिबमध्ये भारतविराेधी अाणि खलिस्तान समर्थक नारेबाजी, वादग्रस्त शीख नेत्यांच्या पाेस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून पाकने फुटीरवादाला बळ दिले. एकीकडे कर्तारपूर काॅरिडाॅरच्या माध्यमातून मैत्रीचा सेतू मजबूत करण्याचा प्रयत्न हाेत असताना या प्रकरणाने तेढ वाढवण्यास खतपाणीच घातले. दहशतवादाला बळ देणे अाणि राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करणे हेच पाकिस्तानचे क्रियमान अाहे. स्वत: तर त्याचे परिणाम भाेगतच अाहे, शिवाय शेजारी राष्ट्रांना त्यात हाेरपळून काढत अाहे. कराचीतील चिनी वाणिज्य दूतावासावर बलुचिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे, अाेराकझाई जिल्ह्यात शुक्रवारच्या बाजारातील बाॅम्बहल्ल्याचे मूळ यातच दडले अाहे.

 

जाेपर्यंत पाकिस्तान फुटीरवाद अाणि दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करणे साेडणार नाही, ताेपर्यंत न चिनी पाठबळाचा पुरेसा फायदा घेऊ शकेल अाणि न भारताशी मैत्री दृढ करू शकेल. उल्लेखनिय म्हणजे १९९४ च्या दर अाणि व्यापार करारान्वये भारताने जागतिक व्यापार संघटनेतील बहुतेक सदस्य राष्ट्रांना ‘माेस्ट फेव्हर्ड नेशन’ (एमएफएन)चा दर्जा दिला. त्यात पाकिस्तानचा देखील समावेश अाहे. भारताकडून सातत्याने सकारात्मक साद दिली जात असताना त्या बदल्यात फारसा प्रतिसाद मिळणे दूरच राहिले, उलटपक्षी पाककडून शिरजाेरी अाणि अागपाखड वाट्याला येत राहिली अाहे. तात्पर्य, पाकिस्तानशी कितीही सामंजस्य राखण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मूळ प्रवृत्तीत सुधारणा हाेण्याची चिन्हे दृष्टीपथात येत नाहीत. त्यामुळे कर्तारपूरचा मार्ग बिकट अाहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.


एकीकडे पाकिस्तान चीनसाेबत ‘वन बेल्ट वन राेड’ या प्रकल्पासह अन्य अार्थिक याेजनांवर काम करत अाहे, दुसऱ्या बाजूला साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अापल्याच बलुचिस्तानची पिळवणूक करताे अाहे. ताे अमेरिकेशीदेखील कधी प्रामाणिक मित्रासारखा वागला नाही. पाकिस्तानी नेते दहशतवाद धार्जिणेपण साेडत नाहीत हे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांना कळून चुकले. त्यातूनच ट्रम्प-इम्रान खान यांच्यात ट्विटर वाॅर भडकले. अखेर सुरक्षेसाठी दिली जाणारी १.६ अब्ज डाॅलरची रसद राेखून त्यांनी पाकची तूर्त काेंडी केली. तरीही चीन असाे वा अमेरिका हे स्वहितासाठी कधीही धाेरणे बदलू शकतात. विशेषत: चीन अाणि अमेरिकेत व्यापारयुद्धाच्या निमित्ताने वर्चस्ववादाची लढाई सुरूच अाहे.

 

भारतीय परिसरात चिनी लष्कराचे वाढते सामर्थ्य सक्रिय हाेत असताना अापणही संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण, सक्षम हाेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज अाहे. स्वातंत्र्याेत्तर काळात अत्यंत बिकट वातावरणात भारताने स्वत:च्या धाेरणांचे स्वातंत्र्य जपले. शीतयुद्धाच्या काळात अलिप्तता जपली. एव्हाना भारताने प्रगतीचे बरेच पल्ले पादाक्रांत केले अाहेत. त्यामुळे धाेरणात्मक स्वातंत्र्यासमाेरील बहुतांश अडचणीदेखील कमी झाल्या अाहेत. अापल्या देशात गरिबी माेठ्या प्रमाणावर अाहे, तुलनेने अार्थिक स्थिती सुधारत असल्याने या संघर्षापासून दूर राहण्यातच भारताचे हित अाहे. नानकाना साहिबमध्ये वर्षभर चालणाऱ्या नानक देव जयंतीच्या निमित्ताने माेदी सरकारला बहुप्रतीक्षित कर्तारपूर काॅरिडाॅरचे स्वप्न साकार हाेताना दिसत असले अाणि पाकिस्तानने सद्भावना प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा वापर भारतीय एकात्मता, अखंडतेला अाव्हान देण्यासाठी हाेणार नाही, याबाबत सतर्क राहावेच लागेल.

बातम्या आणखी आहेत...