आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल हृदयाचा मुत्सद्दी (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वरी वरदान घेऊन काही नेते जन्माला येतात. सद्गुणांची ठेव ईश्वराने त्यांच्याजवळ ठेवलेली असते. नेतृत्व फुलत जाते तसे त्यांच्यातील सद्गुणांचे अधिराज्य देशातील जनतेवर स्थापित होत जाते. अशा नेत्यांवर जनता मनापासून प्रेम करते. त्यांचा आदर करते. त्यांच्याकडे विश्वासाने पाहते. ते सत्तेत असोत वा नसोत! विरोधात असतानाही जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आटत नाही. देशाच्या इतिहासात असे नेते अगदी थोडेच येतात. अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाची किमया मोजक्यांच्याच नशिबात असते. अटलबिहारी वाजपेयी हे असे व्यक्तिमत्त्व होते. पन्नास वर्षांहून अधिक काळ ते राजकारणात राहिले. त्यापैकी सहाच वर्षे ते सत्तेवर होते. इतका अल्पकाळ सत्तेवर असूनही अटलजींनी राजकारणावर आपला ठसा उमटवला तो अंगभूत सद्गुणांच्या बळावर. ठसाही असा की आज अटलजींची तुलना होत आहे ती भारताची पायाभरणी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्याशी. इंदिराजी, राजीव, नरसिंह राव, विश्वनाथ प्रताप सिंग या सर्वांना मागे सारून थेट नेहरूंशी नाते स्थापित करणाऱ्या या नेत्याने आपल्यातील हिंदू प्रेरणा कधीही लपवली नाही. अटलजी कडवे हिंदू नव्हते. किंबहुना हिंदुत्ववादीही नव्हते. मात्र, हिंदू जरूर होते. भारताच्या अथांग व समृद्ध परंपरेत मुरलेले हिंदू होते आणि त्याबद्दल त्यांना अजिबात खंत नव्हती. नेहरूंचेही हिंदुस्थानशी असेच नाते होते. गंगेबद्दलच्या त्यांच्या भावना या अटलजींसारख्याच होत्या. पंडितजी ही पक्की हिंदू उपाधी नेहरूंनी कधीही टाकली नाही. उलट त्यांना ती प्रिय होती. भारताच्या लोकशाहीचा नेहरूंनी रचलेला पाया अटलजींसाठीही श्रद्धेय होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारांवर अटलजींची जितकी निष्ठा होती, तितकीच श्रद्धा नेहरूंच्या विचारांवर होती. भारताची जडणघडण आणि परराष्ट्र धोरण यावर अटलजींचा नेहरूंशी वाद नव्हता. मोरारजी देसाई यांच्या काळात ते प्रथम परराष्ट्रमंत्री झाले. तेव्हा साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयातून हटवण्यात आलेली नेहरूंची तस्वीर त्यांनी पुन्हा सन्मानाने स्थापित केली होती. जवाहरलाल नेहरू साम्यवादी नसले तरी डाव्या विचारांकडे झुकलेले होते आणि साम्यवादापेक्षा धर्मवादी विचारसरणींचा भारताला धोका आहे, असे मानीत होते. तरीही अटलबिहारी वाजपेयी या त्या काळातील तरुण नेत्याबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. तरुण वाजपेयींमधील गुण नेहरूंनी तेव्हाच ओळखले होते आणि त्याला दादही दिली होती. नेहरूंचा हा उदारमतवाद वाजपेयी यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात जपला. बांगलादेश स्वतंत्र केल्याबद्दल इंदिराजींचे दुर्गा म्हणून त्यांनी खुल्या दिलाने कौतुक केले. याच इंदिरा गांधींनी त्यांना आणीबाणीत तुरुंगात टाकले. त्यानंतरच्या निवडणुकीत अटलजींची वाणी देशभर समशेरीसारखी तळपली. काँग्रेसच्या हुकूमशाहीचे, ध्येयधोरणांचे त्यांनी वाभाडे काढले. पण या समशेरीने कधीही विखारी जखमा केल्या नाहीत.

 

अजोड वक्तृत्व हे अटलजींना मिळालेले दुसरे ईश्वरी देणे. शब्दांचे भाव, वजन आणि झेप जाणून भाषेवर हुकूमत ठेवणारा त्यांच्यासारखा नेता अलीकडील काळात झालेला नाही. भाषा त्यांच्यावर प्रसन्न होती, मात्र ती कुठे व कशी वापरावी याचा विवेक कायम जागृत होता. सभेतील भाषणे व संसदेतील भाषणे यातील फरक ते ओळखत होते. साहित्यावरील त्यांचे प्रेम हे कवीचे होते. देशावरील निस्सीम भक्ती हा त्या कवितेचा प्राण होता. ही कविता चिंतनशीलही होती. साहित्याच्या उच्च निकषांवर ती उतरणारी नसली तरी त्यामागील सच्चा भाव स्वपक्षीयांसह प्रतिपक्षीयांनाही मोहवीत होता. नरसिंह राव आणि अटलजी यांच्यातील गाढ मैत्रीमध्ये साहित्याचा बंध होता. या मैत्रीला काव्याचे अंग होते. मुत्सद्देगिरीतील हे दोन निष्णात वीर साहित्याच्या आस्वादात रमणारे होते. विचारधारांमधील भेद तेथे आडकाठी करत नव्हते. कारण राजकारणापलीकडील, मनुष्यस्वभावापलीकडील अशा साहित्य-काव्याच्या भूमीचे दोघांनाही आकर्षण होते.

 

या काव्यप्रेमामुळेच असेल कदाचित, अटलजी कधीही काठिण्यहृदयी झाले नाहीत. हिंदू असल्याचा अभिमान कधीही दुराभिमान झाला नाही. त्यांचे पहिले सरकार १३ दिवसांत संपले. हिंदुत्ववादी शक्तींना बाहेर ठेवण्यासाठीच अन्य सर्व पक्ष एकत्र आले. ही १९९६मधील घटना आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असूनही अल्पसंख्य असल्याची भावना त्यांच्यात का बळावत आहे हा तेव्हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. राजीनामा देताना केलेल्या भाषणात याच मुद्द्याची त्यांनी चर्चा केली. तथापि, वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष असा की हे सरकार पडले तरी भाजपचे मित्रपक्ष वाढत राहिले. तेरा दिवसांनंतर तेरा महिने व त्यानंतर पाच वर्षे सरकार अव्याहत चालले. असंख्य पक्षांची मोट अटलजींनी लीलया सांभाळली. त्यासाठी कोणतेही छुपे वा सरकारी मार्ग त्यांना वापरावे लागले नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की करुणानिधींपासून ममता बॅनर्जी व जॉर्ज फर्नांडिस अशा परस्परविरोधी नेत्यांवर त्यांची छाप पडत असे. नरसिंह रावांचा त्यांच्यावरील विश्वास इतका की जिनिव्हा येथे पाकिस्तानच्या ठरावाचा पराभव करण्यासाठी त्यांनी वाजपेयी यांना पाठवले व वाजपेयी मोहीम फत्ते करून आले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप स्वपक्षीयांइतकीच विरोधी पक्षीयांवरही पडत असे आणि क्लिंटन, नवाझ शरीफ यांच्यासारखे परदेशी नेतेही अटलजींना जवळचे मित्र मानत. हिंदुत्ववादी विचारांचा नेता या बिरुदाने अटलजींचे कुंपण आक्रसले नाही. हे बिरुद असूनही हे कुंपण विस्तारत राहिले. झगडे तेव्हाही होत होते, पण त्यामध्ये कटुता येत नव्हती. अटलजींचे अमोघ वक्तृत्व आत्मविश्वासाने काठोकाठ भरलेले असले तरी त्यामध्ये उदारमतवादाचा धागा स्पष्टपणे दिसत असे. उदारमतवादी नेतृत्वामुळे त्यांचे सरकार केवळ टिकले नाही, तर कार्यक्षमतेने काम करू शकले. अटलजींचे पंतप्रधान कार्यालय हे सर्वात कार्यक्षम कार्यालय होते, अशी कबुली अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

अटलजींनी अनेक अपयशे अनुभवली. कसोटीचे प्रसंग अनेक आले. पाकिस्तानने तीन वेळा फसवले. कारगिल, विमान अपहरण, संसदेवरील हल्ला अशा प्रसंगी नेतृत्वाची कसोटी लागली. या प्रत्येक कसोटीच्या प्रसंगात वाजपेयी पूर्ण विजयी झाले नसले तरी पराभूत नक्की झाले नाहीत. नेहरूंचा वारसा ते मानत असले तरी वाजपेयी स्वप्नाळू नव्हते, तर विलक्षण व्यवहारी होते. देशाचा स्वार्थ कशात आहे ते ओळखत. नेहरूंचा उदारमतवाद त्यांनी स्वीकारला असला तरी राव यांचे मुक्त आर्थिक धोरणच पुढे राबवले. सध्या नेत्याच्या कणखरपणाची, निर्णय घेण्याच्या धाडसाची बरीच चर्चा होते. वाजपेयी यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. धाडसाने घेतले. अमेरिकेचा रोष स्वीकारून अणुचाचणी केली आणि कारगिल संघर्षात पाकिस्तानला जेरीस आणले. मात्र, पाकिस्तानला धडा शिकवताना भारताच्या सीमारेषेचे उल्लंघन भारतीय सैन्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली. यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तान एकटा पडला. सीमारेषेचे उल्लंघन न करण्याचा विवेक त्यांच्या ठायी होता. कवीमध्ये दडलेला हा मुत्सद्दी होता. गुजरात दंगलीमुळे ते व्यथित झाले व राजधर्माची भाषा केली. पण पक्षाचा घात होईल, असे काहीही केले नाही. त्या वेळी पक्ष द्विधा मन:स्थितीत सापडला असताना वाजपेयींनी आपल्या उदारमतवादाला मुरड घातली. तशी ती घातली नसती तर पक्षाची शकले उडाली असती. राजकारणाचे आडाखे बांधताना कवीची अंत:प्रेरणा त्यांना साथ देत असे. आपल्या सरकारने चांगले काम केले असले तरी जनता आपल्या मित्रपक्षांबरोबर नाही हे २००४च्या निवडणुकीआधी त्यांनी ओळखले होते. खरे तर वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळात भारत बलशाली झाला. आर्थिकच नव्हे, तर लष्करी सत्ता म्हणून भारताचा बोलबाला होऊ लागला. आर्थिक विकासदर १० टक्क्यांच्या वर गेला. जगावर भारताचा प्रभाव पडू लागला. याची सुरुवात नरसिंह राव यांनी केली असली तरी वाजपेयींनी ती अधिक पक्की केली. जमेच्या बाजूला अशा अनेक बाबी असूनही जनता आपल्यावर नाराज आहे हे अटलजींमधील कवी निवडणुकीआधीच समजून चुकला होता.

 

अटलजींमधील कवी सतत जागृत असे, पण राजकारण करताना ते मुत्सद्दी असत. मात्र, मुत्सद्द्यामध्ये असणाऱ्या कठोर, कडवटपणाला त्यांच्या स्वभावात स्थान नव्हते. इंदिरा वा नरसिंह राव यांच्याप्रमाणे ते कठोर राजकारणी झाले नाहीत. कवीची अंत:प्रेरणा त्यांचे हृदय खुले ठेवीत असे. त्यांच्यात दुष्टावा नव्हता, ना मनात, ना कृतीत. त्यामुळे त्यांच्या संतापालाही सात्त्विक तेज येत असे व प्रतिपक्षाला त्याची दखल घ्यावी लागे. बाबरी प्रकरणाने ते व्यथित झाले, पण त्यानंतर भाजपला वाळीत टाकण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर संतापाने प्रत्युत्तरही देऊ लागले. वाजपेयींच्या हेतूंबद्दल कधीही कोणाला संशय आला नाही. यामुळेच बंगारू लक्ष्मण प्रकरण असो वा बाबरी मशीद प्रकरण असो, वाजपेयींना ते चिकटले नाही. पाकिस्तानबद्दलची त्यांची धोरणे अपयशी ठरली, पण ती चुकली, असे कोणी म्हटले नाही. नेहरूंची चीनबद्दलची धोरणे चुकली, अशी टीका झाली होती. वाजपेयींबद्दल तसे न होता, उलट ‘दहशतवाद्यांचे आश्रयस्थान’ अशी पाकिस्तानची ओळख जगाला करून देण्याची कामगिरी वाजपेयी यांच्या नावावर दाखवली जाते. नेहरूंचा स्वप्नाळूपणा अटलजींनी चाणाक्षपणे टाळला.

 

मात्र, एका अर्थाने अटलजी नेहरूंप्रमाणेच एकाकी राहिले. ‘मी ना भारताचा, ना युरोपचा, मी कुठला?’ असा प्रश्न नेहरूंना नेहमी पडत असे. आपण अनिकेत आहोत ही भावना नेहरूंच्या पत्रांतून वा लेखनातून वारंवार डोकावते. अटलजींनी शब्दांमध्ये ती व्यक्त केली नसली तरी एका अर्थाने तेही अनिकेत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांची श्रद्धा होती, पण संघ त्यांचे आश्रयस्थान नव्हता. गांधीवादी समाजवादाकडे भाजपला नेण्याची धडपड त्यांना सोडून द्यावी लागली. भाजपने अटलजींवर अतोनात प्रेम केले. भाजपच्या सर्व नेत्यांसाठी ते उत्तुंग नेतृत्व राहिले हे खरे असले तरी कडव्या हिंदुत्वाकडे होणारी भाजपची वाटचाल वाजपेयींना मंजूर नव्हती. ही वाटचाल गतिमान होत असतानाच त्यांना स्मृतिभ्रंश व्हावा आणि ते सर्वांपासून मनाने दूर जावेत हाही एक विचित्र दैवयोग. त्यांना खुल्या दिलाचा उदारमतवादी भाजप घडवायचा होता. भाजपचे वाढते स्वबळ त्यांना आवडले असते. पण देशातील वाढत्या राजकीय असहिष्णुतेने ते व्यथितही झाले असते. याबद्दल फक्त मोदींना दोष न देण्याचा विवेक त्यांच्याकडे असला तरी निवृत्तीचे सजग आयुष्य ते जगत असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंकुश सर्वच पक्षांवर राहिला असता. गेली चौदा वर्षे ते राजकारणाच्या प्रकाशझोताच्या बाहेर होते. स्मृतिभ्रंशाच्या अंधारात गडप झाले होते. प्रसिद्धीच्या वलयापासून कोसो मैल दूर होते. तरी आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळतो आहे. इतकेच नव्हे, तर मधल्या कालखंडातील ११ पंतप्रधानांना ओलांडून अटलजींची नाळ थेट जवाहरलाल नेहरूंशी जोडते आहे. ही अटलजींची ताकद आहे. खुल्या दिलाचे प्रसन्न हास्य ही अटलजींची ओळख. या हास्याने मित्र जमवले, देशाला आकार दिला, भाजपला सन्मान दिला व उदारमतवादाचा झरा जिवंत ठेवला. आज ते हास्य चिरनिद्रा घेत आहे. या उत्तुंग तरीही आपल्याशा वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला प्रणाम.

बातम्या आणखी आहेत...