आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीची हाळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी रे होळी... अशी हाळी दिली की पोळी, गोळी, झोळी, मोळी, टोळी असे आपापल्या सोईचे यमक जुळवून जो तो पुढचे वाक्य पूर्ण करतो. त्यातून शृंगार, करुण, हास्य, बीभत्स, रौद्र आदी रसरंगांच्या पिचकाऱ्या परस्परांवर उडवल्या जातात. त्यातही या उत्सवातली धुळवड किंवा शिमगा यांची मजा काही औरच. यंदा तर त्याला सार्वत्रिक निवडणुकीची जोड मिळाली मिळाल्याने राजकीय चिखलफेकीला ऊत आला आहे. एरवी उत्तरेत होळीची धूम अधिक असते, पण सध्या राजकीय शिमग्यात महाराष्ट्र उत्तरेच्या काकणभर पुढे दिसतो. राज्यात चार टप्प्यांत मतदान होणार असल्याने आणखी दीड महीना तरी ही धुळवड अशीच सुरू राहील आणि त्यातून चौकीदार, चोर, पोपट, फुगा अशा नवनवीन पात्रांची ओळख आपल्याला होत जाईल. तेव्हा मराठी जनांनीही त्यासाठी होश्शियार व्हायला हवे. 

 


होळी, धुळवड, शिमगा, रंगपंचमी अशा विविध छटांनी आपल्याकडे रंगोत्सव साजरा होतो. त्यात एकमेकांची यथेच्छ टर उडवली जाते. एरवी असंसदीय ठरणारे शब्द अथवा अगदी शिव्यासुद्धा या माहौलमध्ये सहज खपून जातात. मनातले कढ, असूया, दुष्ट हेतू, दाबून ठेवलेल्या भावना या निमित्ताने मोकळ्या व्हाव्यात आणि मन हलके, निर्मळ व्हावे हा त्यामागचा मूळ हेतू. त्यामुळे या काळात कुणी कुणाचे म्हणणे फारसे मनावर घेत नाही. आपले बहुसंख्य राजकारणी तर कधीच काही मनावर घेत नाहीत. त्यामुळे त्यांची बातच निराळी. निवडणुकीचा हंगाम म्हणजे तर त्यांचे सुगीचे दिवस. तेव्हा येत्या काळात प्रत्येक जण आपापले रंग दाखवायला हिरिरीने पुढे सरसावतील यात शंका नाही. होळीचे कच्चे-पक्के रंग जरी अंगावर फार काळ टिकत नसले तरी राजकारणी मंडळींनी उधळलेले रंग मात्र अनेकदा बराच काळपर्यंत अधिकाधिक गडद होत जाताना दिसतात. त्याप्रमाणे सध्या भाजप आणि त्यांच्या कळपातील अन्य पक्षाची नेतेमंडळी आपल्या आवडत्या भगव्या रंगाला जास्तीत जास्त दाटपणा कसा येईल त्याच्या खटपटीत लागली आहेत. पुलवामा घटनेनंतर या भगव्या रंगाला राष्ट्रवादाची झालर लावण्याचा खटाटोपही अगदी जोरकसपणे सुरू आहे. विरोधी गोटातसुद्धा आपापले रंग पक्के करण्याची खटपट होत असली तरी त्यात म्हणावे तसे रंग भरले जात असल्याचे दिसत नाही. काँगेस आपल्या सर्वसमावेशी रंगछटांना चिकटून असली तरी या रंगछटा उजळून काढण्याऐवजी सोबतचे घटक पक्ष त्यावर जणू काजळीच चढवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास भाजपने भल्याभल्यांना आपल्या रंगाची चांगलीच मोहिनी पाडली आहे. सदासतेज गिरीशभाऊंच्या विविधरंगी करामतींना विरोधातली मंडळी एवढी सहजपणे भुलत आहेत की, लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा िनवडणुकीपर्यंत विरोधासाठी कुणी शिल्लक तरी राहते की नाही, असा उपरोधिक प्रश्न भाजपरंगी रंगलेला भक्तसंप्रदाय उच्चरवाने विचारू लागला आहे. त्यातूनच विखे-मोहितेंसारख्या दिग्गज राजकीय घराण्यांतील नव्या पातीला आपला रंग चढवत भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाकुल्या दाखवायला सुरुवात केली आहे. मनसेचे बहुरंगी इंजिन काळवंडून गेल्यामुळे की काय, त्यांच्या नेतृत्वाने निवडणुकीच्या रणांगणातच न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आखाड्यात उतरून कुस्ती लढवण्याऐवजी रिंगणाबाहेर राहून गतविजेत्या पैलवानावर यथेच्छ चिखलफेकीचा एक नवाच पायंडा राज यांनी या शिमग्याच्या निमित्ताने पाडला आहे. त्याउलट दोन-तीन महिन्यांपूर्वीपर्यंत फिका भासणारा उद्धव यांच्या शिवसेनेचा रंग युतीच्या घोषणेनंतर काहीही न करता उजळून निघत आहे. परिणामी, निवडणुकीपूर्वीच 'प्लस'मध्ये आल्याची भावना सामान्य शिवसैनिकांच्या ठायी आहे. वंचित बहुजन आघाडीसह अन्य लहानसहान पक्ष आपापल्या रंगांची चाचपणी करत आहेत. अशा प्रकारे राजकीय पक्ष विविध रंग उधळण्यात मश्गुल झाले असताना सामान्य माणूस मात्र अजूनही कोरडाच आहे. नेतेमंडळींच्या दृष्टीने निवडणूक आणि शिमगा यात फारसा फरक नसला तरी सर्वसामान्यांचे मात्र तसे नाही. नेतेमंडळींना, त्यांच्या वक्तव्यांना, निवडणुकीतील प्रचारकी घोषणांना, आरोप-प्रत्यारोपांना, आश्वासनांना आजही लोक बऱ्यापैकी गांभीर्याने घेतात. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव यांसारख्या मूळ प्रश्नांना राजकीय रंगपंचमीत झाकोळून टाकण्याची वा त्यांना आपल्या सोयीचे रंग चढवण्याची मखलाशी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असली तरी ती लोकांच्या नजरेतून सुटणे तितकेसे सहजसाध्य नाही. गडद रंगात रंगलेले चेहरे पाहून काही वेळ दृष्टिभ्रम जरूर होतो, पण व्यवस्थित निरखून पाहिल्यावर मूळ चेहऱ्याची ओळख पटल्याविना राहत नाही. सध्याच्या धामधुमीत आपल्या चेहऱ्यावर कुणी कितीही रंगाची पुटे चढवली तरी हुशार मतदार त्यातून असली आणि नकली चेहरे बरोबर शोधून काढेल. साहजिकच यंदाची होळी जरा जास्तच रंगारंग असली तरी खरा 'लोकरंग' कोणता ते निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...