आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह : वैतरणा ते दारणापर्यंत २५ किमी बोगद्याद्वारे २७ टीएमसी पाणी आणण्याचा प्रस्ताव तयार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यातील दारणा नदीमार्फत गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. त्यासाठी वैतरणा धरणाच्या निम्न भागात वळण बंधारा करून त्याद्वारे वैतरणा ते  दारणा नदी असा २५ किमी लांबीचा भूमिगत  बोगदा तयार करणे प्रस्तावित आहे. यासाठी नावीन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पश्चिम वाहिनी पूर्व प्रवाही करण्यासाठी प्रती किमी २० ते २५  कोटी रुपये खर्च या लिंक बोगद्यासाठी लागणार आहे. तसेच वळण बंधाऱ्यात दमणगंगा व उल्हास या नद्यांचे पाणी अशाच भूमिगत बोगद्याचा वापर करून येणार आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणून  मराठवाड्याचा पाणी प्रश्न  मार्गी लागणार आहे. प्रस्ताव प्रथम गोदावरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून येथून तो शासन मान्यतेसाठी रवाना होणार आहे.  

सततच्या दुष्काळ तसेच जायकवाडीच्या वरील प्रकल्पांत पाणी अडवले गेल्याने मराठवाड्याचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दुसरीकडे औरंगाबाद, नाशिक, नगर, जालन्यातील शहरीकरण, औद्योगिक विकास झपाट्याने वाढत आहे. शेतीसह उद्योग, व्यवसाय आणि पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुष्काळ, पाण्याच्या स्राेतांच्या अभावामुळे मागणीनुसार पाणी देता येत नाही. उद्योग, व्यवसाय बंद पडून बेरोजगारी वाढत चालली आहे. जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे. शेतीला पाणी मिळत नसल्याने ती पिकत नाही. गावातून स्थलांतर वाढले आहे. शहर फुगू लागले आहे.  या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नदी जोड प्रकल्प राबवण्यावर भर दिला जात आहे. 

देवगिरी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभागाचे उप विभागीय अभियंता अरुण घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर वैतरणा ते गोदावरी खोऱ्यातील दारणा नदीपर्यंतचा अभ्यास करून २५ किमी लांब व ७ ते ८ मीटर व्यासाच्या भूमिगत बोगद्याचा नकाशा तयार केला आहे. बोगद्याद्वारे  दमणगंगा, वैतरणा, उल्हास पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे १५ टीएमसी पाणी पूर्व गोदावरी खोऱ्यातील उप नदी दारणापर्यंत आणणे अधिक सोईचे व उपयुक्त ठरेल, अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. त्यास सरकारची तातडीने मान्यता मिळावी, यासाठी जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

वैतरणा प्रकल्पातून मुंबईतील दीड कोटींवर जनतेला पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो. त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून कोकणातील पार, भातसा, सूर्या, काळू, शाई, पिंजाळ, वैतरणा, दमणगंगा नद्यांचे पाणी समुद्र सपाटीस असणाऱ्या मुंबईस देऊन उंच भागातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे भुगड, खारगाहील आणि पिंजाळ नदी असे तीन ठिकाणी धरण बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. याचे काम वेगात पूर्ण केले तर वैतरणावरील मुंबईच्या पाण्याचा भार कमी होईल. तसेच भूमिगत बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात वर उल्लेखित  १५ आणि ऊर्ध्व वैतरणेचे  १२ असे एकूण २७ टीमएमसी पाणी प्रवाही पद्धतीने उपलब्ध होईल. १ टीएमसी पाणी १० लाख लोकांची  पिण्याच्या पाण्याची गरज भागवते. एक टीएमसी पाण्यात ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होते. औरंगाबादला दरवर्षी ३ टीएमसी पाणी लागते. आपल्याला ९१८ चौ. किमी पाणलोट मधून ५३ टीएमसी म्हणजे जायकवाडीच्या ७० टक्के पाणी एकूण आणता येईल. याचा विचार केला तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागून शेती सिंचन व उद्योग व्यवसाय आणि पिण्यासाठी शाश्वत पाणी मिळेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे घाटे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. 
 
 

वळण बंधाऱ्यात दमणगंगा व उल्हास या नद्यांचे पाणी आणण्याचे प्रस्तावित

१२ टीएमसी पाणी वळवणार
> समुद्र सपाटीपासून ५६० मीटर उंचीवरून दारणेतील ५५५ मीटरवर पाणी प्रवाही पद्धतीने आणण्याचे प्रस्तावात निश्चित केले आहे.
> ऊर्ध्व वैतरणा धरणास पर्याय करून त्यातील १२ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रस्ताव आहे.
 

पूर्वनियोजन
वैतरणाचा खालचा ६२ चौ किमी पाणलोट क्षेत्र, वैतरणा लगतचे दमणगंगा १२५ चौ किमी आणि उल्हास खोऱ्यातील ५० चौ किमी पाणलोट क्षेत्रातील वाया जाणारे पाणी पूर्वकडे गोदावरी खोऱ्यातील दारणा नदीपर्यंत भूमिगत बोगद्याने प्रवाहित करण्याचे प्रस्तावात नियोजित करण्यात आले आहे. 

प्रस्तावातील खास वैशिष्ट्ये
जमीन संपादन करण्याची गरज नाही. वन, वनसंपदेला व जैवविविधतेला कुठलाही धक्का लागणार नाही. वरचे पाण्याबरोबर खालील स्तरावर वाया जाणारे पाणी अडवले जाणार आहे. ते पाणी बाेगद्यापर्यंत अाणण्यासाठी लहान लिफ्ट पंप कार्यान्वित करणे. तेथील नागरिकांना पाणी मिळेल असे नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...